Serial Shooting In New Rule: चित्रीकरणासाठीच्या नव्या नियमामुळे काही मालिकांचे प्लॉटच बदलणार

Serial Shooting In New Rule: The new rules for shooting will change the plot of some serial

एमपीसी न्यूज- राज्य सरकारने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मुंबईमध्ये या महिन्यात चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. या आदेशानुसार वयाने १० वर्षांपेक्षा लहान मुले आणि ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

कोरोनाचा प्रकोप उद्भवल्यामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत हा नियम लागू असणार आहे. त्यामुळे आता निर्मात्यांसमोर मोठे आव्हान आहे.

सोशल डिस्टन्सिंग आणि योग्य ते सॅनिटायझेशन या व्यतिरिक्त गर्दी न जमवणे असे काही नियम चित्रीकरणासाठी लागू आहेत. यातील एक म्हणजे वयाने १० वर्षांपेक्षा लहान मुले आणि ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे आता ज्या मालिकांमध्ये लहान मुले मुख्य भूमिकेत आहेत अशा मालिकांच्या निर्मात्यांसमोर मोठे आव्हान आहे.

कलर्स वाहिनीवरील ‘बॅरिस्टर बाबू’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकांमध्ये बालकलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे बॅरिस्टर बाबू मालिकेतील बोंदिता ही ९ वर्षांची मुलगी आता मोठी झाल्याचे दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

तिच्या भूमिकेसाठी सध्या निर्माते नव्या कलाकाराच्या शोधात आहेत. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीची या भूमिकेसाठी निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

तसेच अनेक मालिका, चित्रपटांमध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे अनेक कलाकार काम करतात. त्यामुळे चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी, ‘आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती आणि अनुपम खेर यांच्यासोबतच अनेक सिनिअर टेक्नीशियन्स देखील काम करतात. त्यामुळे या नियमांवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आम्ही याबाबत सरकारला विनंती करतो’ असे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.