Coron Vaccine News : बूस्टर डोस घेण्यात ज्येष्ठांची आघाडी, तरुणांची पिछाडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत 35 लाख 91 हजार 752 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. लस घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु बूस्टर डोस घेण्याकडे तरुण वर्गाने पाठ फिरवली आहे. त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याला पसंती दिली आहे.

शहरात  45 ते 59 वयोगटातील 3873 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. तर, 18 ते 45 या वयोगटातील 2507  जणांनी डोस घेतला आहे. 60 वर्षांवरील 52, 193 ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. त्यानंतर 16, 716 आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्ट लाइन वर्कर यांनी बूस्टर डोस घेतला आहे.

शहरात सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. परिणामी, शहरातील एकाही रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण आहे. शहरात सध्या कोरोनाचे 83 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वच रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. लस घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने महापालिकेनेही केंद्र कमी केली आहेत. पूर्वी दिवसाला जवळपास 54 केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवण्यात येत होते. सध्या दिवसाला 19 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.

बूस्टर डोस कोण घेऊ शकतो?

18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस घेता येतो. ज्या नागरिकांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले आहेत. त्यांना बूस्टर डोस घेता येतो. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाइन वर्कर्स, 60 वर्षांवरील नागरिक यांनाच बूस्टर डोस दिला जात आहे. इतर वयोगटातील नागरिकांना खासगी रुग्णालयात बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर पैसे द्यावे लागतात.

कमी प्रतिसाद मिळण्याची कारणे

#बहुतांश नागरिकांनी पहिला, दुसरा डोस घेतला आहे.
#आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाइन वर्कर्स, 60 वर्षांवरील नागरिक यांनाच मोफत डोस.
#आता पूर्वीएवढी कोरोनाची भीती राहिली नाही.
#बूस्टर डोस कधी घ्यायचा याची अनेकांना माहिती नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.