Blog by Rajan Wadke: यंदाचं वर्ष म्हणजे ‘प्रत्येक मासी दुःख मानसी’

यंदाचं 2020 वर्ष कोरोनाने झाकोळून गेलंय. वर्षाच्या प्रारंभापासूनच या विषाणूने जगभरात थैमान घालत महामारी सुरू केली.

एमपीसी न्यूज – यंदाचं वर्ष हे प्रत्येक मासी ‘दुःख मानसी’ सोसतच आपण सर्वजण जगतोय आणि जगावे लागणार आहे. मात्र, आपल्याला खचून चालणार नाही. सकारात्मक राहावे लागेल. सर्व समाजातून सकारात्मक राहात हा लढा सुरू ठेवावा लागेल. वाचा ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांचा ब्लॉग!


दुःख मानसी

यंदाचं 2020 वर्ष कोरोनाने झाकोळून गेलंय. वर्षाच्या प्रारंभापासूनच या विषाणूने जगभरात थैमान घालत महामारी सुरू केली. एकेक करत महामारीचा आकडा लाखांवर गेला. भारतातील कोरोनाबाधीत मृतांच्या संख्येने कालच दहा लाखांचा आकडा पार केलाय.

चीन, इटली, अमेरिका, भारत, महाराष्ट्र करत मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आपल्या घरापर्यंत कधी पोहोचला हे लोकांना कळले ही नाही. लॉकडाऊनमुळे कंपन्या, कारखाने, बँका, मॉल्स, बाजारपेठा, शाळा-कॉलेज बंद झाले. वर्क फ्रॉम होम, झूम किंवा गुगल मीटिंग्ज सुरू झाल्या.

प्रसार माध्यमांवर कोरोना बाधितांच्या, मृतांची वाढती आकडेवारी पाहात लोकांना भोवळ येऊ लागली. सोशल मीडियावर कोरोनाबाबत फिरणारे  उलट-सुलट आणि चक्रावून टाकणाऱ्या मेसेजेसमुळे समाजमन बधीर झालं.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणारी सरकारी यंत्रणा गलितगात्र झाली. त्यातच परिस्थितीचे गांभीर्य माहिती असतानाही बेलगाम वक्तव्य करणाऱ्या राजकारण्यांनी वातावरण गढूळ करून टाकलंय.

अशा परिस्थितीत रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, मावश्या यांच्यासह पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्था संघटनेचे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन कार्यरत आहेत. परिस्थिती भयाण आहे….

`घरात राहा, सुरक्षित राहा`, सामाजिक अंतर पाळा, मास्क लावा या मार्गदर्शक सूचनांचाही आता वीट आलाय. माणूस घाबरलांय. न्यूज चॅनेल पाहण्याची

हिंम्मत होत नाहीये. एफएम वरील गाण्यांनी मानसिक शांतता मिळत होती. पण आता दर्दभरी गाणीही ऐकावीशी वाटत नाहियेत.

कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटल्स, स्वॅब टेस्टिंग सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर, हॉस्पिटल फुल, ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर अशा प्रकारच्या चर्चा नकोशा झाल्यात. दूरवरून जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज कानावर पडला किंवा मोबाइलची रिंग वाजली की छातीत धस्स होतं.

मोबाईल हातात घेतला की, कोरोनावरील लस, प्रतिबंधात्मक उपाय-काढे अशा यू ट्यूबमुळे तसेच व्हॉटसअ‍ॅपवरील बी पॉझिटीव्ह, ओ पॉझिटीव्ह, ए निगेटिव्हचा प्लाझ्मा मिळेल का, अर्जंट हवाय, आपले मित्र, आमचे वडील, भाऊ, काकू तसेच पत्रकार, पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ता असे कोरोना योद्धा  अमुक-अमुक यांचे कोरोनामुळे  निधन झाल्याचे रोज शेकडो मेसेज पाहात मन हेलावतंय.

आपल्या माणसाच्या अंत्यसंस्काराला जाणे सोडाच नंतरही त्याच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन करण्याचेही धाडस राहिलं नाहिये आपल्यात. या अशा भयाण वातावरणात जगताना सण-वार कसले साजरे करतांय? रोजची तारीख-वार लक्षात राहात नाहिये तर सण कसा लक्षात राहील?

रंगपंचमीला यंदा आपले कपडे रंगलेच नाहीत. होळीला घरात बसूनच कोरोनाच्या नावानं बोंब मारली,  गुढी पाडव्याला गुढी उभारली ते आजूबाजूला बघत घाबरतच. ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे आणि इस्टर संडेही घरातच केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धाला मनातल्या मनातच नमन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला पोवाड्यांचा आवाज ऐकू आला नाही. छत्रपतींच्या नावाने घरातच जय जयकार केला. यंदा माऊली संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज तसेच अन्य संतांच्या पालख्यांबरोबर राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीला जाता आले नाही.

मुस्लिम बांधवांनी रमजान ईद, बकरी ईद घरातच साजरी केली. मोहरमच्या दिवशीही घरातच नमाज पढला. हे सर्व समाजबांधव केवळ परंपरा म्हणून घरबसल्याच सणाचा किंवा विशेष दिवसाचा केवळ उपचार करत आहेत.

दरम्यानच्या काळात कोरोना लवकरच जाणार, लस येणार, लस आली, कोरोना बरोबर जगायला शिका अशा स्वरूपाच्या गोंधळात टाकणाऱ्या बातम्यांचा मारा होतच राहिला. अशातच श्रावणाचे आगमन झाले, तेव्हा नकळत बालकवींची श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे…

ही कविता मनांत रुंजी घालू लागली. मात्र, काही वेळातच भानावर आलो आणि जाणवले यंदा हर्ष कसला यंदा तर `दुःख मानसी`. या जाणीवेने खूपच वेदना झाल्या. यंदा श्रावण बहरलाच नाही. ज्या कोणा भगिनीचा विवाह घरातच पार पडला असेल तिची मंगळागौर साजरी झालीच नाही.

यंदाचे रक्षाबंधन व्हर्च्युअल इ-राखीनेच झाले. गोपाळकाल्याला दहीहंडी फोडण्यासाठी ‘गोविंदा आला रे’चा आवाज देत गोविंदा रस्त्यावर येऊच शकले नाहीत. बळीराजांना पोळाही साजरा करता आला नाही.

पाठोपाठ येणाऱ्या आणि जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पुण्यासह राज्यात उत्साहाचे उधाण आणणारा गणेशोत्सवात गणपतीचे स्वागत शांततेच झाले. बाप्पाचा जयघोष झालाच नाही. बाप्पा कधी आले आणि त्यांच्या गावाला कधी गेले ते कळले ही नाही. मंडळांनी देखावेच उभारले नसल्याने गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र सामसूम होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर लक्ष्मी रस्त्यासह सर्वच रस्त्यांवर आसमंत भेदून टाकणाऱ्या ढोल-ताशा, झांजांचा निनाद झालाच नाही. होती केवळ हुरहुर लावणारी शांतता.

आता आगामी काळात येणाऱ्या नवरात्रांत यंदा भोंडल्याची गाणी कानावर पडणार नाहीत. विजयादशमीला बाहेर पडता आले नाही, तरी मानसिक सिमोल्लंघन करावेच लागेल.

दिवाळीला फराळाला मुरड घालावी लागेल. फटाक्यांची आतषबाजी करता येणार नाही. गुरु नानक जयंतीला गुरुद्वारांत जाता येणार नाही. ईद ए मिलादला प्रत्यक्ष शुभेच्छा देता येणार नाहीत.  यंदाच्या नाताळात एमजी रोड बहरणार नाही. सांताक्लॉज भेटीला येणार नाही. त्यामुळे वातावरण झाकोळलेलेच राहणार आहे.

हे वास्तव स्वीकारत पुढे जावे लागणार आहे हे निश्चित. यंदाचं वर्ष हे प्रत्येक मासी `दुःख मानसी` सोसतच आपण  सर्व जण जगतोय आणि जगावे लागणार आहे. मात्र, आपल्याला खचून चालणार नाही. सकारात्मक राहावे लागेल.

सर्व समाजातून सकारात्मक राहात हा लढा सुरू ठेवावा लागेल. सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला तरच आपल्या सर्वांना आनंदाने म्हणता येईल, श्रावण मासी हर्ष मानसी …. अन्यथा पदरी पडेल, दुःख मानसी…

 

– राजन वडके

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.