Talegaon Dabhade News : राष्ट्रवादी पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांची निवड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते किशोर छबुराव भेगडे यांची निवड करण्यात आली. किशोर भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आरोग्य सभापती पदावर कार्यरत होते. यापदाला भेगडे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून योग्य न्याय देऊन तळेगांवकरासमोर ‘आरोग्य सेवेचा ‘ नवीन आदर्श ठेवला म्हणूनच भाजपची सत्ता असताना देखील किशोर भेगडे यांच्या कामाच्या शैलीमुळे त्यांना सभापती पद देण्यात आले. किशोर भेगडे यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, सामाजिक कामाची जाण लक्षात घेत त्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
किशोर भेगडे यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांची राष्ट्रवादी वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली.
राष्ट्रवादी मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या तळेगाव दाभाडे येथील कार्यालयात सोमवारी (दि.30) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते निवृत्ती उर्फ पुढारी दाभाडे यांच्या हस्ते किशोर भेगडे यांना निवडीचे पत्र दिले. मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, चंद्रकांत दाभाडे, बाबाजी गायकवाड यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
किशोर भेगडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आरोग्य सभापती म्हणून घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक मुक्तीसाठी कडक पाऊल उचलले. औद्योगिक क्षेत्रात हजारो तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. स्वच्छ, सुंदर व हिरवे तळेगाव दाभाडे शहर करण्यासाठी विशेष प्रयत्न तसेच मजबूत संघटन असलेले किशोर भेगडे यांची नाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मजबूत असल्याने पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.
किशोर भेगडे यांच्या निवडी बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी किशोर भेगडे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घेणार. आगामी काळातील निवडणूकीत राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होण्यासाठी अग्रेसर राहणार.