Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 32 – अनग्रेसफुल ग्रेसी

एमपीसी न्यूज : तिने छोट्या पडद्यावर आधी मायबाप (Shapit Gandharva) प्रेक्षकांना आपल्या लोभस रूपाने आणि सशक्त अभिनयाने भुरळ पाडली, ती इतकी होती की त्या यशाने तिला मोठ्या पडद्यावरही थेट नायिकेच्या भूमिका मिळवून दिल्या. तिचे हिरो कोण होते, कल्पना आहे? अमीर खान, संजय दत्त, अजय देवगण ही सुपरस्टार आणि चित्रपटसृष्टीतली वजनदार नावे.

बरं तिला फक्त यांच्याबरोबर काम करायला मिळाले असेच नाही, तर तिने यांच्याबरोबर केलेल्या चित्रपटांनी घवघवीत यशही मिळवले. तिचे नाव मोठमोठ्या नायिकांच्या शर्यतीत दिमाखात झळकत होते. चित्रपटसृष्टीला एक नवीन महानायिका लाभलीय असे वाटत असतानाच ती अचानकपणे आधी या यादीतून, मग स्पर्धेतून आणि मग आपसूकच चित्रपटसृष्टीतूनही बाहेर पडली. आणि आज तर ती कुठे आहे हेही कोणाला माहिती नाही.

लगान, गंगाजल, मुन्नाभाई mbbs अशा एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटांची नायिका, ‘अमानत’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेतली लोकप्रिय कलाकार म्हणून आजही सच्च्या रसिकांच्या मनात असलेली ग्रेसी सिंग म्हणजेच आजच्या लेखातील शापित गंधर्व.
20 जुलै 1980 साली नवी दिल्लीतल्या एका शीख कुटुंबात जन्मलेली ग्रेसी सिंग म्हणजेच एक पंजाबी कुडी.घरातले मोकळे वातावरण आणि आई-वडिलांनी मुलांना दिलेलं स्वातंत्र्य यामुळे ग्रेसीला जे जे करावे वाटले, त्यासाठी तिच्या आई-वडिलांनी प्रोत्साहनच दिले.

त्यातच ग्रेसीलाही आपल्याला काय करायला हवे याची जाण कळत्या वयापासूनच होती. म्हणूनच तिने दिल्ली येथील ‘द प्लॅनेट’ या सुप्रसिद्ध संस्थेच्या माध्यमातून भरतनाट्यम् चे शास्रोक्त शिक्षण घेतले. याच दरम्यान तिला 1997 साली झी टिव्ही वरील ‘अमानत’ या मालिकेत चांगली भूमिका मिळाली, जिचे तिने सोने करत आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच दरम्यान तिला आशुतोष गोवारीकर आणि अमीर खान यांनी कुठेतरी बघितले आणि त्यांना सापडली लगानची गौरी. या चित्रपटात दस्तुरखुद्द अमीरखानची नायिका होण्याच्या तिला मिळालेल्या संधीचे तिने सोने केले आणि या चित्रपटाने प्रचंड यश मिळवून ग्रेसी सिंगला एकाच चित्रपटाच्या यशाने लोकप्रियता मिळवून दिली.

Bhosari : भाजपचे आमदार महेश लांडगे धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

कमालीचा सोज्वळ चेहरा, खानदानी, सात्विक सौंदर्य, सोबत त्याला प्रगल्भ अभिनयाची जोड यामुळे ग्रेसी सिंग निर्मात्या, दिग्दर्शकांची पहिली पसंत होवू लागली. मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट, सुपरस्टार नायक सहकलाकार म्हणून तिला मिळू लागले. हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच भविष्याची चाहूल घेतली जाते असे म्हणतात. भावी सुपरस्टार ,भावी रेखा, भावी माधुरी शोधण्याची प्रत्येकाला कोण घाई असते! अशातल्या अनेकांना ग्रेसीचे भविष्य ग्रेसफुल आहे असे वाटायला लागले होते. त्यानंतर तिला सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी आपल्या गंगाजल या चित्रपटातही अजय देवगणच्या पत्नीची भूमिका दिली. संजय दत्त बरोबरही मुन्नाभाई mbbs या चित्रपटात ती झळकली. हे दोन्हीही चित्रपट चांगलेच यशस्वी ठरले. ग्रेसी आता नक्कीच लंबी रेस वाली असणार असे वाटत होते.

पण का कुणास ठाऊक! इथेच तिच्या करियरला कुणाची तरी नजर लागली. यशस्वी अभिनेत्री ठरूनही, मोठमोठ्या बॅनरच्या चित्रपटांत झळकूनही, मेगास्टारसोबत रूपेरी पडदा शेअर करून सुद्धा तिला पुन्हा कामेच मिळेनाशी झाली. बरं असेही नव्हते की तिने आपले मानधन वाढवले होते. पण कुठेतरी काहीतरी बिघडले होते हे नक्की. तिला यानंतर कोणीही काम दिले नाही. त्यात आपले मार्केटिंग करण्यात तिला म्हणावा तसा उत्साहही नव्हता किंवा ते करण्यात ती पूर्णपणे अपयशी ठरली, कमी पडली. परिणामी ती हळूहळू एका कोपऱ्यात पडली, एकटी. जणू ती कोणाला आठवतही नव्हती. दुर्दैवाने तिला कोणी गॉडफादरही नव्हता. तिला फिल्मी पार्ट्या, गॉसिपिंग अशा गोष्टी करता येत नव्हत्या. त्यामुळेच ती बघता-बघता चित्रपटसृष्टीच्या कधी बाहेर पडली, नजरेआड झाली तिचे तिलाच समजले नाही. आपल्याला चित्रपट मिळत नाहीत हे सत्य तिला उमगले.

तिने पुन्हा छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा (Shapit Gandharva) वळवला. धार्मिक मालिकांचा आपल्याकडे खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे, हे लक्षात घेऊन तिने ‘जय संतोषी माँ’ नावाच्या मालिकेत मुख्य भूमिका केली. पण इथेही तिच्या रुसलेल्या नशिबाने तिला हात दिला नाही. निराश होऊन तिने 2009 साली नृत्यप्रशिक्षण देणारी अकादमी सुरू केली. त्याचसोबत तिने अविवाहित राहण्याचे ठरवत स्वतःला प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेसोबत जोडून घेतले.

आता ती पूर्णवेळ तिथे साधिका म्हणून कार्यरत आहे. आता ती 43 वर्षांची असून आता रूपेरी पडद्यापासून पूर्णपणे विभक्त झाली आहे, असेच नाईलाजाने म्हणावे लागते. असे म्हटले जाते की (सत्य काय ते मला अजिबात माहिती नाही)84 योनीच्या फेऱ्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. आपला जन्म कोठे व्हावा, कसा व्हावा हे कोणालाही माहिती नसते.तो वर बसलेला कधी तरी एखाद्या जीवावर प्रसन्न होतो, पृथ्वीतलावर पाठवतो आणि त्याचसोबत देतो यश, पैसा, मानमरातब, प्रतिष्ठा. इतके देतो की एखाद्याला हेवा वाटावा. ज्याला दिलेय त्याला वाटते त्याच्यासारखा सुखी तोच.

इथेच कदाचित कळत नकळत ‘माझ्यासारखा मीच’ अशी भावना मनात येते, रुजते, बळावते. आपल्याला माहीतही नसते पण ‘त्याचे’ लक्ष असतेच. ही भावना त्याच्या लक्षात आली की तो छद्मी हास्य करतो आणि आपली कृपादृष्टी जरा बाजूला वळवतो. बास हाच तो क्षण जो होत्याचे नव्हते करतो. कदाचित असेच काहीसे ग्रेसीच्या बाबतीतही घडले असेल का?नसेलही कदाचित पण कुछ तो हुवा ही था, म्हणूनच सर्व काही असूनही ती यशाचे शिखर हस्तगत केल्यानंतरही त्यावर विराजमान होवू शकली नाही.

आता ती यशस्वी ठरल्याने न आपल्याला काही फायदा होतो (Shapit Gandharva) ना तिच्या अपयशाने आपले काही नुकसान होते. तरीही आपण एखाद्याच्या यशाने हुरळून जातो अन अपयश दिसताच हळहळ करतो; कारण आपण असामान्य नसतो. आपण असतो साधे जीव ज्यांना अशा प्रकारच्या चर्चेत खूपच उत्साह असतो. बरोबर ना? ग्रेसीचे उर्वरित आयुष्य ग्रेसफुल असो इतकीच ‘त्याच्याकडे’ मनापासून प्रार्थना!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.