Nigdi: शाहिरा शीतल कापशीकर यांनी पोवाड्यातून केली कोरोनाविषयी जनजागृती (Video)

एमपीसी न्यूज – कोणतीही लढाई असली तरी शाहीर स्वस्थ बसू शकत नाही. कोरोना विरुद्धच्या लढाईत देखील शाहिरांनी उडी घेतली आहे. पिंपरी-चिंचवडमधील शाहिरा शीतल कापशीकर यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्याचा पोवाडा लिहून आणि सादर करीत कोरोनाविषयी जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.

 

शीतल कापशीकर लिखित कोरोना पोवाडा नक्की वाचा….

 

अहो ऐका शाहिरेची वाणी ssss
गाते या कोरोनाची कहाणी …..
आला कुठून कुठला कोरोना । एक विषाणू । मोडतोय कणा।
आपण बीमोड त्याचा करू । सगळे मिळून काही पथ्ये पाळू ।
विघातक गोष्टी करणे टाळू हो जी जी जी ।।१।।

 

तीन महिने जाहले पुरे । विषाणू सापडे । जग हळहळे ।
चायना देशात सुरुवात झाली । कुणाला कळून नाही आली ।
जगभर पसरत गेली हो जी जी जी ।।२।।

 

पर्यटनाची हौस ती भारी । अंगाशी आली । साथ पसरली ।
संसर्ग जगभरात झाला । प्रसार हळूहळू वाढत गेला । कोविड १९ ठेवले नावाला ।
आशियाई आखाती देशात पोचला । युरोप खंडाला गिळू लागला ।
बलाढ्य अमेरिकेला विळखा घातला । येऊन धडकला भारतभूला हो जी जी जी ।।३।।

 

सुरू मनी चलबिचल । उठले काहूर । बातम्यांचा धूर । सोशल मीडियावर पसरला ।
करावा कसा मुकाबला । कसे वाचवावे देशाला । सव्वाशे कोटी जनतेला ।
हाकलावे कसे कोरोनाला हो जी जी जी ।।४।।

 

केरळ ही देवभूमी जरी । रुग्ण पहिला । सापडे तिच्यावरी । उपाययोजना सुरू झाली ।
तपासणी होऊ लागली वेगळी । विलगीकरण कक्ष उघडला । वैद्यकीय ताफा राबू लागला ।
लढाईचा बिगुल बघा वाजला हो जी जी जी ।।५।।

 

सरकारने केले आवाहन । काळजी घ्यावी हेच रक्षण । शिवजयंतीचा उत्सव झाला ।
उत्साह नव्हता उत्सवाला । तेरा तारखेच्या दुपारी । मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ।
शाळा कॉलेज बंद बघा झाली । आता लढाई मोठी सुरू झाली ।
घरी बसून काम करावे । सार्वजनिक ठिकाणी न जावे । देऊळे राऊळे बंद झाली ।
मॉल संस्कृतीही विरून गेली । रेल्वेगाड्या मेट्रो बसगाड्या । निम्म्या केल्या तयांच्या फेऱ्या ।
खाजगी कार्यालये कंपन्या । पन्नास टक्के चालू लागल्या ।।६।।

 

आता सुरू दुसरी पायरी । रुग्णसंख्या वाढे । काळजी भारी । परी डॉक्टरांचे कमाल पथक ।
राबती सतत रात्रंदिवस । रुग्णांची काळजी ते घेती । स्वतःची पर्वा ही करती ।
मेडिकल ताफा भारतभरी । डॉक्टर नर्सेस कर्मचारी ।
नमन करू आपण त्यांना त्रिवारी हो जी जी जी ।।७।।

 

देशाच्या सीमा सील झाल्या । निर्णय मोठा । उपयोग झाला । रोगाला प्रतिबंध केला ।
प्रवासी प्रत्येक तपासला । काही केले होम क्वारंटाईन ।
काहींना कक्ष विलगीकरण । सुरू जाहले उपाययोजन हो जी जी ।।८।।

 

मंडळी हो आपल्यासाठी बघा राबती किती हात ।
आपण काही गोष्टी पाळून त्यांना देऊया छान साथ ।
घरात बसून काम करू स्वच्छताही जास्त पाळूया ।
हॅन्डवॉश सॅनिटायझर वापरून आपुलेच रक्षण करूया ।।९।।

 

आपली भारतीय संस्कृती । श्रेष्ठ आहे किती । ऐका महती ।
आपण नमस्कार करतो । समोरच्याला राम राम म्हणतो । आता जग तसेच करू लागले ।
हस्तांदोलन नको म्हणू लागले । कोरोनाच्या भीतीने हे घडले ही जी जी ।।१०।।

 

अवघे काही तास विषाणू । जिवंत राही । भीती नका मानू । इकडे तिकडे हात लावू नका ।
सर्दी खोकला किरकोळ समजू नका । ताबडतोब औषध उपचार घेता ।
कोरोनाचा नाही बघा धोका । अफवांवर विश्वास ठेवू नका हो जी जी ।।११।।

 

२२ मार्च दोन हजार वीस । ऐतिहासिक । समजू दिवस ।
संचारबंदी पाळू दिवसभर । पाच वाजता टाळ्या वाजवूया । कृतज्ञता मनी जागवूया ।
सहा वाजता ओंकार ध्यान । करूया परमेश्वर स्मरण । कोरोना जाईल बघा पळून हो जी जी जी ।।१२।।

 

जरी संकट हे अस्मानी । हलविले जग । जागेवरूनी । तरी माणुसकी दिसून आली ।
आपल्या संस्कृतीची ओळख पटली । आपल्या सरकारची जागरूकता ।
रोगावर मात करणे क्षमता । जगालाही मान्य होईल आता हो जी जी ।।१३।।

 

जरी झाली असेल काही चूक । घ्यावी पदरात । मानूनि लेक ।
योगेश्वराला मनी स्मरते । शीतल पोवाडा रचते । शीतल पोवाडा गाते ।
परमेश्वराला साकडे घालते ।कोरोनाचे संकट दूर होऊ दे ।
व्यवहार सुरळीत चालू दे । विश्वात सुख शांती नांदू दे हो जी जी जी ।।१४।।

 

शीतल कापशीकर लिखित कोरोना पोवाडा नक्की ऐका….

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.