Pimpri : महापालिकेतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे एकत्रिकरण होणार

शिक्षण समितीत ठराव  मंजूर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अंतर्गत माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण या दोन विभागांचे एकत्रिकरण होणार आहे. शिक्षण समिती अस्तित्वात आल्याने शिक्षण हक्क कायदानुसार (आरटीआय) दोन्ही विभागाचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या आज (शनिवारी) झालेल्या सभेत आयत्यावेळी मंजुरी देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीची तहकूब पाक्षिक सभा आज पार पडली. सभापती मनिषा पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिका अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग व प्राथमिक शिक्षण विभाग स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत. प्राथमिक विभागाच्या 105 आणि माध्यमिक विभागाच्या 18 अशा एकूण  123 शाळा आहेत. शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर 2017 पासून शिक्षण समिती अस्तित्वात आली. परंतु, माध्यमिक विभाग शिक्षण समितीच्या नियंत्रणाखाली येत नव्हता. माध्यमिक विभागाचे विषय शिक्षण समितीकडे देखील येत नव्हते. स्थायी समितीकडून थेट अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे जात होते.

महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी दोन्ही विभाग एकत्रित करणे आवश्यक आहे. शिक्षण समिती अस्तित्वात आल्याने शिक्षण हक्क कायदानुसार (आरटीआय) महापालिकेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्यवस्थापन आणि नियंत्रणाच्या दृष्टीने एकत्रित करण्यात यावा, असा ठराव समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे दोन्ही विभाग आता शिक्षण समितीच्या नियंत्रणाखाली येणार आहेत.

याबाबत बोलताना शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाले, ”माध्यमिक विभागाचे नियंत्रण शिक्षण समितीकडे नव्हते. आता माध्यमिक आणि प्राथमिक दोन्ही विभाग शिक्षण समितीच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. यापुढे माध्यमिक विभागाचे सर्व विषय शिक्षण समितीच्या मार्फतच पुढे जाणार आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.