Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 31 – एकाकी लीना चंदावरकर

एमपीसी न्यूज : तिचे सौंदर्य एकदम दैवी देणं होते. ती अतिशय (Shapit Gandharva) शालीन दिसायची, कुलीन घरातलीही होती ती. तिचे सौंदर्य इतके विशेष होते की एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेली नर्गीस तिला पहिल्यांदा पाहताच हिचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, अशी तिला खात्रीही पटली. तिला यश मिळालेही ….पण ते नेहमीच शापित राहिले.

‘जाने क्यों लोग मुहब्बत किया करते हैं’ हे गाणे आजही कानाला त्याच्या प्रदर्शनानंतरच्या जवळजवळ 51 वर्षांनंतही तितकेच कर्णमधुर वाटते आणि बघतानाही ते तितकेच प्रेक्षणीयही. या गाण्यामुळे सुप्रसिद्ध झालेल्या एकेकाळच्या या शापित सौंदर्यवतीचे जीवन बघताना परमेश्वराच्या करणीने मन अतिशय खट्टू झाल्याशिवाय राहत नाही. लीना चंदावरकर या अभिनेत्रीचे आयुष्य म्हणजे खरोखरच एक खूप मोठी शोकांतिका आहे.

29 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकमधल्या धारवाड येथील कर्नल श्रीनाथ धारवाडकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ते एक आर्मी अधिकारी होते. तिला अशोक नावाचा आणखी एक भाऊही होता. तिच्या वडिलांच्या नोकरीनिमित्ताने हे कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास होते. तिचे वडील आधुनिक विचारसरणीचे होते. लीनाचे बालपण आणि शिक्षण मुंबई येथेच झाले. तिला शिक्षणात फारशी रुची नव्हती.

तिला चित्रपटसृष्टीचे प्रचंड आकर्षण होते. ध्यानी, मनी ,स्वप्नी तिला रूपेरी पडद्यावर नायिका म्हणून झळकण्याचेच वेध लागले होते. असे सांगितले जाते की, शाळेत असताना मोठेपणी तुम्ही कोण होणार असे विचारल्यावर ती बिनदिक्कतपणे मला नायिकाच व्हायचे आहे असे सांगायची. ज्यामुळे तिच्या शिक्षिकेने तिला शिक्षाही केली होती; कारण त्यावेळी चांगल्या घरातल्या मुली चित्रपटसृष्टीत जाणे चांगले मानले जात नसे. पण जबरदस्त इच्छाशक्ती असल्याने लीना यांनी (Shapit Gandharva) आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करणे सोडले नाही.

त्यांचे लोभस, आकर्षक रूप कोणालाही आवडावे असेच होते. त्यांच्या तीव्र इच्छाशक्तीचा विजय झाला अन् त्यांना पहिल्याच चित्रपटात नायिका म्हणून काम करायची संधीही मिळाली. हा चित्रपट सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांनी निर्माण केला होता आणि या चित्रपटात तिचा नायक होता द हँडसम विनोद खन्ना. अस्सल मर्द ,राजबिंडा विनोद आणि सौंदर्याची खाण लीना चंदावरकर ही देखणी जोडी असलेल्या या चित्रपटाद्वारे लीना यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने सुनील दत्त यांच्या पत्नीने म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसजी यांनी पहिल्यांदा जेव्हा लीनाला बघितले, तेव्हा त्या जणू तिच्या प्रेमातच पडल्या आणि त्यांनी स्वतःहून तिला अभिनयाचे धडे दिले. ही असते परमेश्वर एखाद्यावर प्रसन्न झाल्याची अनुभूती.

सुनील दत्त सारखा महान अभिनेता त्यांना नायिका म्हणून प्रमोट करतो, पडद्यावर विनोद खन्ना नायक असणे आणि साक्षात नर्गिसजींनी अभिनयाचे धडे देणे यापेक्षा मोठे नशीब खुलणे तरी काय असते हो? आणि याला चार चांद लागले ते या चित्रपटाच्या यशाने. लीना चंदावरकर यांनी नंतर मागे वळून बघितलेच नाही. अनेक मोठमोठ्या समीक्षकांनी त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे कशीदे गात त्यांच्या पुढील उज्ज्वल भवितव्याची नांदी दिली. यानंतर हमजोली, मेहबूब की मेहंदी, रखवाला, कैद, नालायक, डाकू और जवान अशा आणखी काही यशस्वी चित्रपटांनी त्यांचे स्थान आणखीनच मजबूत केले. अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वासोबत अभिनयाची उत्तम जाण त्यांना यशस्वी तारका बनवून गेले. अतिशय सुंदर आणि भरभराट असलेला सुवर्णकाळ होता त्यांचा. ‘चारो उंगलियांँ घी में और सर कढाई में’ असे काहीसे. अगदी तरूणवयातच मिळालेल्या यशाने त्या खूपच आनंदी होत्या. सुखाच्या परमोच्च शिखरावर विराजमान होत्या जणू. पण सगळे चांगले सुरू असले की त्याला कोणाची ना कोणाची तरी नजर लागतेच ना?

लागलीच! अशीच नजर लागली त्यांच्या सुखाला अन् यशालाही. कारकीर्द उत्तम सुरू असतानाच त्यांनी विवाह करण्याची हिंमत दाखवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यशस्वी अभिनेत्रीने लग्न करणे म्हणजे आपल्या हाताने आपल्या कारकिर्दीचा खून करणे असाच काहीसा समज असलेल्या चित्रपटसृष्टीला लीनाजींनी यशाच्या शिखरावर असताना लग्न करणे खूप चुकीचे वाटत होते.

पण लीनाजींनी जगाचा विचार न करता गोवा येथील एका मातब्बर ,राजकीय क्षेत्रातले एक वजनदार नाव असलेल्या बांदोडकर कुटुंबातील सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी रेशीमगाठ बांधत सातजन्म एकमेकांना साथ देण्याचे वचन देत वैवाहिक आयुष्यात पदार्पण केले. चित्रपटसृष्टीत धमाकेदार सुरुवात करणाऱ्या लीनाच्या वैवाहिक आयुष्यात एक मोठा धमाका झाला; पण तो दुर्दैवी अर्थाने. लग्न झाल्यानंतर अगदी काहीच दिवसानंतर त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले अन् लीना चंदावरकर शब्दशः कोसळून गेल्या. या दुःखात अधिक भर पडली जेव्हा पतीच्या आकस्मिक निधनानंतर लीनाजींना अतिशय विचित्र आरोपांना सामोरे जावे लागले.

ज्याने त्या मानसिकरित्या पूर्णपणे खचल्या. त्यांना कशातच उत्साह उरला नव्हता. जणू जगण्याची इच्छाच मेली होती त्यांची. मात्र अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या घरच्यांनी त्यांना योग्य ती साथ देत, मार्गदर्शन करत या संकटातून बाहेर काढले. हळूहळू त्याही सावरू लागल्या. काळ तसेही प्रत्येक दुःखावरील रामबाण औषध असतेच. लीनाजीही काळ जसजसा पूढे सरकू लागला, तसतशा सावरत गेल्या. त्यांनी परत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि हळूहळू त्या स्थिर-स्थावर होऊही लागल्या.

याच वेळी त्यांच्या आयुष्यात आला हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला पण अवलिया वृत्तीचा किशोरकुमार. त्याचा विनोदी स्वभाव आणि हॅपी गो लकी वृत्तीकडे आधी मैत्रीने अन् मग प्रेमाने लीनाजी कधी आकर्षित झाल्या, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. पण जेव्हा लक्षात आले तोपर्यंत बराच उशीर झाला होता. हे नाते त्यांच्या घरच्यांना जराही पसंत नव्हते. कसे असणार? किशोरकुमार त्यांच्यापेक्षा 21 वर्षांनी मोठा होता अन् एवढेच नाही, तर तो तीन- तीन लग्नं करून बसलेला बीजवरही होता. साहजिकच लीनाचे वडील कर्नल श्रीनाथजी या नात्याच्या सख्त विरोधात होते. मात्र प्रेमात पडलेल्या व्यक्तीला जगाचा विरोध काहीही करू शकत नाही.

Satyam Jewellers : सत्यम ज्वेलर्स यांच्यासह आजच्या गुरुपुष्यामृत नक्षत्रावर सोने खरेदी करा!

तसेच इथेही झाले. या जोडीने लीनाच्या वडिलांचा करडा विरोध पत्करूनही विवाहबंधनात बांधून घेतले. लग्नानंतर काहीच वर्षांत या जोडीला एक मुलगा झाला, ज्याचे नाव सुमितकुमार आहे. किशोरकुमार यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनही एक मुलगा होता अमितकुमार नावाचा. सुमितच्या आगमनाने हे कुटुंब चौकोनी झाले. आता सगळे आलबेल आहे, असे लीनाला वाटू लागले होते. पुन्हा एकदा तिला ती सुखात आहे असे वाटत असतानाच नशिबाचे फासे पुन्हा एकदा पलटले. १३ ऑक्टोबर १९८७ चा तो काळदिवस उजाडला अन् त्याने लिनाचे सर्वस्व असलेल्या आणि देशभर लोकप्रिय असलेल्या हरहुन्नरी किशोरदाला गिळंकृत करून पुन्हा एकदा लीनाच्या आयुष्यात घनघोर अंधार केला.

वयाच्या 25 व्या वर्षी आलेले वैधव्य पचवून ती कशीबशी सावरली होती, अन् तिने त्यानंतर मोठा विरोध पत्करून किशोर सोबत सप्तपदी चालण्याचा घेतलेला निर्णय आणि एकमेकांना दिलेली वचने अवघ्या सात वर्षांत विरली आणि ती पुन्हा एकदा वयाच्या केवळ 37 व्या वर्षी विधवा झाली. हा धक्का अतिशय मोठा होता अन् हे दुःखही कठीण होते. तिच्या भाळावर सटवीने जणू चिरकाल दुःखच लिहिले होते क्षणिक सुखासोबत. या धक्क्याने ती पूर्णपणे कोलमडून गेली. जो रूपेरी पडदा तिचे एकमेव स्वप्न होता, त्याकडे तिने पाठ फिरवली.

स्वतःहून तिने एकांतवास स्वीकारला. तिला जगणे नकोसे झाले होते. पण तिच्या पदरात तिच्या आणि किशोरकुमारच्या प्रेमाची जबाबदारी होती. म्हणूनच तिने एवढे मोठे दुःखही पचवले आणि सुमितमध्येच आपले पुढील जीवन बघून आयुष्य पुन्हा एकदा जगण्याचे ठरवले.

तिला तिच्या म्हटले तर सावत्र, मानले तर सख्ख्या मुलाने म्हणजेच किशोरकुमारच्या थोरल्या मुलाने(अमितकुमार)ही उत्तम साथ देत आपला पुत्रधर्म निभावला खरे; पण लीनाच्या पुढे परमेश्वरासाठी एकच म्हणणे होते, ‘जाने क्यों लोग मुहब्बत किया करते हैं, दिल के बदले दर्दे दिल लिया करते हैं।’ लीना आता मुंबई येथे आपल्या दोन्हीही मुलांबरोबर राहते. सौंदर्य,उत्तम अभिनयाची जाण असूनही, यश मिळालेले असूनही ती अपयशी, कमनशिबी आणि एकाकीच राहिली. का? या प्रश्नाला उत्तर कधीच मिळत नसते.

तिचे दुःख कमी होवो आणि तिचे उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाचे जावो इतकीच परमेश्वराकडे प्रार्थना!

  • विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.