Security reduce of politicians : महाराष्ट्र सरकारने राजकीय नेत्यांच्या सुरक्षेमध्ये केले ‘हे’ बदल

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र सरकारने विविध व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुरक्षेमध्ये काही बदल केले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली असून त्यांना वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीदेखील काढून घेण्यात आली आहे.

तसेच अमृता फडणवीस यांची वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा दिली गेली आहे. ॲड. उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून त्यांना झेड व वाय प्लस एस्कॉर्टसह अशी अनुक्रमे सुरक्षा दिली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झेड सुरक्षेमध्ये कपात करून त्यांना वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा दिली गेली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षेमध्ये कपात करून ती वाय प्लस देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा कमी करण्यात आली असून भाजप नेते नारायण राणे, रावसाहेब दानवे यांच्याही पूर्वी असलेल्या वाय प्लस सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेते अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना वाय सुरक्षा दिली आहे. भाजप नेते आशिष शेलार, राम नाईक यांच्या सुरक्षेमध्ये कपात करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. कोकणातील आमदार वैभव नाईक व राजेश क्षीरसागर यांना एक्स सुरक्षा दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, वरूण सरदेसाई, प्रकाश शेंडगे यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.