Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख -12 – अभिनेता राजकिरण माहतानी

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : तो दिसायला अतिशय सुंदर असा होता. (Shapit Gandharva) त्याचे व्यक्तिमत्त्व एकदम रूबाबदार होते. त्याला अभिनयाची उत्तम जाण सुद्धा होती. त्याने 100 हून अधिक यशस्वी चित्रपटांत काम केले होते. ऋषी कपूर, दीप्ती नवल हे त्याचे अतिशय जवळचे मित्र होते. 80 च्या दशकातल्या अतिशय व्यस्त अशा चित्रपटताऱ्यांतला तो एक चमचमता तारा होता. मात्र, अचानक तो गायब झाला. हळूहळू त्यावर दबक्या, मग मोठ्या आवाजात चर्चा झाली, वेगवेगळ्या अफवाही उडाल्या. मात्र, या अतिशय कठोर आणि कामापुरता मामा हे तत्त्व मनोभावे जपणाऱ्या चित्रपटसृष्टीने त्याचे नसणे अगदी सोयीस्करपणे स्वीकारले आणि त्यावर शिक्कामोर्तब करून त्याचा विसरही पाडून घेतला. आजही तो नक्की कुठे आहे? तो जिवंत तरी आहे का? याबद्दल सुद्धा कोणालाही माहिती नाही. इतकेच नाही तर त्याच्या घरच्यांनी सुद्धा त्याचा तपास घेतला नाही. यापेक्षा मोठा शाप कुठला असू शकतो? सांगा बरे.

80च्या दशकातला एक रूबाबदार, यशस्वी असा कलाकार म्हणजे ‘राजकिरण’ उर्फ ‘राजकिरण माहतानी’ याच्या (Shapit Gandharva) कारकिर्दीचा आढावा घेताना हे अतिशय कटू सत्य मनाला हजारो इंगळ्यांच्या डंखासारखे मनाला वेदना देते. या मायावी नगरीचे एक रूप अतिशय झगमगीत, मनाला मोह पाडणारे, भुरळ घालणारे आहे, तर याची दुसरी बाजू अतिशय हिणकस अशी आहे. इथे केवळ आणि केवळ उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. जोवर तुमच्या नावावर आमदनी होते, तोवर तुम्ही प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत असता. तुम्हाला माणूस न म्हणता थेट देवाचा दर्जा दिला जातो. मात्र एकदा का जर तुमच्या नावापुढचे वलय संपले, की दुसऱ्याच क्षणी तुम्हाला धान्यातल्या एखाद्या खड्यासारखे फेकून दिले जाते. कालपर्यंत आपल्या आसपास, मागे-पुढे फिरणारे आज ओळखही दाखवत नाहीत, ही बोचरी जाणीव मनाला प्रचंड ताप देते, वेदना देते आणि मग हे दुःख पचवायला फारच अवघड जाते. ज्यांचा जिगरा मजबूत असतो, ते यातूनही तावून-सुलाखून बाहेर पडतात; पण कमजोर काळजाचे मात्र या धक्क्याने अक्षरशः उध्वस्त होतात, व्यसनाधीन होतात आणि मग ….

 मनाला अतिशय विषण्ण  करणारे आहे हे कटू सत्य. दुर्दैवाने हे सर्वच राजकिरणच्या वाट्याला आले आणि ते त्याला स्वीकारता आले नाही; अन् त्याहून कितीतरी अधिक पचवताही आले नाही. त्यामुळे त्याची इतकी वाताहत झाली की अतिशय उमदा, उत्तम आणि दर्जेदार कलाकार शब्दशः गायबच झाला. तो कुठे आहे?आहे की नाही, हे आजही कोणी ठामपणे सांगू शकत नाही. अन् हे जेंव्हा आपण एक सामान्य माणूस म्हणून बघतो, तेव्हा मनात एकच येते- खेळ कुणाला दैवाचा कळला! बरोबर ना?

19 जून 1949 साली त्याचा जन्म मुंबई येथे झाला. तो एका सिंधी परिवारात जन्माला आला होता. त्याचे सर्व बालपण मुंबईतच गेले. बालपणापासूनच त्याला रूपेरी पडद्यावर झळकण्याची इच्छा होती. त्यातच त्याला परमेश्वराने चांगले व्यक्तिमत्त्व बहाल केले होते. तो दिसायला अतिशय देखणा होता. त्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरले, जेव्हा त्याला बी. आर. इशारा यांच्या ‘कागज की नाव’ या चित्रपटात त्या काळची लोकप्रिय अभिनेत्री सारिकाचा हिरो म्हणून संधी मिळाली. त्याचा हा पहिला चित्रपट 1975 साली आला होता. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. पुढच्या पाच वर्षात त्याचे करियर आणखीनच बहरले. त्याचे बऱ्यापैकी यशस्वी ठरलेले आठ चित्रपट या दरम्यान आले, ज्यात अर्थ, राजतिलक, साजन मेरा,मैं साजन की, शिक्षा, मान- अभिमान, एक नया रिश्ता आणि सुपरहिट ठरलेला कर्ज. यामुळे त्याची कारकीर्द एकदम बहरली आणि त्याच्या यशाची गाडी एकदम सुसाट सुटली. मुख्य नायक म्हणून त्याने काही चित्रपटात काम केले, ज्यातल्या त्याच्या कामाची चांगलीच प्रशंसाही झाली. कागज (Shapit Gandharva) की नाव, मान- अभिमान या चित्रपटातल्या कामाने त्याला नाव आणि मानही मिळवून दिला. त्याने सर्व प्रकारच्या भूमिका केल्या; पण बऱ्याचदा त्याचे रोल सहनायक किंवा नायकाचा भाऊ, मित्र असेच होते. अर्थ चित्रपटातल्या त्याच्या रोलचेही चांगलेच कौतुक झाले. त्याने या दरम्यान बघता-बघता जवळपास 100 हून अधिक चित्रपटात छोटे-मोठे रोल करत आपली स्वतःची एक ठोस ओळख निर्माण केली होती.

सगळे काही चांगले चालू असताना 1990 साली त्याच्या आयुष्यात अचानकपणे चित्र-विचित्र स्थित्यंतरे घडायला लागली. त्याला काम मिळणे अचानक बंद झाले. त्यामुळे तो एकदम निराश झाला. त्यातून कसेबसे सावरत 1994 साली त्याने शेखर सुमनसोबत दूरदर्शनवरील ‘रिपोर्टर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र अचानकपणे आलेल्या या अपयशाने तो नैराश्याच्या खोल गर्तेत गेला. असे म्हटले जाते की त्याला मानसिक आजार जडला होता, त्यातून त्याला वेडाचे झटके येत होते. यात खरे किती खोटे किती देव जाणे, पण त्याला भायखळ्याच्या मानसोपचार दवाखान्यात भर्ती केले होते. मात्र त्याची का कोण जाणे कोणीही दखल घेतली नाही. त्यानंतर तो तिथूनही गायब झाला असे बोलले जाते. कोणी म्हणतं तो अमेरिकेत गेला. तिथे तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. कोणी म्हणतं त्याच्यावर तिथे उपचार व्हावेत म्हणून त्याला अमेरिकेत नेले होते. त्यातच एकदा सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याची सहकलाकार दीप्ती नवल हिने त्याच्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती, तर ऋषी कपूरने म्हणे त्याला अमेरिकेत टॅक्सी चालवताना पाहिले. या बातम्या आल्यानंतर त्यावर बऱ्यापैकी चर्चा झाली, खळबळही माजली; पण ती क्षणिकच. त्याच्या घरच्यांनी सांगितले की तो अचानक गायब झालाय आणि त्याबद्दल त्यांनी पोलिसात रीतसर तक्रार नोंदवली आहे आणि त्यावर तपासकार्य चालू आहे. कोणी म्हणाले त्याच्या घरच्यांनी त्याच्या सोबत फसवणूक केल्याने तो वेडा झाला. कोणी त्याला सत्यसाईबाबाच्या बंगलोरजवळील आश्रमात संन्यासी अवस्थेत पाहिले असेही छातीठोकपणे सांगितले. प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने प्रसिद्धीच्या हव्यासाने काही न काही सांगत होता, मात्र तो कुठे आहे आणि आहे की नाही, हे ना तेव्हा कळाले ना आजही कळते आहे की तो गेला तर नक्की कोठे गेला?

RPF central railway : आरपीएफ मध्य रेल्वेने 10 महिन्यांत 1236 मुलांची केली सुटका

आंतरजालावर(गुगलवर)त्याच्याबद्दल अनेकविध बातम्या आहेत. त्यातलीच एक की त्याच्या पत्नीने (रूपा माहतानी) त्याची वाट पाहणे सोडून दुसरा विवाह केला आहे. त्याला रिशिका म्हणून एक मुलगी आहे. तिने 2011 साली एका प्रेसनोटद्वारे असे सांगितले होते की तो अटलांटा येथे सापडला आहे, ही बातमी चुकीची असून न्यूयॉर्क पोलीस आणि खासगी गुप्तहेर त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यानंतर मात्र त्याचे पुढे काय झाले हे कळत नाही. त्याच्या मुलीनेही तिचा बालपणापासूनचा मित्र असलेल्या रवी शाह बरोबर लग्न केले असून ती मुंबई येथे ज्वेलरी डिझाइनर म्हणून आपल्या व्यवसायात बऱ्यापैकी स्थिरस्थावर आहे. बाकी सगळे आपापल्या आयुष्यात सुखी असले, तरी राजकिरण मात्र अचानकपणे  कुठे गायब झाला, हे कोडे आजही कोणालाही सोडता आले नाही, हे अतिशय कटू असे सत्य आहे.

त्याचा शोध ना त्याच्या घरच्यांनी घेतला ना त्याच्या जिवावर (Shapit Gandharva पैसे कमावलेल्या निर्मात्यांनी, हेच खरे आहे. आणि हे सत्य अतिशय वेदनादायक आहे. कारकीर्द जोरात असताना ,पैसा-अडका, मान-सन्मान सर्व काही मिळत असतानाही तो अचानक कुठे गेला? का गेला?या प्रश्नांना ना तेव्हा उत्तर मिळाले ना आजही मिळत आहे.

एखाद्याला अचानकपणे इतके द्यायचे की तो त्या चमत्काराने भांबावून जावा. हे सत्य आहे की स्वप्न याचा विचार करत असतानाच त्याला हे सत्य आहे, याची एका क्षणी जाणीव होताच, दुसऱ्याच क्षणी ते सत्य नसून एक भयंकर दुःस्वप्न होते, हे कटू सत्य त्याला दाखवणे हा परमेश्वराचा अतिशय  आवडता असा खेळ आहे. हा खेळ तो का खेळतो हे कोणालाही आजतागायत समजले नाही, मग आपल्याला कसे समजेल सांगा बरे?

राजकिरण जिथे कुठे असेल तिथे तो आनंदात असावा इतकीच प्रार्थना आपण करूया!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.