Pune : महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर

कोणी विष टाकले तरी माहिती होणार नाही ; पुणेकरांचे आरोग्य धोक्यात

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवणा-या महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या टाक्यांत कोणी विष टाकले तरी माहिती होणार नाही, असे सांगत पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

पतंग खेळत असताना वडगांव बु. येथील पाण्याच्या टाकीत पडून रविवारी 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे टोळकी दारू पित बसतात. सुरक्षा व्यवस्था सक्षम नसल्याने कोणी पाण्याच्या टाकीत विष ओतले तर काहीच कळणार नाही. यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे टाकीच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.

शहरातील सर्वच पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर असून टाक्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून परिसरामध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली. नगरसेवक अजय खेडेकर यांनी पाण्याच्या टाक्यावर जाळ्या बसवाव्यात, नाही तर त्यात कुत्रीही पडू शकतात, अशी भिती व्यक्त केली. नगरसेवक विशाल तांबे आणि हरिदास चरवड यांनीही आपले मते व्यक्त केली.

सभागृहनेते धीरज घाटे म्हणाले, टाक्यांच्या सुरक्षेची त्वरीत व्यवस्था करून मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी. सर्व प्रश्नांवर खुलासा देताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी म्हणाले, वडगांव येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. मात्र येथील झोपडपट्टीमधील लोकांकडून सुरक्षा रक्षकांना जुमानले जात नाही. टाकीच्या परिसरात येण्यास मज्जाव केल्यानंतर मारहाण केली जाते. पाण्याच्या टाकीत मुलगा पडल्याची घटना घडल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यात आली असून बंदुकधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्याचे सांगितले.

माजी विभाग प्रमुख माधव जगताप यांनी विभागाकडील बंदुकीसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, विभागाकडे १६ गन २ पँईंटच्या रिव्हाल्वर, दोन पिस्तूल आहेत. यापैकी विभागाकडे १९ बंदूक जमा असून एक समाज कल्याण येथील संतोष पवार यांच्याकडे आहे. ती जमा करण्यासंबंधी पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही जगताप यांनी सांगितले. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी तीन महिने एक बंदूक आपण बाहेर ठेवत असाल तर मला एक बंदूक द्या, अशी उपरोधिक मागणी करताच एकच हशा पिकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.