Pune : रोखीच्या व्यवहारांवरील निर्बंधामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत

डॉ. गिरीश अहुजा यांचे मत; 'आयसीएआय'तर्फे 'कर लेखापरीक्षण व संबंधित समस्या' यावर कार्यशाळा

एमपीसी न्यूज – “करप्रणालीतील सुधारणेमुळे देशात करदात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध आल्याने आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. कररचना आणि कॅशलेस व्यवहारांबाबत आपण सर्वांनी माहिती करून घेतली आणि त्यानुसार व्यवहार केले, तर येत्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले दिवस पाहायला मिळतील,” असे मत राष्ट्रीय स्तरावरील डायरेक्ट टॅक्स तज्ज्ञ सीए डॉ. गिरीश अहुजा यांनी व्यक्त केले. 


दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या (आयसीसीआय) पुणे विभागाच्या वतीने ‘कर लेखापरीक्षण व त्यासंबंधित समस्या” या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अहुजा ‘रोख व्यवहाराच्या मर्यादा व संबंधित नवीन नियम’ या विषयावर बोलत होते. डॉक्टर अहुजा यांचे हे ३०१२ वे मार्गदर्शन सत्र होते. एरंडवण्यातील कन्नड संघ सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला रिजनल कौन्सिल मेम्बर सीए सर्वेश जोशी, सीए एस. जी. मुदंडा, आयसीएआयच्या पुणे विभागाचे चेअरमन आनंद जाखोटिया, सचिव राजेश अग्रवाल, कोषाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए रेखा धामणकर उपस्थित होते. जवळपास ६५० जणांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

डॉ. गिरीश अहुजा म्हणाले, “मोदी सरकारने जीएसटी, नोटबंदी यांसारखे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारात सुरळीतपणा येत आहे. रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध आल्याने भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल. बेनामी व्यवहार कमी होतील. कररचनेतील बदलांमुळे कर भरणा करण्यातही सुलभता येत आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे अधिक लोक कर भरत आहेत. या सगळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.”

सीए गोपाल क्रिष्ण राजू यांनी ‘कर लेखापरीक्षण अहवालात करण्यात आलेले बदल’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक आनंद जाखोटिया यांनी केले. राजेश अगरवाल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.