Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची पहिली कामगिरी; सराईत आरोपींकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त

15 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी तीन सराईत आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 7 लाख 53 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी, निगडी, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील एकूण 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. या कामगिरीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कामगिरीचे खाते उघडण्यात आले आहे.

निलेश मनोहर गायकवाड (वय 28, रा. विद्यानगर बस स्टॉपच्या मागे, चिंचवड), शंकर मधुकर पवार (वय 19, रा. निराधारनगर झोपडपट्टी, पिंपरी. मूळ रा. पिनोर, ता. मोहोळ), समीर मुख्तार शेख (वय 24, रा. आंबेडकर कॉलनी, सरकारी दवाखान्याजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली) आणि विकास दिलीप कांबळे (वय 26, रा. पत्राशेड, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई रोहित पिंजरकर यांना सराईत आरोपी निलेश गायकवाड परशुराम चौक, विद्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून गायकवाड याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सात मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 2 लाख 35 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील सहा आणि निगडी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात वाहनचोरीचे गुन्हे उघड झाले.

पोलीस हवालदार राजेंद्र भोसले यांना माहिती मिळाली की, शंकर आणि समीर हे दोघे पिंपरी मधील साई चौकाजवळ असलेल्या भुयारी मार्गात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकातील पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण आठ मोटारसायकल, एक एलईडी टीव्ही, एक डीव्हीडी असा 4 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघड झाले आहेत.

पोलीस शिपाई उमेश वानखडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास भटनागर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विकास आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे. एक लोखंडी कोयता आणि होंडा ऍक्टिव्ह मोपेड असा एकूण 76 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला. यावरून विकास याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, शाकीर जिनेडी, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, पोलीस शिपाई संतोष भालेराव, रोहित पिंजरकर, उमेश वानखडे, विद्यासागर भोते, अविनाश देशमुख, गणेश खाडे, नामदेव राऊत, गणेश करपे, सोमेश्वर महाडिक, विकास रेड्डी, विष्णू भारती यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.