Chakan News : कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला डांबून ठेवत लूट केल्याप्रकरणी भंगार माफिया रशीद शेख याला अटक

खंडणी विरोधी पथकाची धुळ्यात कारवाई

एमपीसी न्यूज – खेड तालुक्‍यातील सावरदरी येथील तौरॉल इंडीया कंपनीच्या सुरक्षा रक्षकास डांबून ठेवत चाकूचा धाक दाखवून हाताने माराहाण केली. त्यानंतर कंपनीतील एक लाखांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार 23 मे रोजी घडला होता. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी चौघांना अटक केली होती.

मात्र पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार आणि भंगार माफिया रशीद शेख फरार होता. त्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 18) धुळे येथे करण्यात आली.

रशिद छोटुमियॉं शेख (वय 52, रा. खंडोबा माळ, चाकण, ता.खेड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून सावरदरी येथील तौरॉल इंडीया कंपनीच्या सुरक्षा रक्षकास 23 मे रोजी डांबून ठेवत चाकूचा धाक दाखवून हाताने माराहाण केली. तसेच कंपनीतील ऍल्युमिनिअम उत्पादनाकरीता लागणारे एक लाखांचे चिल्सचे सुट्टे भाग लुटून नेले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती.

मात्र या टोळीचा म्होरक्‍या रशिद शेख हा पोलिसांना गुंगारा देत होता. दोन गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. संगमनेर, अहमदनगर, माजलगाव, बीड, परभणी, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अजमेर, राजस्थान, धुळे परिसरात स्वतःचे अस्तिव लपवून राहत होता.

खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व पोलीस हवालदार सुनिल कानगुडे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत आरोपी रशिद याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार धुळे-जळगाव रस्त्यावर गौरव हॉटेल समोरून आरोपी रशिद याला शुक्रवारी (दि. 18) पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी रशीद याला पुढील कारवाईसाठी म्हाळुंगे पोलीस चौकी येथे हजर करण्यात आले आहे. आरोपी रशिद हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी चोरी, घरफोडी, फसवणुक, चोरीचा माल घेणे, मारामारीचे असे तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.