Bopodi : नोकरानेच केला मालकाच्या घरावर हात साफ

34 लाखांचे दागिने घेऊन नोकर फरार

एमपीसी न्यूज – घरकाम करणा-या नोकराने त्याच्या पत्नी आणि अन्य दोन जणांसोबत मिळून मालकाच्या घरात चोरी केली. चोरी करून चारही आरोपी फरार झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री साडेसात ते रविवारी (दि. 11) दुपारी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान भाऊ पाटील रोड बोपोडी येथे घडली.

आशिष जैन (वय 39, रा. कुंदन इस्टेट, शिवाजी गार्डन समोर, भाऊ पाटील रोड, बोपोडी) यांनी याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुकेश सिंग, सुरेंद्र सिंग, केशर शाही, पारो (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) (सर्व रा. नेपाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष जैन आणि त्यांचे कुटुंबीय शनिवारी रात्री साडेसात वाजता देवदर्शनासाठी भीमाशंकर येथे गेले होते. कुटुंबातील सर्वजण देवदर्शनासाठी गेल्यामुळे जैन यांचा बांगला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात होता. मुकेश सिंग त्यांच्या घरी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत सुरक्षा रक्षकाने त्याची पत्नी आणि अन्य दोन साथीदारांसोबत मिळून आशिष यांच्या वडिलांच्या खोलीच्या खिडकीचे लाॅक उचकटून त्याद्वारे घरात प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील कपाटात लॉकरमध्ये ठेवलेले डायमंड, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 34 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. जैन कुटुंबीय रविवारी दुपारी साडेपाच वाजता घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तपास यंत्रणा सतर्क केली असून एक पथक आरोपींच्या मागावर आहे. खडकी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.