Pune News : सिरमची लस अंतिम टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यातील नोंदणी प्रक्रिया पूर्ण 

एमपीसी न्यूज – सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर ‘कोव्हीशिल्ड’ लशीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती सिरमकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तब्बल 1600 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे.

सिरम आणि आयसीएमआर अमेरिकेच्या नोवावॅक्सच्यावतीने ‘कोव्हीशिल्ड’ ही लस विकसित करत आहेत. या दोन्ही संस्था कोव्होवॅक्सच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि संशोधनासाठी देखील एकत्र काम करत आहेत. सिरम इन्स्टिट्यूट या चाचण्यांची प्रक्रिया राबवत आहे. ‘कोव्हीशिल्ड’च्या चाचण्यांसाठी येणारा खर्च हा सीरमने तर शुल्कासंदर्भातील खर्च हा आयसीएमआरने उचलला आहे. या दोघांच्या भागीदारीतून ‘कोव्हीशिल्ड’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचण्यांसाठी देशात 15 ठिकाणची केंद्र निश्चित केली आहेत. या चाचण्यांसाठी लागणाऱ्या सोळाशे स्वयंसेवकांची नोंदणीची प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत सीरम आणि ‘आयसीएमआर’ने पूर्ण केली आहे.

सिरम इन्स्टिटय़ुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या लढय़ामध्ये आयसीएमआरचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. कोरोना प्रतिबंधासाठी गुणकारी लस विकसित करण्याच्या मोहिमेत भारताला अग्रभागी ठेवण्यासाठी सिरम आणि आयसीएमआर यांच्यातील भागीदारीने महत्वाची भूमिका निभावल्याचेही पूनावाला यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य सेवा आंतर्बाह्य़ परिपूर्ण करण्यासाठी कोरोनाने मोठी संधी दिल्याचेही पूनावाला यांनी यावेळी म्हटले आहे.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, लसीची निर्मिती आणि उत्पादनाच्या बाबत भारत सध्या जगामध्ये अग्रक्रमावर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याला मिळालेली प्रयत्नांची जोड या बळावर सिरमने आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत, असेही डॉ. भार्गव यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.