Bhatnagar Award : पुण्यातील अमोल कुलकर्णी यांच्यासह राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार 

एमपीसी न्यूज – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत. राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 45 वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. सीएसआयरचे संस्थापक संचालक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञानात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत. अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर के ल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम के ले आहे. तसेच भारतातील पहिली ‘मायक्रोरिअ‍ॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ. कुलकर्णी यांना जातो.

भटनागर पुरस्कारासह डॉ. कुलकर्णी आणखी एका सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठीही त्यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असून त्याद्वारे त्यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

डॉ. सूर्येदू दत्ता आणि डॉ. यू. के आनंदवर्धन आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. डॉ. दत्ता हे भूवैज्ञानिक असून, डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत. डॉ. दासगुप्ता भाभा अणू संशोधन केंद्रात काम करतात. शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) 79 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.