Alandi News : आळंदीमध्ये विज्ञानाच्या हस्ते अध्यात्माचा सत्कार

एमपीसी न्यूज – आळंदी (ता. हवेली) श्री संत गुलाबराव महाराज वाड्मय मंदिर येथे ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शांतिब्रम्ह गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर यांचा सत्कार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने कुरेकर बाबांच्या हस्ते डॉ.विजय भटकर यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत ह. भ. प. ज्ञानेश्वर शिंदे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संत गुलाबराव महाराजांनी लिहिलेल्या काही पुस्तकांचे प्रकाशन करून येथे विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
ह. भ. प. नारायण महाराज जाधव यांनी श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली. नाना महाराज यांनी जीवनात संस्कार का महत्वाचे आहेत याबाबत मार्गदर्शन केले.
शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी संत गुलाबराव महाराज व वारकरी शिक्षण संस्थेविषयी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी झालेला विद्यापिठा विषयीच्या संवादाच्या आठवणी यावेळी सांगितल्या.
राष्ट्रवादीचे नेते प्रकाश कुऱ्हाडे यांनी यावेळी संस्थेविषयी व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ह. भ. प. नारायण मोहोड,विठ्ठल शिंदे व वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.