World Diabetes Day: जागतिक मधुमेह दिनानिमित्त सातशे रुग्णांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – जागतिक मधुमेह दिनाचे (World Diabetes Day) औचित्य साधून डॉ. गायकवाड डायबेटिस सेंटर, भोसरी येथे रविवारी(दि.13) सुमारे सातशे मधुमेही रुग्णांनी मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिरामध्ये रक्तशर्करा, रेटिनोपॅथी, डोळे आणि पायाच्या नसा, रक्तदाब आणि हृदयविकार या गोष्टींची विनाशुल्क तपासणी करण्यात आली. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी-2, डॉ अनुज कल्पतरू डायबेटिस अँड वेलनेस सेंटर यांच्या सौजन्याने जागतिक मधुमेह दिनानिमित्त भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात ‘डायबेटिस फेस्टिव्हल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लायन्स इंटरनॅशनल 3234 डी-2 चे प्रांतपाल राजेश कोठावदे, लायन्स क्लब अध्यक्ष जयश्री साठे, झोन चेअरमन सुदाम भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी साडेआठ वाजता डॉ. गायकवाड डायबेटिस सेंटर ते अंकुशराव लांडगे सभागृह मधुमेह जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यामध्ये भोसरी परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

School Education Minister Deepak Kesarkar: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा

‘रिव्हर्सल ऑफ डायबेटिस’ या विषयावर डॉ. अनू गायकवाड आणि ‘स्वादुपिंड प्रत्यारोपण’ या विषयावर डॉ. वृषाली पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांमधून सविस्तर माहिती दिली. सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग : तणावमुक्तीतून मधुमेहमुक्ती’ हा एकपात्री सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संभाजी डगळे (मधुमेह विजेता), मारुती शिंदे (मधुमेह उपविजेता) हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

तसेच हाजी अब्दुल शिकलगार, भरत दौंडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मधुमेह विजेत्या पुरस्कारार्थींना तहहयात मोफत तपासणी आणि औषधोपचार केले जातील, असे जाहीर करण्यात आले. जयश्री साठे यांनी स्वागत केले. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. रसिका खुरासणे, नारायण चिंचाणे, सोनू गव्हाणे, दशरथ चौधरी , राजाभाऊ खेत्री यांनी संयोजनात सहकार्य केले. मुरलीधर साठे आणि डॉ. शंकर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्वेता गायकवाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.