BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पीडित मुलीने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना देहूरोड येथे 2018 मध्ये घडली.

सचिन उर्फ हानी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. देहूरोड. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकर कॉलनी, देहूरोड येथे पीडित मुलीची आई घरकामाची कामे करते. आई घरकाम करत असताना पीडित मुलगी बाहेर थांबली. त्यावेळी आरोपी तिथे आला आणि त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तीन महिन्यांनी पीडित मुलगी आरोपीला तिथेच दिसली. त्याने तिला कॉलनीमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार त्याने दोन ते तीन वेळा केला.

पीडित मुलीचे वडील तापट स्वभावाचे असल्याने मुलीने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी तिच्या अचानक पोटात दुखू लागले. यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले असता ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पीडित मुलीने देहूरोड पोलिसात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.