Chakan Crime News : बनावट चावीच्या साहाय्याने दुचाकी पळवणा-या तिघांना अटक; 14 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – बनावट चावीच्या साहाय्याने दुचाकी सुरु करून ती चोरून ट्रॅव्हल्सच्या डिक्कीमधून यवतमाळ, बुलढाणा यांसारख्या शहरात विक्रीसाठी पाठवणा-या तिघांना तसेच चोरीच्या दुचाकी विकत घेणा-या चौघांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अमित गोपाल तायडे (वय 27, रा. महाळुंगे, ता. खेड), श्रीकांत हरिदास चक्रनारायण (वय 31, रा. महाळुंगे, ता. खेड), गोपाळ सुभाष कांडेलकर (वय 27, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड) अशी वाहन चोरी करणा-या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह चोरीची दुचाकी खरेदी करणारे राजेश्वर हिरासिंग चव्हाण (वय 42), गजानन रामचंद्र चव्हाण (वय 35), दुर्योधन श्रीराम चव्हाण (वय 42, तिघे रा. कोहळा, पो. धामणगावदेव, ता. दारवा, जि. यवतमाळ), मोहन ओमकार सपकाळ (वय 32, रा. तालखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

महाळुंगे पोलिसांनी वाहन चोरी होणा-या परिसराची पाहणी करून 245 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच खब-यांकडून माहिती काढली. त्यात वॅरॉक कंपनीजवळ एक संशयित व्यक्ती वाहनांची पाहणी करताना पोलिसांना आढळला. त्याचा माग काढून त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी करत त्यांनी ज्यांना चोरीच्या दुचाकी विकल्या आहेत, अशा चार जणांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

वाहन चोरटे महाळुंगे पोलीस चौकी आणि मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहने चोरून ती ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतून बुलढाणा, यवतमाळ येथे विक्रीसाठी पाठवत होते. पोलिसांनी तीन लाख 21 हजारांच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, सारंग चव्हाण, उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, राजू कोणकेरी, राजू जाधव, अमोल बोराटे, अशोक जायभाये, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, प्रीतम ढमढेरे, श्रीधन इचके, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, शरद खैरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.