Serial Swamini – मोठ्या रमाबाई कोण? या रहस्याचा आज उलगडा होणार

Serial Swamini - Who is the Big Ramabai? This mystery will be unraveled today : मोठ्या रमाबाईच्या पावलांनी आता शनिवारवाडा उजळणार आहे

एमपीसी न्यूज – ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेचे देखील चित्रीकरण सुरु झाले आहे. या मालिकेचे नवे भाग 21 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण आता यात छोट्या रमाबाई मोठ्या झाल्या आहेत.

रमा माधवाचे जीवन चित्रित करणारी ‘स्वामी’ ही कादंबरी प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे ‘स्वामिनी’ मालिकेत रमाबाई, माधवराव, गोपिकाबाई आणि इतर कुटुंबीय यांचे नातेसंबंध कसे गुंफले जाणार आहेत, याचे प्रेक्षकांना आकर्षण आहे.

निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडत आणि पेशवाई संस्कारात घडत असलेल्या आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आहेत. मोठ्या रमाबाईच्या पावलांनी आता शनिवारवाडा उजळणार आहे.

मोठ्या रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र, आज या रहस्याचा पडदा उघडणार असून मोठी रमा शनिवारवाड्यात येणार आहे.

अभिनेत्री रेवती लेले मोठ्या रमाबाईंची भूमिका साकारणार आहे. ‘स्वामिनी’ ही तिची प्रमुख भूमिका असलेली पहिलीच मालिका आहे.

छोट्या रमेची भूमिका ‘सूर नवा ध्यास नवा’ या सांगितिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सृष्टी पगारे हिने अतिशय समर्थपणे साकारली होती. तिने आपल्या निरागसपणाने आणि अवखळपणाने रमेला योग्य पद्धतीने रंगवले होते.

मात्र, आता करोनाच्या प्रादुर्भावामुळे लहान कलाकारांना अभिनय करण्यावर मर्यादा आल्या असल्याने मालिकेत सृष्टीच्या ऐवजी मोठ्या रमाबाईंची ‘एन्ट्री’ करावी लागली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.