Chinchwad News : सकारात्मकता मानवी जीवन सुंदर करते – श्रीकांत चौगुले

एमपीसी न्यूज सकारात्मकता मानवी जीवन सुंदर करते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी चिंचवडगाव येथील विरंगुळा केंद्र येथे शुक्रवारी (दि.27) व्यक्त केले.(Chinchwad News) ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या 31 व्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत चौगुले बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, कार्यवाह राजाराम गावडे, सहकार्यवाह भिवाजी गावडे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी, सहकोषाध्यक्ष सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

गणेश प्रतिमा, क्रांतिवीर चापेकर समूहशिल्प यांचे पूजन, दीपप्रज्वलन तसेच मंगला दळवी आणि रत्नप्रभा खोत यांनी केलेल्या त्रिवार ओंकार अन् शांतिमंत्राच्या पठणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

अध्यक्ष रमेश इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकातून, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेने एकतीस वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याने खऱ्या अर्थाने ही संस्था तारुण्यावस्थेत आली आहे. ही संस्था म्हणजे एक पवित्र देवालय आहे.अशा भावना व्यक्त केल्या. त्यानंतर पारंपरिक वेषभूषा परिधान करून, पालखीमधून ‘जिव्हाळा’ या वार्षिक अंकाच्या प्रती पुष्पवृष्टी करीत सभागृहात हस्ते प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी दिलीप तांबोळकर यांनी शंखनाद करून सुरेल वातावरण निर्मिती केली; तर अंकाचे संपादक नंदकुमार मुरडे यांनी लालित्यपूर्ण शैलीतून अंकाचे अंतरंग उलगडून सांगितले.(Chinchwad News) श्रीकांत चौगुले पुढे म्हणाले की, एखादा फळा फुलांनी डवरलेला वृक्ष जितका विलोभनीय दिसतो  तितकेच अनुभव संपन्नतेमुळे ज्येष्ठ हे आदरणीय वाटतात.

Crime News : दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये पिस्टल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक

जीवनातील सुख-दु:खाचे अनुभव घेतलेल्या सर्जनशील मनांच्या साहित्याभिव्यक्तीमुळे ‘जिव्हाळा’ हा अंक सर्वांगसुंदर झाला आहे. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष होय, याचा प्रत्यय अंकाच्या पानापानांतून येतो.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि ‘जिव्हाळा’ अंकाचा रौप्यमहोत्सव हा उत्तम योग यानिमित्ताने साधला गेला आहे. त्यानंतर ज्या सभासदांनी आपल्या वैवाहिक जीवनाची पन्नास वर्षे पूर्ण केली त्या दांपत्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

गोपाळ भसे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त  21 जानेवारी रोजी महिलांच्या स्पर्धा आणि ब्रह्मकुमारी तर्फे हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. तर 25 जानेवारी रोजी तानाजीनगर येथील गजानन महाराज मंदिरात प्रिया जोग आणि सहकारी यांनी (Chinchwad News) सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. गुरुवार 26 जानेवारी रोजी महिलांचे विष्णूसहस्त्रनाम, सभासद वाढदिवस सत्कार आणि विविध गुणदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन केले होते, त्यामधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले; तसेच ‘जिव्हाळा’ अंकासाठी साहाय्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

उषा गर्भे यांनी विजेत्यांच्या यादीचे वाचन केले. कार्यकारिणी सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजाराम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.