Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग – 28 – प्रतिभावंत पण तितकाच कमनशिबी इरफान पठाण

एमपीसी न्यूज : त्याला स्विंगचा बादशाह म्हणून ओळखले जात होते. कुठल्याही देशाच्या खेळाडूने कसोटीतल्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेण्याचा विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याच्याकडे उपजत अष्टपैलूत्व होते. त्याने सर्वात कमी (59) सामने खेळून आंतरराष्ट्रीय (Shapit Gandharva) एकदिवसीय सामन्यात बळीचे शतक पूर्ण करून अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एवढेच नव्हे, तर त्याने आपले अष्टपैलूत्व सिद्ध करताना सर्वांत जलदगतीने 1000 धावा आणि 100 विकेट्सही पूर्ण केल्या होत्या; जो आजही एक अनोखा असा विक्रम असून अजूनही अबाधित आहे.

‘भावी कपिलदेव’ म्हणून त्याला ओळखण्यात येऊ लागले होते. अर्थात कपिल, बोथम, इम्रान, सर गारफील्ड सोबर्स सारखी अफाट प्रतिभा असलेले अष्टपैलू खेळाडू परमेश्वर एकदाच तयार करतो आणि नंतर कदाचित तो तो साचा कुठेतरी अडगळीत टाकून देतो किंवा पुन्हा तसे काही करायचेच नाही,असा मानस करतो. आपल्याला मात्र फार घाई असते; म्हणूनच आपण नवा कपिल, भावी सचिन, प्रती अमिताभ असे शोध लावत बसतो. कधी-कधी असे वाटते की आपला शोध संपला. आपण ‘युरेका-युरेका’ ओरडायला लागतो आणि ही सर्व गंमत बघून तो वरचा एक छद्मी हास्य करत आपल्या त्या शोधाचा एकाच क्षणात बट्ट्याबोळ करून टाकतो. अगदी असेच काहीसे क्रिकेटपटू इरफान पठाणच्या बाबतीतही झाले. त्याची एकंदरीत कारकीर्द बघण्याआधी तुम्हाला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपणाबद्दल अगदी थोडक्यात सांगतो.

27 ऑक्टोबर 1984 रोजी बडोदा येथे त्याचा जन्म झाला. त्याचे बालपण अतिशय खडतर होते. खाणारी अनेक तोंडे आणि कमावणारा एकच असे असल्याने अगदी बालपणापासून त्याच्या भाळावर कष्ट लिहिले होते. बडोदा येथे त्याचे वडील मोहम्मद पठाण हे एका मशिदीसमोर अत्तर विकत असत आणि तिथेच राहत असत.  इरफानच्या आईचे नाव सामीबानू पठाण. इरफानला युसूफ नावाचा एक भाऊ (त्याने सुध्दा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे) आणि शगुफ्ता नावाची एक बहीण सुद्धा आहे.

इरफान आणि युसूफ हे दोन्ही भाऊ बालपणापासूनच क्रिकेटचे प्रचंड वेडे होते आणि यातही विशेष बाब अशी की आपली परिस्थिती हलाखीची असूनही मो. पठाण यांनी दोन्हीही मुलांना क्रिकेट खेळण्यापासून कधीही अडवले नाही. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना इरफानने आपल्या (Shapit Gandharva) चांगल्या खेळाने सर्वानाच प्रभावित केले. बघता-बघता त्याची निवड बडोदाच्या संघात झाली, तेव्हा तो फक्त 17 वर्षाचा होता. यानंतर त्याची  प्रगती अतिशय झपाट्याने होत गेली.

Kasba Chinchwad Bye-Election Result : कसबा,चिंचवडमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार, कोण मारणार बाजी?

बंगालविरुध्द खेळताना त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात दोन्ही डावांत मिळून 5 गडी बाद केले आणि पुढील काहीच दिवसांत त्याने 19 वर्षाखालील संघात स्थान प्राप्त करत आधी न्यूझीलंड दौरा केला; जेथे त्याने 6 बळी मिळवलेआणि नंतर लगेचच इंग्लडचा दौरा केला, जो त्याने 9 गडी बाद करत संस्मरणीय केला. त्याचे नशीब इतके जोरदार होते की त्याला यानंतर थेट भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान मिळाले आणि दौऱ्यातल्या दुसऱ्याच सामन्यात मुख्य गोलंदाज झहीर खान जायबंदी झाल्याने ऍडीलेड  कसोटीत पदार्पण केले. या कसोटीत त्याची कामगिरी फारशी विशेष नसली, तरी त्याने या दौऱ्यात एका अप्रतिम स्विंगवर ऍडम गिलख्रिस्टला त्रिफळाबाद करून सर्वांनाच प्रभावित केले.

याच दौऱ्यात त्याने एकदिवसीय सामन्यातूनही पदार्पण केले. ही खरे तर तिरंगी स्पर्धा होती,ज्यात यजमान ऑस्ट्रेलियासोबत भारत आणि झिम्बाब्वे संघाने भाग घेतला होता. यानंतर तो कसोटी संघात जरी नियमित नसला, तरी एकदिवसीय संघात बऱ्यापैकी स्थिरावला होता. (Shapit Gandharva) यानंतर आलेल्या पाकिस्तान दौऱ्यात खेळताना त्याने कराचीतल्या पहिल्या कसोटी सामन्यातल्या पहिल्याच षटकात ‘हॅटट्रिक’ नोंदवून ‘असा विक्रम करणारा कसोटी विश्वातला पहिला खेळाडू’ हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला, जो आजही अबाधित आहे. या दौऱ्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी करत 12 गडी बाद करून आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत सर्वांनाच प्रभावित केले.

जगातल्या सर्वोत्तम डावऱ्या गोलंदाजांतला एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या माजी कर्णधार वसीम अक्रमने तोंडभरून केलेल्या कौतुकामुळेही त्याचे नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. उत्तम स्विंग गोलंदाजी, उपयुक्त फलंदाजी यामुळे तो अल्पावधीतच संघात स्थिरावला. पुढच्याच वर्षी झालेल्या पहिल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात जिंकली; ज्यात युवराजसिंग, धोनी एवढाच मोठा वाटा इरफानचाही होता. त्यानंतर त्याने बांगलादेशविरुद्ध  झालेल्या दौऱ्यातही उत्तम कामगिरी करत ‘एका सामन्यात दोन्ही डावात मिळून दहा गडी बाद’ करण्याचा पराक्रम केला आणि आपल्या कारकिर्दीत प्रथमच ‘मालिकावीर’ होण्याचा बहुमानही पटकावला. तो संघाचा अविभाज्य भाग होतोय, असे सर्वांनाच वाटायला लागले.

याच दरम्यान भारतीय संघात स्थित्यंतरं व्हायला सुरुवात झाली आणि ‘ग्रेग चॅपेल’ नावाचा एक ग्रहही भारतीय संघाच्या राशीला लागला होता. त्याने इरफान पठाणला ‘विश्वातला सर्वात मोठा अष्टपैलू’ बनवून दाखवण्याचा (की त्याची कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा?) विडा उचलला होता, परमेश्वरालाच माहीत.(Shapit Gandharva) पण ग्रेग चॅपेलचा संघाला फायदा कमी अन् तोटाच जास्त होत होता. त्याने इरफानसोबत अनेक नको ते प्रयोग करायला सुरुवात केली. कधी त्याला तीन नंबरला फलंदाजीसाठी पाठव, तर कधी सलामीलाच पाठव. यात पठाण आपली मुख्य भूमिका गोलंदाजाची आहे हेच जणू विसरला. त्याची जलदगती गोलंदाजी त्यामुळे बोथट होत गेली. त्यातच जलदगती गोलंदाज आणि दुखापती यांचे जणू जन्मोजन्मीचे घट्ट नाते आहे.

सगळे काही चांगले चालले आहे असे वाटत असतानाच इरफानच्या बाबतीतही असेच घडले. गुरू चॅपेलचे अभिनव प्रयोग आणि पाठोपाठ आलेल्या दुखापती यामुळे इरफानच्या करियरला लागलेले ग्रहण त्याची उमलू लागलेली कारकीर्द उद्ध्वस्त करू लागले. त्यातच त्याच्या पाठीशी कोणी मजबूत गॉडफादर नसल्याने संघातून गमावलेले स्थान त्याला पुन्हा परत मिळू शकले नाही.

केवळ 29 कसोटी सामने आणि आणि 107 एकदिवसीय सामने खेळल्यानंतर वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी इरफान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडला. त्याच्या नावावर कसोटीत 100, तर एकदिवसीय सामन्यात 152 विकेट्स आहेत. तर फलंदाजीतही त्याने आपला दमखम दाखवताना कसोटीत 1 शतक आणि सहा अर्धशतकं केली आहेत. त्याच्या नावावर 1,105 कसोटी धावा, तर एकदिवसीय सामन्यांत 5 अर्धशतकांसह 1,368 धावा केल्या आहेत. टी-20 प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने फक्त 24 सामने खेळले आणि तो भारताने जिंकलेल्या एकमेव टी-20 विश्व करंडक स्पर्धेतल्या संघाचा मोठा हिस्सा होता. अंतिम सामन्यात तो सामनावीरही होता.

खरेतर त्याच्या प्रतिभेच्या मानाने ही आकडेवारी अतिशय किरकोळ आहे; पण सत्यही हेच आहे. कुठल्याही खेळाडूला मोठी आणि प्रदीर्घ कारकीर्द करायची असेल, तर त्याला कर्णधाराचा विश्वासू असणे अतिशय गरजेचे असते. सगळेच सचिन, लारा, गावसकर या महान लिजेन्ड्ससम आपल्या एकट्याच्या जीवावर प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द करूच शकत नाहीत. कदाचित नैसर्गिक प्रतिभेच्या वरदानासोबत परमेश्वराने त्याला अल्प कारकिर्दीचा शाप दिला असेल कोणास ठाऊक. पण इरफानमध्ये नक्कीच मोठा खेळाडू होण्याची क्षमता होती. दुर्दैवही हेच की त्याला आपली निवृत्ती सुद्धा पुन्हा परतण्याची वाट पाहून कंटाळून प्रेसच्या माध्यमातून करावी लागली.

Pune : कलापिनी साहित्य मंचाच्या वतीने ‘मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न

निवृत्तीनंतर त्याने समालोचनाच्या माध्यमातून आपली दुसरी इंनिंग सुरू केली. त्याने ‘झलक दिखला जा’ या टिव्हीवरील लोकप्रिय शो मध्येही भाग घेतला होता. नुकताच त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून त्याचा ‘कोब्रा’ नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.(Shapit Gandharva) हैदराबाद येथील सुप्रसिद्ध मॉडेल सफा बेग सोबत त्याने निकाह केला असून त्याला दोन मुले आहेत. आपल्या भावासोबत त्याने बडोदा येथे क्रिकेटअकादमीही सुरू केली आहे. त्याने काही दिवस कश्मीर क्रिकेट संघाची कोचिंगही केली आहे. एकंदरीत आपल्या देशातल्या क्रिकेटपटूला एकदा संधी मिळाली की आर्थिक ददात उरत नाहीच. त्याच न्यायाने इरफानचेही उत्तम चालले आहे.

खंत इतकीच की एक उत्तम अष्टपैलू खेळाडू भारतीय क्रिकेटला मिळालेला असतानाही त्याचा योग्य तो विनिमय झाला नाही. ती कसर इरफानने आपल्या क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून पूर्ण करून भारतीय क्रिकेटला एक नव्हे, तर असंख्य दर्जेदार अष्टपैलू खेळाडू द्यावेत, इतकीच अल्लाहकडे प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.