Pimpri : ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना यंदाचा स्वरसागर पुरस्कार

एमपीसी न्यूज – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना यंदाचा स्वरसागर पुरस्कार येत्या २३ जानेवारीला प्रदान करण्यात येणार आहे. हा सतरावा पुरस्कार असून यापूर्वी अनेक दिग्गज कलाकारांना स्वरसागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मानपत्र, रोख पंचवीस हजार, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  यंदा स्वरसागर महोत्सवाचे २१ वर्ष असून महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे २३ जानेवारी(गुरुवार) रोजी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे यांनी दिली आहे.

या पुरस्कार समारंभानंतर त्यांचे गायन होणार असून ही संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमाआधी संदीप ऊबाळे, योगिता गोडबोले आणि सुवर्णा राठोड यांचे मराठी सुगम संगीत देखील यावेळी होणार आहे. स्वरसागर महोत्सवातील हे सर्व कार्यक्रम निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर होणार असून दररोज सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम सुरु होतील.  हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून शरयूनगर मित्रमंडळ, प्राधिकरण यांचे या महोत्सवाला सहकार्य लाभले आहे.

यापूर्वी हा पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, उस्ताद अब्दुल हमीद जाफर खॉं, पं. अनिंदो चटर्जी, पं. सितारा देवी, पं. दिनकर कैंकिणी, पं. विद्याधर व्यास, पं. बिरजू महाराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, वसुंधरा कोमकली, डॉ. कनक रेळे, शाहिद परवेजखान, पं. सतीश व्यास, सुनयना हजारीलाल, पं. जसराज, पं. सुरेश तळवलकर आणि पं. उल्हास कशाळकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.