Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 36 – जयदेव

एमपीसी न्यूज : त्यांचा जन्मच संगीतकार होण्यासाठी (Shapit Gandharva) झाला होता. ते संगीतकार झालेच, नुसते झालेच नाही तर ते एक अप्रतिम संगीतकार म्हणून आजही ओळखले जातात. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. अनेक युवा गायकांना संधी देवून त्यांना उज्ज्वल भवितव्यही निर्माण करून देण्यात मोठा वाटा उचलला. पण एवढे सर्व करूनही व्यावसायिक दृष्टीने ते ‘नाकामयाब’ म्हणूनच ओळखले गेले. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही अतिशय दुर्धरच राहिले. ‘एकटा आला एकटा गेला’ हा गीतेतील सिध्दांत दुर्दैवाने ज्यांच्या बाबतीत १०० टक्के खरा ठरला, ते आजचे शापित गंधर्व म्हणजेच महान संगीतकार स्व. जयदेव ऊर्फ जयदेव वर्मा.

कदाचित आजच्या पिढीला ते फारसे माहीत नसतीलही. पण ज्यांनी ‘अभी न जाओ छोड़कर’ हे कानाला आजही स्वर्गीय मैफिलीचा आनंद देणारे अवीट गाणे ऐकले आहे, त्या गाण्याचे संगीतकार म्हणजेच जयदेवजी. सुरेश वाडकर, भूपेंद्र, रुना लैला यांना सर्वप्रथम संधी देणारे संगीतकार म्हणजेच जयदेवजी.

3 ऑगस्ट 1919 साली त्यांचा जन्म नैरोबी येथे झाला. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. त्याच नोकरीच्या काळात नैरोबी येथे नोकरीस असताना जयदेव यांचा जन्म झाला. वर्मा कुटुंब मूळचे लुधियाना येथले. वयाच्या आठव्या वर्षापर्यँत नैरोबी येथे राहिल्यानंतर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या जन्मगावी पाठवले.

त्यांच्या एका मित्राने जयदेव यांना एका वाढदिवसाचे गिफ़्ट म्हणून एक ‘माऊथ ऑर्गन’ दिला होता. विशेष बाब म्हणजे तोवर कुठलेही शिक्षण घेतले नसतानाही जयदेव यांनी त्यावर काही तरी मनाला आवडेल असे वाजवून दाखवले. त्यांच्या वडिलांचा ज्योतिष्यशास्त्राचा चांगला अभ्यास होता. त्यांनी जयदेवजी यांची जन्मकुंडली अभ्यासली अन् जयदेव यांना शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.

लुधियाना येथील आर्या विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले. तिथलेच एक संगीत शिक्षक प्रा.बरकत राय यांच्याकडे जयदेव यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. यातूनच त्यांची संगीताबद्दलची आवड अधिकाधिक दृढ होत गेली.1932 साली आलेला ‘अलिबाबा ,चालीस चोर’ हा बोलपट पाहिल्यानंतर त्यांना चित्रपटसृष्टीची ओढ लागली अन् वयाच्या केवळ 12व्या वर्षी ते घर सोडून मुंबईला निघून आले. या चित्रपटात कांचन म्हणून एका अभिनेत्रीवर एक गाणे चित्रित झाले होते,”बिजली गिरती है सदा उंचो मिनारो पर”. हे गाणे पाहून ते इतके प्रभावित झाले की ते तिला भेटण्यासाठी घरून पळून आले.

किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, असे म्हणतात ते उगीचच नाही. कुठल्याही (Shapit Gandharva) आधाराविना मुंबईत पळून आलेल्या या मुलाला चक्क बालकलाकार म्हणून ‘वामन अवतार’ या चित्रपटात काम मिळाले. यात त्यांची भूमिका नारदाची होती. व्हिडिओ मुव्हीटोन नावाच्या एका चित्रपट संस्थेने त्यांना बालकलाकार म्हणून करारबद्ध केले. या चमत्काराला तुम्ही काय म्हणाल? हंटरवाली, काला गुलाब,वीर भारत,जोशे वतन ,फ्रंटीयर मेल, मार्तंड वर्मा अशा धार्मिक, पौराणिक चित्रपटात त्यांनी काम केले. पण ना हे चित्रपट विशेष यशस्वी ठरले, ना त्यांनी जयदेव यांना खास ओळख निर्माण करून दिली. याच दरम्यान त्यांनी जावकर बंधू यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कारण अभिनयात त्यांना विशेष रुची नव्हतीच.

1940 साली आलेल्या ‘नेकीबदी’ नावाच्या चित्रपटात त्यांना पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली होती; मात्र अचानक आलेल्या दम्याच्या अटॅकने ते आजारी पडले अन् दुर्दैवाने त्यांची ही संधी हुकली. ते निराश झाले अन् लुधियानाला परत गेले. तिथे गेल्यावर त्यांना वडिलांना दृष्टिदोष झाल्याचे समजले. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावरच घरची जबाबदारी आली. त्यांनी एका शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढच्या काही दिवसातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. हा त्यांच्यावर मोठा आघातच होता. पण यातून सावरत त्यांनी आपली जबाबदारी पार पाडायला सुरुवात केली. वडील गेल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीचा विवाह करून देऊन मोठया मुलाची जबाबदारी यथार्थ पार पाडली.

पण त्यांच्या मनाला समाधान काही लाभत नव्हते. संगीतात चांगले नाव कमवण्यासाठी त्यांच्या हे लक्षात आले होते की आपल्याला संगीताचा आणखी अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी अल्मोडा येथे जावून उस्ताद अल्लाउद्दीन,अलीअकबर आणि पंडित रवीशंकर यांच्या संगीत अकादमीत प्रवेश घेतला. पण ती अकादमी (Shapit Gandharva) महिनाभरातच त्यांनी सोडली. त्यानंतर ते लखनऊ येथे गेले.

इथे त्यांना भेटले उस्ताद अली अकबर खान. त्यांनी जयदेवजी यांना ‘शागीर्द’ म्हणून स्वीकारले अन् इथून पुढे प्रवास सुरू झाला त्यांच्या शास्त्रीय संगीत शिक्षणाचा. मात्र इथे आल्यावर त्यांना दम्याचा पुन्हा त्रास व्हायला लागला. संगीत शिकतानाच त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनेक ग्रंथ वाचले. त्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते मनःशांतीच्या शोधात शिमल्याला निघून आले. इथून पुढे ते ऋषिकेश, उज्जैन असे भटकंती करत राहिले. याच दरम्यान त्यांना दिल्लीच्या आकाशवाणीवर 200 रुपये महिन्यावर गायक म्हणून नोकरी मिळाली.

पण यातही त्यांना मानसिक समाधान काही मिळाले नाही. 1947 च्या दरम्यान दिल्ली येथे त्यांचे गुरू अकबर अली खान आले असता त्यांची भेट जयदेव यांनी घेतली. आपल्या शिष्याच्या मनातली घालमेल गुरूला समजणार नाही तर कोणाला? उस्ताद अकबर अली यांनी त्यांना ती नोकरी सोडायला लावली आणि आपल्याबरोबर ते जयदेव यांना घेऊन जोधपूरला आले. त्यांच्यासोबत जयदेव यांनी राजदरबारात पुढील दोन वर्षे राजगायक म्हणून स्वतःचे स्थान सिद्ध केले; पण त्यांना मन:शांती इथेही मिळत नव्हतीच. अखेर दोघांनीही मुंबई गाठली.

1951 साली नवकेतन फिल्मच्या केतन आनंद यांनी अकबर अली खान यांना संधी दिली.1952 साली आलेल्या ‘आंधियाँ’ अन् पुढच्या वर्षी आलेल्या ‘हमसफर’ या चित्रपटाला उस्ताद अकबर यांनी संगीत दिले; पण दुर्दैवाने देवआनंद सारखा सुपरस्टार असूनही या दोन्ही चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे निराश होऊन उस्ताद कोलकात्याला निघून गेले; पण चेल्याने मात्र मुंबईतच राहून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा पण केला. यानंतर केतन आनंद यांनी ‘गाईड’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले, ज्याचे संगीतकार होते सचिनदेव बर्मन उर्फ एस डी दा. केतन आनंद यांनी जयदेव यांची शिफारस एस.डी.बर्मन यांच्याकडे केली आणि नशिबाने बर्मनदा यांनी ती मान्य केली.

या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले आणि जयदेव यांची बर्मनदा यांच्या काफ़िल्यात मुख्य संगीत संयोजक म्हणून बढती झाली. त्यानंतर जयदेव यांनी केतन आनंदच्या काला पानी, मुनीमजी, टॅक्सी ड्राईव्हर, लाजवंती या यशस्वी चित्रपटांसोबतच चलती का नाम गाडी, सुजाता, इंसान जाग उठा, अग्निपथ अशा इतर बॅनरच्या चित्रपटांतही सहाय्यक संगीतकार म्हणून काम केले आणि दैवयोगाने हे सर्वच चित्रपट कमालीचे यशस्वी ठरले. यानंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला. आतापर्यंत सहाय्यक संगीतकार म्हणून काम करत असलेल्या जयदेव यांच्यात नक्कीच स्पार्क आहे ही खात्री केतन आनंद यांना होती. म्हणूनच त्यांनी जयदेव यांना मुख्य संगीतकार म्हणून संधी देण्याची रिस्क घेतली.

‘जोरू का भाई’ हा (Shapit Gandharva) त्यांचा मुख्य संगीतकार म्हणून पहिला चित्रपट होता. मात्र चांगले संगीत असूनही हा चित्रपट अपयशी ठरला. यानंतरही जवाहिऱ्याची नजर असलेल्या केतन आनंद यांनी जयदेव यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना आणखी चित्रपटांत संगीतकार म्हणून संधी दिली. समुद्री डाकू, किनारे किनारे, अंजली या चित्रपटांचे संगीतकार म्हणून जयदेव यांचेच संगीत होते; मात्र दुर्दैवाने हे सर्व चित्रपट अपयशीच ठरले. मुंबई सारख्या नगरीत अपयशी माणसाला जगताना किती त्रास होतो, हे शब्दात मांडणे शक्य नाही. जयदेव यांच्याकडे ना पैसा होता ना राहायला घर.

तरीही परमेश्वराच्या कृपेने त्यांना एका भल्या माणसाने आपल्या घरी पेईंग गेस्ट म्हणून विनामोबदला राहायला जागा दिली. यातच त्यांच्या लग्नाचे वय झाले होते. पण एकंदरीतच त्यांची परिस्थिती बघता कुणीही त्यांना मुलगी द्यायला तयार नव्हते. कदाचित यालाच वैतागून जयदेव यांनी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत रुसलेल्या दैवाची खपामर्जी आता बदलली होती अन् 1961 साली आलेल्या ‘हम दोनों’ या चित्रपटाच्या सुपर-डुपर यशाने जयदेव यांना खऱ्या अर्थाने यशस्वी ठरवले. अल्ला तेरो नाम, मैं जिंदगी का साथ, अभी न जाओ छोड़कर या कानाला आजही अवीट गोडी देणाऱ्या गाण्यांनी जयदेव यांचे नाव सर्वत्र रोशन केले. पुढच्याच वर्षी आलेल्या सुनिल दत्त यांच्या ‘मुझे जिने दो’ या चित्रपटातली गाणी जयदेव यांनी संगीतबद्ध केली. यातल्या ‘रात भी है कुछ भिगी भिगी’ या लोकप्रिय गाण्यासह आणखी काही गाणीही लोकप्रिय झाली आणि जयदेव यांच्या आयुष्यात आता स्थैर्य आले असे वाटायला लागले. मात्र ‘त्याचे खेळ तोच जाणो’. या यशस्वी चित्रपटानंतर का कुणास ठाऊक जयदेव यांना लवकर चित्रपट मिळालाच नाही.

तब्बल 9 वर्षांनी सुनील दत्त यांनी निर्माण केलेल्या ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटातून जयदेव यांनी संगीतकार म्हणून पुनरागमन केले. हा तोच चित्रपट ज्यातून महानायक अमिताभ बच्चन यांनी पदार्पण केले होते. दुर्दैवाने हा चित्रपट काही यशस्वी ठरला नाही. मात्र याचे संगीत लोकप्रिय ठरले. ‘तू चंदा मैं चांदनी, तू तरुवर मैं साख…” हे गाणे आजही कानाला अवीट गोडी देते. याच गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदाच ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नसले, तरी या चित्रपटाने समीक्षकांना चांगलेच प्रभावित केले. दैवदुर्विलास म्हणतात तो हाच की जयदेव यांना मात्र तो एक पुरस्कार सोडला तर बाकी काही फायदा झालाच नाही. यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले ते ‘घरौंदा’ चित्रपटातल्या ‘एक अकेला इस शहर में’ या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गाण्यामुळे. पण त्यानंतरही पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

Pune Rain : पुण्यात पावसाचा पुन्हा येलो अलर्ट, पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे

पुन्हा ते जणू अज्ञातवासात गेले. यानंतर 1978 साली मुजफ्फर अली यांनी निर्माण केलेल्या ‘गमन’ चित्रपटाने त्यांना चर्चेत आणले. याच चित्रपटात त्यांनी सुरेश वाडकर, हरिहरन आणि छाया गांगुली या तेव्हाच्या नवोदित अन् आजच्या महान गायकांना संधी दिली. दुर्दैवाने हा चित्रपट यशस्वी जरी ठरला नसला, तरी यातल्या ‘आपकी याद आती रही’ या छाया गांगुली यांनी गायलेल्या गाण्याने त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. यातले ‘सीने में जलन’ हे सुरेश वाडकर यांनी गायलेले गाणेही खूप लोकप्रिय ठरले. मात्र पुन्हा तेच. यानंतर ते तब्बल 9 वर्षे पुन्हा विस्मरणात गेले.1984 साली आलेल्या अमोल पालेकर यांच्या ‘अनकही’ या चित्रपटाने त्यांना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. यातले ‘ओ रघुवीर अब तुमको हमारी लाज’ हे गाणे कोणी गायले होते, काही कल्पना आहे?

पंडित भीमसेन जोशी. होय, पंडितजी सोबत या चित्रपटात आशा भोसले यांनीही गायलेली गाणी लोकप्रिय ठरली होती. मात्र त्यानंतरही जयदेव यांना काम मिळाले नाही. अखेर 1986 साली ‘त्रिकोण का चौथा कोण’ ही आर्टफिल्म त्यांनी केली. पण हाच चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. यानंतर पुढच्याच वर्षी मुंबई येथे 6 जानेवारी 1987 साली त्यांना दम्याच्या आजाराने पुन्हा गाठले. दुर्दैव पहा. त्यांना दवाखान्यात घेऊन जायलाही त्यांच्या जवळचा कोणीही सोबती नव्हता. अखेर असेच कुणी तरी अनोळखी माणसाने त्यांना दवाखान्यात ऍडमिट करून मानवता दाखवली; पण तोवर खूपच उशीर झाला होता. त्यांचे त्याआधीच निधन झाले होते. मात्र मृत्यूनंतरही त्यांचे दुर्दैव सरले नव्हते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नव्हते. अखेर हॉस्पिटल समितीनेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असे वाचण्यात येते. हेच जर सत्य असेल तर काय म्हणावे या दुर्दैवाला?तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या एका महान संगीतकाराच्या नशिबी एवढे दुःख का यावे?इतकी अवहेलना का व्हावी?
ते एक उच्चकोटीचे संगीतकार होते, पण व्यावसायिक यश मिळवू शकले नाहीत, का?

त्यांना तीन तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण त्यांना मुंबईत कधीही निवारा असावा म्हणून एक छोटी सुद्धा सदनिका मिळवता आली नाही, का? ‘ओ रघुवर अब तुमको हमारी लाज’ अशी आर्त हाक त्यांनी मारली,पण ती त्या रघुवीराच्या कानावर पडली नाही का?

असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे आपल्याला कधीच मिळत नसतात. त्यातलेच काही हे ही, नाही का?
जाता-जाता एक अतिशय मनाला वेदना देणारा किस्सा सांगतो.त्यांना मध्य प्रदेश सरकारने ‘लता मंगेशकर’ पुरस्कार दिला होता. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते. तो घेण्यासाठी ते उज्जैन येथे गेले असता कोणी तरी खवचटपणे त्यांना डिवचले अन् विचारले, तुमच्या गुरूला(उस्ताद अकबर अली खान)हा पुरस्कार मिळाला नाही. तरीही तुम्ही हा पुरस्कार केवळ लाख रुपयांच्या अमिषापोटी घेत आहात का? यावर त्यांनी खरेखुरे उत्तर देताना सांगितले की, होय. मी केवळ लाख रुपयांसाठीच हा पुरस्कार स्वीकारतो आहे; कारण मी एकरकमी कधीच इतकी मोठी रक्कम पाहिली नाही.
आपल्या महान देशाचे दुर्दैव हेच आहे की इथे कितीही गुणवान असलेल्या व्यक्ती असल्या, तरी त्यांची कदर दुर्दैवाने गुणांवर होत नाही, हे सखेद म्हणावे वाटते. व्यावसायिक यश,प्रतिष्ठा, मान सन्मान त्यांनाच ज्यांच्याकडे गुणाइतकेच मार्केटिंग करण्याची यशस्वी कला असते.

जगाच्या व्यावहारिक नजरेत कदाचित म्हणूनच ‘जय’ अन् ‘देव’ नावात असूनही ना ते देव झाले ना त्यांच्या नावाने कोणी जयजयकार केला. अर्थात याने त्यांच्या कलेला कोणीही कधीही विसरू शकत नाही. बरोबर ना?
त्यांच्या पावन आत्म्याला सद्गती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.