Pimpri : शहीद हेमंत करकरेंचा अवमान व गांधीजींच्या मारेकऱ्यांचे उद्दात्तीकरण करणाऱ्या अपप्रवृतींविरोधात आत्मक्लेश आंदोलन 

एमपीसी न्यूज – शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या व गांधीजींच्या मारेकऱ्यांचे उद्दात्तीकरण करणाऱ्या अपप्रवृतींविरोधात शनिवार दि.१ जूनला सकाळी  डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी अपना वतन संघटनेच्या वतीने अन्न व पाणी त्याग करून एकदिवसीय “आत्मक्लेश आंदोलन” करण्यात आले.

पिंपरी येथे झालेल्या आंदोलनाच्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे, मारुती भापकर, हरीश मोरे, वैभव जाधव, आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, राहुल डंबाळे, बाळासाहेब सरोदे, अकबर मुल्ला, ऍड मोहन अडसूळ, दिलीप देहाडे, गुलाब पानपाटील, नितीन ओहाळ, शबुद्दीन शेख, संदीप पिसाळ, सतीश काळे याबरोबर अपना वतन संघटनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनामध्ये अपना वतन संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, राजश्री शिरवळकर,हमीद शेख, फातिमा अन्सारी, आरती कोळी, हेमलता परमार, तौफिक पठाण, अब्दुल शेख, आकाश कांबळे, अनिल कारेकर, दिलीप गायकवाड , फारुख शेख, दिवेश पिंगळे, विशाल निर्मल अरविंद देवगडे  आदींनी आत्मक्लेश सत्याग्रह केला. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान भाजपच्या विद्यमान खासदार व मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील जामिनावर असलेल्या आरोपी प्रज्ञा साध्वी यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात आतंकवाद्यांशी सामना करताना शहीद झालेले जिगरबाज पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते.

त्या म्हणाल्या होत्या की, मी शाप दिल्यामुळेच हेमंत करकरे यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले. या वक्तव्यामधून साध्वीची विखारी मानसिकता आणि कट्टरवाद दिसतो. अशा प्रकारच्या नीच वक्तव्याचा अपना वतन संघटनेच्या वतीने खरपूस समाचार घेण्यात आला. साध्वी प्रज्ञाचा निषेध करण्यात आला.

ब्रिटिशकाळात स्वातंत्र्यसंग्रामात सत्य, अहिंसा या तत्वांवर गांधींनी इंग्रजांना नाकी नऊ आणले होते. गांधींचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान मोलाचे आहे. गांधींमुळे भारत जगामध्ये ओळखला जाऊ लागला. त्यांचे त्याग, बलिदानमुळे लोकांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली. या गांधींच्या मारेकऱ्यांचा उद्दात्तीकरण करण्याचा डाव देशातील काही द्वेषमूलक कट्टरवादी मंडळी करीत आहेत. बापूंच्या फोटोला बंदुकीने गोळ्या मारण्याचा व रक्त फासण्याचा प्रकार नुकताच आपल्या देशामध्ये घडला. तसेच गांधीजींचा मारेकरी असलेला नथुराम गोडसे या आतंकवादीला देशभक्त बनवण्याचा व त्याचे पुतळे उभारण्याचा कार्यक्रम सध्या देशामध्ये चाललेला आहे.

या सर्व गोष्टी देशविघातक आहेत. यामुळे देशातील शांतता अबाधित होऊन अस्थिरतेचे वातावरण निर्माण होत आहे. तमाम गांधी प्रेमींच्या मनामध्ये तीव्र असंतोष व भीतीचे सावट पसरत आहे. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने या देशविघातक प्रवृतीच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्या देशविघातक प्रवृतीना सद्बुद्धी येवो. तसेच असे प्रकार भारतीय जनता पुन्हा सहन करणार नाही. या बुवा – बाबाच्या आडून देशामध्ये ध्रुवीकरण व अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व राजकीय पाठबळ देणाऱ्या भाजपसारख्या पक्षाला इशारा देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.