Pimpri : ऑनलाईन दूध विक्रीच्या विरोधात वितरकांचा एल्गार 

एमपीसी न्यूज – विविध कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने ऍपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या दूध विक्रीचा फटका शहरातील दूध वितरक व विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे घटलेला व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी विक्रेते व व्यावसायिकांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व प्रमुख दूध उत्पादकांशी पत्रव्यवहार करुन, ऑनलाईन विक्री करणाऱ्यांना सवलतीच्या दरात दूध उपलब्ध करुन न देण्याची मागणी केली जाणार आहे. यावर आठवडाभरात तोडगा न निघाल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सांगवीतील संस्कृती लॉन्स येथे पुणे व पिंपरी-चिंचवड दूध वितरक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज (बुधवारी) पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नगरसेवक रोहित काटे, प्रशांत शितोळे, सुधीर बेनके, गणेश जगताप, प्रणव देशमुख, मनिष मुरकुटे, राहुल बोरकर, चिंतन शहा यांच्यासह 150 दूध व्यावसायिक उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी दूध विक्री व्यवसायात शिरकाव केला आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्सचा भडीमार केला जात आहे. ऍपच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर अमुल, चितळे, कात्रज, गोकुळ या नामवंत डेअरींचे दूध बाजारभावापेक्षा कितीतरी कमी किंमतीमध्ये ग्राहकांना घरपोच दिले जात आहे. याशिवाय काही दिवस तर ग्राहकांना अगदी मोफत दूध देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या ऍपचा पर्याय स्वीकारत पारंपारिक पद्धतीने दूध टाकणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून दूध घेणे बंद केले आहे. त्याचा परिणाम दूध विक्रीवर झाला आहे. त्याचा फटका दूध वितरक व व्यावसायिकांना बसत आहे.

अचानकपणे ग्राहक कमी झाल्याने, विक्रेत्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. उच्चभ्रू वर्गाबरोबरच सामान्य ग्राहकदेखील या ऍपला प्राधान्य देत असल्याने जून्या विक्रेत्या व व्यावसायिकांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.या बैठकीत सर्व प्रमुख दूध उत्पादक डेअरींचे वितरक उपस्थित होते. या वितरकांकडून बहुराष्ट्रीय कंपन्यांना दूध विक्री केली जात नाही. तसेच दूध उत्पादकांकडूनही कमी भावात कोणत्याही कंपनीला दूध विक्री केली जात नसल्याची बाब या बैठकीत समोर आली आहे. मात्र, खाद्य पदार्थ विक्री क्षेत्रातील स्विग्गी, उबेर इटस्‌ या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आता दूध विक्रीसारख्या क्षेत्रात देखील शिरकाव केला आहे. त्यामुळे दूधाचे मार्केट काबीज करण्यासाठी बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने कमी दरात दूध विक्री सुरु करण्यात आली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.