स्वातंत्र्यसमरातील बलिदानाची प्रेरणादायी कहाणी: शहीद भाई कोतवाल

लेखक: हर्षल आल्पे

भारतीय स्वातंत्र्यसंग्राम हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक रोमहर्षक टप्पाच! त्यातल्या प्रत्येक पैलूवर एक- एक रोमांचक चित्रपट होऊ शकतो. खरतर प्रत्येक चित्रपटकर्त्याला हा विषय खुणावत असतो, म्हणून तर भगतसिंह, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रपुरुषांवर अनेक चित्रपट होतात, त्यांची घोषणा होते. त्यातून सर्वश्रुत नसलेल्या पण तरीही भारतमातेसाठी केलेल्या त्यागावर, बलिदानावर  तितकाच रोमहर्षक चित्रपट होऊ शकतो, हा ‘शहीद भाई कोतवाल’च्या चित्रपटकर्त्यांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

कधी कधी विषय सादरीकरणापेक्षा जास्ती वरचढ असतो, विषयाला भारावून चित्रपटाला गेल्यावर चित्रपट सादरीकरणात काही तरी राहतंय  अस वाटत राहते, या कोड्यात चित्रपट अख्खा संपून जातो.

शहीद  भाई कोतवाल या चित्रपटाचे झाले आहे , चित्रपटात अभिनय जरी दोन पातळ्यांवरचा जरी वाटत असला तरी अनुरूप आहे, संगीत ही चांगलय, सिनेमॅटोग्राफी जमलेली आहे,  तरीही कुठे तरी काही तरी राहिलेले आहे. आशुतोष पत्कीने साकारलेला शहीद भाई कोतवाल त्याने समजून उमजून केला आहे, त्यात नवखेपण कुठेच जाणवत नाही, पंकज विष्णू, अरुण नलावडे, गणेश यादव, निशिगंधा वाड, सिध्देश्वर झाडबुके, कमलेश सावंत, परेश हिंदुराव, मौसमी तोंडवळकर,रुतुजा बागवे, प्राजक्ता दिघे, निरंजन खाडे आदींनी समर्थ साथ दिली आहे.

दिग्दर्शनाच्या पातळीवर तांत्रिक बाजू जरा कमकुवत वाटत होती, मध्यंतराच्या आधी चित्रपट हा तुटक वाटतो, एकसंधपणाचा अभाव वाटतो, मध्यंतरानंतर चित्रपट मात्र अपेक्षित वेग पकडतो. संवाद अजून चित्रपटाअनुरुप आणि व्यक्तीरेखांना अनुरूप असते तर अजून मजा आली असती. चित्रपटात येणारी गाणी  श्रवणीय वाटत असली तरी प्रसंगानुरूप होण्यात कमी पडल्याने त्याचा काही ठिकाणी अडथळाच वाटतो. काही ठिकाणी लिपसिंग ही नीट झाले नाहीये, म्हणजेच आवाज आधी येतो आणि ओठनंतर हलतात, शेवटचा प्रसंग मात्र आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो.

एकूणच हा चित्रपट एकदा बघण्यासारखा निश्चित आहे, या निमित्ताने आपल्याला इतिहासातले, त्यागाचे, बलिदानाचे, राष्ट्रभक्तीचे सुवर्णपान पुनश्च उलगडले गेले आहे. या निमित्ताने या संपूर्ण टीमचे कौतुकच केले पाहिजे. यातूनच प्रेरणा घेऊन अशा विसरलेल्या बलिदानाचे स्मरण आपल्याला निश्चित राहील आणि आपली देशभक्ती अधिक जागरूक होऊन काही तरी भरीव काम करण्याची प्रेरणा निश्चितच आपल्याला या निमित्ताने मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like