Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महावितरणची तब्बल 1617 कोटींची थकबाकी

एमपीसी न्यूज – पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या 31 हजार 555 वीजजोडण्यांच्या वीजबिलांची थकबाकी तब्बल 1 हजार 617 कोटी 31 लाख रुपयांवर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक वीजजोडण्यांची संख्या व थकबाकी ही ग्रामपंचायतींची आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी चालू वीजबिलांचा देखील भरणा न केल्यास नियमानुसार पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांचा भरणा करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंचांवर देण्यात आली असून त्यात दिरंगाई झाल्यास त्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात येणार असल्याचे शासनाकडून लेखी पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांना पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या 42 हजार 29 वीजजोडण्यांचे 32 कोटी 60 लाख रुपयांचे चालू वीजबिल देण्यात आले आहेत, मात्र प्रामुख्याने ग्रामपंचायतींकडून चालू वीजबिलांचा देखील भरणा होत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची चालू वीजबिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामपंचायतींनी पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिले थकविल्याने महावितरणवरील थकबाकीचे ओझे वाढले आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 2543 वीजजोडण्यांचे 109 कोटी 80 लाख तर पथदिव्यांच्या 7055 वीजजोडण्यांचे 452 कोटी 32 लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 1979 वीजजोडण्यांचे 75 कोटी 44 लाख तर पथदिव्यांच्या 3895 वीजजोडण्यांचे 469 कोटी रुपये थकीत आहे.

सातारा जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 1861 वीजजोडण्यांचे 17 कोटी 59 लाख तर पथदिव्यांच्या 4842 वीजजोडण्यांचे 198 कोटी 13 लाख रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 2642 वीजजोडण्यांचे 88 कोटी 53 लाख तर पथदिव्यांच्या 2874 वीजजोडण्यांचे 71 कोटी 24 लाख रुपये थकीत आहे. तर सांगली जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 1203 वीजजोडण्यांचे 26 कोटी 69 लाख तर पथदिव्यांच्या 2661 वीजजोडण्यांचे 107 कोटी 63 लाख रुपये थकीत आहे.

राज्यातील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच थकबाकीबाबत निर्णय होईपर्यंत तूर्तास ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांची रक्कम दिलेल्या मुदतीत महावितरणकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ही चालू वीजबिले भरली न गेल्यास संबंधीत पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.