Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 15 – दिव्या भारती

एमपीसी न्यूज : काळजाचा ठाव घेणारे टपोरे डोळे, अप्रतिम लावण्य, अभिनयाची चांगली जाण, नृत्याचे अचूक ज्ञान- हे एक उत्तम अभिनेत्री होण्यासाठी (Shapit Gandharva) लागणारे सर्व काही तिच्याकडे उपजत होते. वयाच्या अठराव्या वर्षीच ती मायावी नगरीत आली. रूपेरी पडद्यावर अधिराज्य करू लागली. तिला एकापेक्षा एक मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळू लागले. तिच्या प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी उचलून धरावे, असा जणू शिरस्ताच पडायला लागला होता. ती म्हणजे चित्रपटसृष्टीची नवी सुपरस्टार नायिका अशी चर्चा सर्वत्र चालू असताना वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षीच तिचे निधन झाले. आजही ते निधनच होते की घातपात की आत्महत्या, हा तिच्यावर 90 च्या दरम्यान अतोनात प्रेम करणाऱ्या अगणित चाहत्यांना पडलेला यक्ष प्रश्नच आहे.

दिव्या भारती ही रूपेरी पडद्यावर आलेली 1990 च्या दशकातली लावण्यवती. या सौंदर्य सम्राज्ञीचा जीवनपट म्हणजे एक तीन तासांचा अतिशय यशस्वी पण मनाला हुरहूर लावणारा चित्रपटच जणू. 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या दिव्या भारतीचे वडील ओमप्रकाश भारती हे भारतीय जीवन विमा महामंडळमध्ये (एलआयसी) नोकरीला होते. तिचे शिक्षण मुंबईच्या जुहू येथील माणेकजी कूपर हायस्कूलमध्ये झाले होते. दिव्या घरातली मोठी मुलगी होती. तिला आणखी एक बहीण व एक भाऊ होता. मुंबईत जन्मलेल्या दिव्या भारतीचे इंग्लिश, हिंदी या भाषांबरोबरच मराठी भाषेवरही चांगले प्रभुत्व होते. ती अभ्यासात मात्र साधारणच अशी मुलगी होती.

तिला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. म्हणूनच वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ती प्रादेशिक (Shapit Gandharva) चित्रपटातून रूपेरी पडद्यावर आली. हिंदी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता गोविंदाचा भाऊ आणि ‘हत्या’ या लोकप्रिय चित्रपटाचा दिग्दर्शक कीर्तीकुमार याने तिला जेव्हा प्रथम पाहिले, तेव्हा तिला त्याने आपल्या ‘राधा का संगम’ या चित्रपटासाठी साईन केले होते. पण, नंतर काही कारणास्तव तो चित्रपट तिच्या हातून गेला. (तो नंतर जूही चावलाच्या नावावर लागला.) त्यानंतर तिला ‘गुनाहों का देवता’ या चित्रपटासाठीही निर्देशित केले गेले; पण हा चित्रपटही तिच्या हातून गेला. तिचा रोल संगीता बिजलानीने केला. मात्र, यामुळे निराश न होता तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला.

वेंकटेशसोबत तिने केलेला चित्रपट ‘बोबली राजा’ हा खूप यशस्वी ठरला. त्यामुळे तिचे नाव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एकदम चर्चेत आले. त्यानंतर आलेल्या ‘निलापंने’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ माजवला. या चित्रपटामुळे तिला अल्पावधीतच जबरदस्त लोकप्रियता मिळाली. ती त्यावेळी तिकडच्या ‘विजयाशांती’ या लोकप्रिय नायिकेनंतर सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती. तिला ‘साऊथची लेडी अमिताभ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. साहजिकच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही होऊ लागली आणि राजीव राय या सुप्रसिद्ध निर्मात्याने तिला आपल्या मल्टीस्टारर चित्रपटात घेतले. ज्याचे नाव होते ‘विश्वात्मा’.

यात तिचा हिरो होता सनी देवल. यातले तिचे ‘सात समंदर पार मैं तेरे’ हे गाणे प्रचंड गाजले. याच चित्रपटाने तिला ‘पदार्पणातली लक्षवेधक अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळवून दिला. टपोरे डोळे, चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि चांगला अभिनय यामुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विविध सिने मासिकात तिचे फोटो, मुलाखती येवू लागल्या. तिचा चेहरा बराचसा श्रीदेवी सारखाही दिसत असल्याने तिला ‘भावी श्रीदेवी’ म्हणूनही संबोधण्यात येऊ लागले. यानंतर तिचा अजून एक चित्रपट आला ‘दिल का क्या कसूर’. ज्यामध्ये तिचा हिरो होता, पृथ्वी (आठवतोय का?) यानंतर आला तो तिला ओळख मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे ‘शोला और शबनम’ ज्यामध्ये तिचा हिरो होता गोविंदा. अनुपम खेर, गुलशन ग्रोवर, मोहनीश बहल असे आणखी कलाकारही या चित्रपटात होते. पांढऱ्या मिनी स्कर्टमध्ये ती कमालीची मादक आणि लोभसही (Shapit Gandharva) दिसली. या चित्रपटाने तिला आणखी नावलौकिक मिळवून दिला. आणि त्यानंतर लगेचच आला तो तिला नायिका म्हणून स्थैर्य देणारा, नावलौकिक मिळवून देणारा आणि बॉलीवूडमध्ये आपली पाळेमुळे घट्ट रोवून देणारा, सोलो नायिका म्हणून प्रचंड हिट ठरलेला ‘दीवाना’ हा चित्रपट. ‘मार डालूँगी’ हा डायलॉग तिच्या तोंडी या चित्रपटात सारखा होता, जो तिला फार सूटही झाला. उफ! तिची ती मादक नजरच खूप घायाळ करणारी होती. त्यात ती असे म्हणाली, की प्रेक्षकांना वाटे ती आपल्यालाच म्हणत आहे. या चित्रपटाने तिला एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना म्हणूनही स्थापित केले.

या चित्रपटाने तिला लोकप्रियतेबरोबरच अनेक पुरस्कारही मिळवून दिले. यामुळे तिच्या नावाची एकच चर्चा सर्वत्र होऊ लागली. हिंदी सिनेसृष्टीत नेहमीच नवीन सुपरस्टारची चर्चा घडवली जाते असे म्हणतात. तेव्हा श्रीदेवीने रेखाची मक्तेदारी संपवून आपल्या नावाचा झेंडा गाडायला सुरुवात केली होती. तिचे ते तोडकेमोडके हिंदी, मीडियापासून अंतर ठेवून वागणे यामुळे नाराज असलेल्या काही तथाकथित समीक्षक मंडळींना दिव्या भारतीचा टवटवीत चेहरा जास्तच आपला आणि सुपरस्टार पदासाठी परफेक्ट वाटू लागला होता. तिनेही बघता-बघता अनेक चित्रपट साईन करून आपली लोकप्रियता कॅच करायला सुरुवात केली होती. तिची घोडदौड जोरात सुरू असतानाच 1993 साली ‘ती’ वाईट बातमी आली.

तिच्यापुढे उज्ज्वल भवितव्य असताना ती शोला और शबनमच्या सेटवर प्रख्यात निर्माता साजिद नाडियाडवालाच्या संपर्कात गोविंदामुळे आली आणि असे म्हणतात, की तिने त्याला आपले ह्रदय पहिल्याच भेटीत अर्पण केले. एवढेच नाही, तर आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या आणि अगोदरच विवाहित असलेल्या नाडीयाडवालाशी लग्न करण्यासाठी तिने आपला धर्म बदलून इस्लाम धर्मही स्वीकारला. तिला तिच्या जवळच्या अनेकांनी समजावूनही सांगितले; पण इश्क का बुखार चढलेल्या या नवथर सौंदर्यवतीला कशानेही फरक पडला नाही आणि तिने सर्व भिंती पाडून साजिदबरोबर 10 मे 1992 रोजी विवाहही (निकाह) केला. अर्थात प्रेमात माणूस काय नि स्त्री काय, बऱ्याचदा आंधळे झालेले असतात. नव्याचे नऊ दिवस पार पडले की चेहऱ्यावरचे बुरखे आपोआप उतरायला सुरुवात होते. अफवा आहे, की सत्य आहे ते तिला, त्या साजिदला, त्या वरच्या परमेश्वराला माहिती; पण असे म्हटले जायचे की लग्नानंतर काही दिवसांतच दिव्या भारतीला आपला निर्णय चुकलाय असे वाटायला लागले होते. यातूनच ती बऱ्याचदा नैराश्यात जात असे (बोलीभाषेत डिप्रेशन). यातूनच एके दिवशी म्हणजेच 5 एप्रिल 1993 रोजी वयाच्या (Shapit Gandharva) अवघ्या 19 व्या वर्षी ती आपल्या वर्सोवा येथील घरी असताना पाचव्या मजल्यावरील आपल्या घराच्या बाल्कनीतून खाली पडून तिचा मृत्यू झाला.

Melodies of Asha Bhosale Quiz 3 : जिंका ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’च्या दोन प्रवेशिका!

त्यावेळी ही बातमी दूरदर्शन आणि रेडिओवरून प्रसारित झाली होती. मला आजही आठवते, तेव्हा मी लातूर येथे डिप्लोमा इन फार्मसीच्या अंतिम वर्षात होतो. ही बातमी ऐकून तिच्या अनेक चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता. तिने नैराश्यातून उडी मारून आत्महत्या केली, अशीही चर्चा त्यावेळी सर्वत्र गाजत होती. हळूहळू त्या सर्वांवर पडदा पडत गेला. मात्र, आजही तिच्या मृत्यूच्या जवळपास 29 वर्षानंतरही तिचा मृत्यू हे एक कोडेच आहे. ज्याचा कोणालाही उलगडा झाला नाही. प्रचंड श्रीमंत असलेल्या साजिद नाडियाडवालावर दिव्या भारतीच्या मृत्यूसंदर्भात अनेक आरोप झाले; पण त्यातून तो सही-सलामत सुटला. दिव्याच्या अकाली निधनानंतर तिने साईन केलेले अनेक सिनेमे पुढे जगरहाटीनुसार दुसऱ्या नायिकेला घेऊन प्रदर्शित झाले. हळूहळू तिचा विसर सर्वांना पडत गेला. पण एक निरागस, उज्ज्वल कळी फुलण्याआधीच कोमेजून गेली, हे सत्य आजही मनाला अस्वस्थ करत राहते!

दिव्या जिथे असेल तिथे ती खुश असेल आणि तिच्या पावन आत्म्याला सद्गती मिळाली असेलच, नाही का?

-विवेक कुलकर्णी

सौजन्य
गुगल विकिपीडिया

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.