Dharmendra Shares Workout Video: ‘आयुष्य फार सुंदर आहे, मजेत आणि भरभरुन जगा’…

Senior Actor Dharmendra shares workout video आधी लाज-या बुज-या, संयत व्यक्तिरेखा साकारणा-या धर्मेंद्र यांनी कारकीर्दीच्या नंतरच्या टप्प्यात रफ टफ भूमिका साकारल्या.

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी पुण्यातील पंच्याऐशी वर्षांच्या शांताआजींचा या वयात लाठी काठी फिरवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. तो पाहिल्यावर बॉलिवूडचे ‘ही मॅन’ म्हणजे अभिनेते धर्मेंद्र यांची आठवण आली. ते देखील या वयात पूर्णपणे फिट आहेत. आधी लाज-या बुज-या, संयत व्यक्तिरेखा साकारणा-या धर्मेंद्र यांनी कारकीर्दीच्या नंतरच्या टप्प्यात रफ टफ भूमिका साकारल्या. ‘फूल और पत्थर’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा शर्टाशिवाय आपल्या पीळदार शरीराचे दर्शन घडवले. त्यामुळे त्यांना ‘ही मॅन’ ही उपाधी मिळाली. सध्या हे बुजूर्ग अभिनेते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत.

ते त्यांचा संपूर्ण वेळ लोणावळा येथील फार्महाऊसवर घालवताना दिसतायेत. तसेच तेथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतानाचे व्हिडिओ आणि फोटो ते सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सध्या धर्मेंद्र यांचा एक वर्कआऊटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

धर्मेंद्र यांनी ट्विटर अकाऊंटवर वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते सुरुवातीला त्यांचा फार्महाऊस दाखवत आहेत. त्यानंतर ते त्यांच्या खोलीमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी छान असे कॅप्शन देखील दिले आहे. त्यांचा या वयातील वर्कआऊट व्हिडिओ पाहून चाहते फिदा झाले आहेत.


यापूर्वी धर्मेंद्र यांनी त्यांचा बंगल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये बंगल्यामध्ये मोठे गार्डन, कारंजे आणि गार्डनमध्ये काही मूर्ती बसविल्याचे दिसत होते. हे सारे पाहिल्यानंतर त्यांनी बंगल्याच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे म्हटले जात होते.

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी ‘हे सारं त्याने दिलं आहे आणि एक दिवस तो गुपचूप सारं काही घेऊन जाईल. आयुष्य फार सुंदर आहे मित्रांनो, आयुष्य मजेत आणि भरभरुन जगा’, असे कॅप्शन दिले होते.

धर्मेंद्र यांनी 1960 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ असे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते. त्यानंतर त्यांनी ‘सत्यकाम’, ‘खामोशी’, ‘शोले’, ‘क्रोधी’, ‘यादों की बारात’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

‘यमला पगला दिवाना फिर से’ हा त्यांचा बॉलिवूडमधील शेवटचा चित्रपट आहे. सध्या त्यांची तिसरी पिढी म्हणजे अभिनेता सनी देओलच्या मुलाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.