Talegaon Dabhade News : गणसंख्ये अभावी सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची सत्ताधारी भाजपवर नामुष्की

एमपीसी न्यूज  : व्हिडिओ काॅन्फ्रसिंगद्वारे घेण्यात आलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गणसंख्ये अभावी तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी पक्षावर ओढवली. याचा निषेध नोंदवत विरोधीपक्षाने सभेवर बहिष्कार टाकत मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.

तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फ्रसिंगद्वारे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेला विरोध करून विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती, जनसेवा विकास समिती यांच्या वतीने मुख्याधिकारी दीपक झिंजाड व नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना सभागृहात सभा घेण्यात यावी अशी विनंती करून खुल्या चर्चेद्वारे 107 विषयांच्या विकास कामांचे निर्णय करण्यात बाबत सुचविले होते. मात्र नगराध्यक्षांनी अशा पद्धतीने सभा घेण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका व आरोप केले होते.

दरम्यान तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा नगराध्यक्षानी आयोजित केली होती. या सभेपुढे एकून सर्व विभागाचे १०७ विषय होते. मात्र या सभेस सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अवघे ८ सदस्य सहभागी झाले होते. तर सत्तारुढ भारतीय जनता पक्षाचे ५ नगरसेवक व जनसेवा विकास समितीचे ७ तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ७ नगरसेवक असे १९ नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे गणसंख्ये अभावी नगराध्यक्षांना सभा तहकूब करावी लागली.

या ऑनलाईन सर्वसाधारण सभेला भाजपचे सभागृह नेते अमोल शेटे, अरुण भेगडे पाटील, विभावरी दाभाडे,शोभा भेगडे, काजल गटे, संध्या भेगडे, कल्पना भोपळे, प्राची हेंद्रे हे सदस्य उपस्थित होते.

सभा तहकूब होताच विरोधकांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी मुख्याधिकारी कक्षात विरोधी पक्षनेते गणेश काकडे, गटनेते किशोर भेगडे, गणेश खांडगे,उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, अरुण माने,मंगल भेगडे, संगीता शेळके,हेमलता खळदे,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अखेर गणपूर्ती अभावी सभा रद्द करण्याचा निर्णय जगनाडे यांनी जाहीर केला. दरम्यान विरोधी पक्षांच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक यासह कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त केला.

यावेळी विरोधीपक्षांच्या  वतीने मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना निवेदन देण्यात आले. विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, नगरसेवक किशोर भेगडे, गणेश खांडगे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे आदींनी भाषणे केली.

गेली काही वर्षे विकास कामे ठप्प झाली असून अनुशेष वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अवेळी व कमी दाबाने पाणीपुरवठा, फिल्टर योजना चुकीची व अपूर्ण असल्याचे ही नमुद करण्यात आले आहे. भुयारी मार्गालगतची, उद्यान रस्त्याची कामे चालू नाहीत. विकास कामांचे योग्य नियोजन करण्यासाठी सभागृहात सभा घेण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी   तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, तळेगाव शहर सुधारणा विकास समितीचे गट नेते किशोर भेगडे, जनसेवा विकास समितीचे गटनेते गणेश खांडगे, तळेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे, तळेगाव नगरपरिषदेच्या  उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुनिता काळोखे, नगरसेविका सुलोचना आवारे,  माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे माजी नगराध्यक्ष  कृष्णराव कारके, विजय काळोखे, सुदर्शन खांडगे, विशाल पवार, सूर्यकांत काळोखे, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आशिष खांडगे, ओंकार जाधव, तुषार काळोखे, रुपाली दाभाडे, निशा पवार, विद्या भोसले, ज्योती शिंदे कौसल्या काळोखे, विणा करंडे आदी  कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.