Pimpri: ‘सारथी’वरील तक्रारींचा वेळेत निपटारा करा – महापौरांचे आदेश 

गणपती मंडळांना परवानगी देण्यासाठी 'एक खिडकी' योजना राबवा

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांनी ‘सारथी’ हेल्पलाईनवर केलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यात यावा. विविध कामासाठी पालिकेत येणा-या नागरिकांशी सौजन्याने वागणूक द्यावी. त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने  बुजविण्यात यावेत. तसेच साथीचे आजार होऊ नये यासाठी औषध फवारणीसह विविध उपाययोजना कराव्यात, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

तसेच अंदाजपत्रकातील कामे वेळेत पुर्ण करावीत. गणपती मंडळांना परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबविण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. महापौरपदी निवड झाल्यानंतर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) पालिकेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीला  ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसेविका साधना मळेकर, सारिका लांडगे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्यलेखापाल राजेश लांडे, मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

त्यानंतर  महापौर राहुल जाधव यांनी  पत्रकारांना बैठकीची माहिती दिली. शहरातील नागरिकांची भविष्यातील पाण्याची गरज विचारात घेऊन पाणी पुरवठ्याबाबत आत्तापासूनच उपाययोजना कराव्यात. अंदाजपत्रकातील कामांची योग्यरीतीने अंमलबजावणी करावी. सारथीवरील तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी. विविध कामासाठी महापालिकेत येणा-या नागरिकांशी सौजन्याने वागून वेळेत त्यांची कामे मार्गी लावावीत. नागरवस्ती विभागाच्या योजना शहरातील तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आदेश प्रशासनाला दिल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.

गणेश उत्सवामध्ये गणपती मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी. ड्रेनेज व पावसाळी गटारांचे प्रश्न उदभवू नये याची दक्षता घ्यावी.  विद्युत विषयक समस्या सोडविण्यासाठी
महावितरण समवेत संबधित अधिका-यांनी बैठक घेऊन धोकादायक डीपीबाबत उपाययोजना कराव्यात. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. शहरातील आरोग्य विषयक दक्षता घेण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ती औषध फवारणी करून डेंग्यू सारख्या आजारांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वृक्ष लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी उपाय योजना कराव्यात.

शहरातील कचरा दररोज गोळा करण्यात यावा. हॉकर्स झोनचा प्रश्न लवकर मार्गी लावावा. पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. मोकाट, उपद्रवी पाण्यांचा बंदोबस्त करण्यात यावे, असे निर्देश महापौर  राहुल जाधव यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. तसेच दहा दिवसानंतर याचा आढावा घेणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.