Pimpri News : दिवाळीनिमित्त महिला बचत गटांचे 28 ते 30 ऑक्टोबर पर्यंत विक्री व वस्तू प्रदर्शन

एमपीसी न्यूज – महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त शहरातील महिला बचत गटाच्या विविध वस्तू प्रदर्शन व विक्रीचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक बळ तसेच प्रोत्साहन मिळेल असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांच्या स्टॉलचे उद्घाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या आश्विनी चिंचवडे, सविता नागरगोजे, उप आयुक्त अजय चारठाणकर, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अर्चना क्षिरसागर, सारस्वत बँकेच्या अधिकारी वर्षा चक्रवर्ती, सामाजिक कार्यकर्त्या माया भालेकर, पल्लवी वाल्हेकर तसेच महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

महापौर ढोरे म्हणाल्या, महिला बचत गटांनी आपण उत्पादित केलेल्या वस्तूचा व्यवसाय कसा पुढे जाईल व त्यासाठी बाजारपेठ कशी मिळवता येईल याचा अभ्यास करुन मार्केटींग स्कील आत्मसात करावे. कोणतेही काम असो ते मनापासून करावे, कामाची लाज बाळगू नका, कष्ट करुन मोठे व्हा तसेच आपला व्यवसाय वाढवा यश नक्की मिळेल.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, विविध क्षेत्रामध्ये महिलांनी आपले कौशल्य गुण दाखविले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आपल्या वस्तूची विक्री कशी होईल याचा विचार करुन वस्तूची गुणवत्ता त्याचे पॅकेजींग याला प्राधान्य द्या, गरजू महिलांचा बचत गटामध्ये समावेश करुन त्यांना उभारी द्या. आपल्या वस्तूची विक्री करण्यासाठी तसेच बाजारपेठ मिळविण्यासाठी महिलांनी या स्पर्धेच्या युगात प्रयत्न करावेत.

यावेळी उप आयुक्त अजय चारठाणकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना क्षिरसागर यांनी केले तर सूत्रसंचालन निशा निमसे यांनी केले. सदरचे विक्री व प्रदर्शन दिनांक 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे खुले राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.