Pimpari Chichwad News: श्री साईनाथ बालक मंदिराची ‘माय क्रिएटिव्ह प्री स्कूल’ म्हणून  निवड

एमपीसी न्युज : कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन, फिनलंड यांच्यातर्फे आयोजित केलेल्या जागतिक पातळीवरील स्पर्धेमध्ये चिंचवड येथील श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या श्री साईनाथ बालक मंदिराची ‘माय क्रिएटिव्ह प्री स्कूल’  (माझी सर्जनशील शिशुशाळा) म्हणून निवड झाली आहे. 

कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन, फिनलंड यांच्यातर्फे आयोजित केलेल्या जागतिक पातळीवरील स्पर्धेमध्ये चिंचवड येथील श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या श्री साईनाथ बालक मंदिराची ‘माय क्रिएटिव्ह  प्री स्कूल’  म्हणून निवड  करण्यात आली. जगातील 5 खंडातील अनेक शाळांमधून पाच शाळा निवडण्यात आल्या.

या शाळांना 14 ऑक्‍टोबर ते 16 ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान आयोजित केलेल्या ‘अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन इन न्यू नॉर्मल’ या जागतिक  परिषदेमध्ये  आपल्या शाळेचा अभिनव उपक्रम सादर करण्याची अनमोल संधी मिळाली. कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनचे  हेरंब कुलकर्णी,  शिरीन कुलकर्णी,  धनिका सावरकर,  सिमरन बल्लानी यांनी  शाळेच्या कार्याबद्दल परिषदेमध्ये  गौरवोद्गार काढले.

covid-19 च्या दरम्यान जगभरामध्ये अनेक शिशुशाळा अभिनव प्रयोग करून  अध्यापन आणि अध्ययन करत  आहेत.  या प्रतिकूल परिस्थितीमध्ये   श्री साईनाथ बालक मंदिरात तर्फे  राबविण्यात आलेल्या सर्जनशील अध्यापन प्रयोगाची  जगातील नामवंत  सर्जनशील शैक्षणिक तज्ज्ञांच्या समितीकडून निवड करण्यात आली.

श्री साईनाथ बालक मंदिर 10 फेब्रुवारी, 2021 ला 50 व्या वर्षात पदार्पण करत आहे.  त्यामुळे शाळेच्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या अविरत आणि अव्याहतपणे चालू असलेल्या ज्ञानयज्ञास या अभिनव संधीमुळे जागतिक पातळीवर  मान्यता मिळाली,  असे  श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  डॉ. अनिल   धामणे म्हणाले.

संस्थेचे उपाध्यक्ष रजनीकांत बेलसरे, खजिनदार प्रसाद गणपुले,  आजीव सदस्य डॉ. पुष्पाताई कलमदानी,  डॉ. शिल्पागौरी गणपुले,  तसेच  कार्यकारिणी सदस्य अमृता बेलसरे, शैलेश बोकील, आर्किटेक्ट उदय कुलकर्णी, सतीश आचार्य,  सुनिता कुलकर्णी, आर्किटेक्ट अंजली कलमदानी, डॉ. अशोक बोरा, डॉ. दिप्ती धर्माधिकारी यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Covid-19 च्या दरम्यान शाळेने शिकवण्याचे व्यवस्थापन कसे केले,  मुलांपर्यंत शिक्षण कसे पोहोचले,   शिकवण्यासाठी कोणती साधने कशाप्रकारे वापरली आणि अंतिमतः या प्रयोगातून कोणते उद्दिष्ट प्राप्त झाले याविषयी प्रत्येक शाळेने सविस्तर अहवाल प्रस्तुत स्पर्धेकरिता  विविध पुराव्यांसहित  सादर केला.

श्री साईनाथ बालक मंदिराने जून 2020 ते सप्टेंबर 2020 या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये  संगणक, झूम मीटिंग, गुगल मीट, लॅपटॉप इत्यादी आधुनिक साधनांचा वापर न करता ज्ञानदानाचे कार्य  व्हाट्सऍपच्या माध्यमातून अत्यंत उत्तम रीतीने पूर्ण केले.

शाळेमध्ये किंवा पालकांकडे  संगणक,  वायफाय इत्यादी गोष्टी उपलब्ध नसल्याने,  कमी उत्पन्न गटातील व मध्यमवर्गातील  पालकांच्या  सोयीसाठी  व्हॉट्सऍप हे  विनाशुल्क माध्यम  निवडण्यात आले.  शाळेतील सर्व शिक्षक व पालक  यांचे व्हाट्सअपला खाते असल्याने  हा प्रयोग करणे शाळेला सहज शक्य  झाले.  व्हाट्सअपला वेळेचे बंधन  नसल्याने  पालक आपल्या सोयीने,  वेळेप्रमाणे आपल्या पाल्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करू शकले.

श्री साईनाथ बालक  मंदिराने व्हॉट्सऍपचा वापर सर्जनशीलपणे करून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. शाळेचा पूर्ण अभ्यासक्रम शिक्षकांनी  स्वतः छोटे  व्हिडिओ बनवून,  ते व्हाट्सअप वर  पालकांना पाठवून,  पालकांच्या मदतीने  विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावीपणे शिकवला.  सप्टेंबर मध्ये घेण्यात आलेल्या  सहामाही परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी  मिळवलेले घवघवीत यश  हे या प्रयोगाच्या यशस्वितेचे गमक होय.

“पालकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाल्यामुळे  हा प्रयोग आम्ही यशस्वी करू शकलो” असे शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थापिका निशा बेलसरे यांनी नमूद केले.  सदर प्रयोगासाठी  शाळेतील शिक्षिका रेवती नाईक,  स्वाती कुलकर्णी,  प्रज्ञा पाठक,  मानसी कुंभार, अवनी होनप,  प्रज्ञा जोशी आणि योगिता देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना शिक्षकांनी अत्यंत कल्पकतेने व्हिडिओ बनवले.

पाहा श्री साईनाथ बालक मंदिरावरील हा माहितीपट….

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.