Sangvi : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात सांगवीतील बाप्पाला भक्तिभावाने निरोप

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरातील सात दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात गणपती विसर्जन करण्यात आले. भव्य मिरवणुका, आकर्षक सजावट आणि ढोल ताशांच्या पथकांसह गणपती बाप्पा गावाला गेला. दरम्यान विविध सामाजिक संघटना आणि संस्थांच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, रणझुंजार मित्र मंडळ, अभिनव तरुण मित्र मंडळ, जाणता राजा प्रतिष्ठान, शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळ, शिवशक्ती व्यायाम मंडळ, ढोरे नगर मित्र मंडळ, गंगानगर मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, नवयुग तरुण मंडळ, मुळानागर तरुण मित्र मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, बालाजी प्रतिष्ठान, सुवर्णयुग मित्र मंडळ,त्यानंतर अन्य गणेश मंडळांनी मिरवणुका काढल्या. ढोल-ताशा पथक, बँड पथक, डीजेच्या तालावर गणेश भक्तांनी नाचून गाऊन बाप्पाला निरोप दिला.

बाप्पांना निरोप देण्यासाठी सांगवीकर, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग सज्ज होते. प्रत्येकाने विसर्जनासाठी चोख तयारी केली होती. सांगवी पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सांगवी पोलीस ठाण्यात एकूण 156 गणेश मंडळांची नोंदणी करण्यात आली होती. त्याव्यतिरिक्त अन्य लहान मंडळे देखील आहेत. आज सर्व गणेश मंडळांनी विसर्जन केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन घाटांवर पोलिसांनी 5 पोलीस निरीक्षक, 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 150 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवला होता.
अग्निशमन विभागाने देखील विसर्जन घाटांवर चोख तयारी केली होती. गणेशोत्सवादरम्यान सांगवीसह पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 26 विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. सांगवी परिसरातील पवना नदीवरील सांगवी स्मशान घाट, दशक्रिया विधी घाट, वेताळबाबा मंदिर घाट, पिंपळे गुरव घाट, काटे पिंपळे घाट क्रमांक एक आणि मुठा नदीवरील पिंपळे निलख घाट या घाटांवर पथके तैनेत केली होती. पथकांमध्ये लिडिंग फायरमन, फायरमन यांचा समावेश होता. तसेच त्यांच्यासोबत लाईफ जॅकेट, लाईफरिंग, दोर, गळ असे अत्यावश्यक साहित्य दिले होते.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान परिसरात ध्वनी प्रदूषण होऊ नये. मोठ्या आवाजांचा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सांगवी पोलिसांचे ध्वनी प्रदूषण पथक तैनात करण्यात आले. या पथकाने ज्या मंडळाच्या मिरवणुकीत जास्त आवाज होत होता, त्या मंडळांना तात्काळ सूचना देऊन आवाज कमी करण्यास सांगण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत. नदीमध्ये गणेश विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम घाटांमध्ये विसर्जन करण्याचे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कृत्रिम विसर्जन घाटांमध्ये गणेश विसर्जन केले.



 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.