Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 40 – विजयता पंडित

एमपीसी न्यूज : परमेश्वराने तिला जन्माला (Shapit Gandharva) घालतानाच, चांगले घराणे, कला, रूप, यश(क्षणीक) सर्व काही दिले. तिचे वडील आणि काका संगीत क्षेत्रातले प्रतिष्ठित नाव, भाऊ उत्तम संगीतकार, थोरली बहिण यशस्वी कलाकार असे सर्व काही कुणालाही हेवा वाटावे असे तिचे भाग्य लखलखीत होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना, तिला ज्युबिली स्टार म्हणून ओळखले जाणारे राजेंद्रकुमार यांनी मोठी संधी दिली आणि तिने या संधीचे सोने करत जोरदार यश मिळवून आपले भवितव्य उज्ज्वल आहे असाच इशारा सर्वाना दिलाही, मात्र ना तिला या कामगिरीत सातत्य ठेवता आले ना तिला आपला इथे ठसा उमटवता आला.

80 ते 90 च्या दशकातली एक रूपसुंदरी, उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी ‘लव्हस्टोरी’ या चित्रपटातली पिंकी म्हणजेच विजयेता उर्फ विजेता पंडित यांची कहाणी सुद्धा मनाला चटका लावणारी आहे. पुन्हा एकदा परमेश्वराचा खेळ कसा असतो हे सांगणारी आहे.

25 ऑगस्ट 1967 साली मुंबई येथे जन्माला आलेली विजेता पंडित हिचे वडील पंडित प्रतापनारायण हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक तर पंडित जसराज हे तिचे सख्खे काका, अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित ही तिची थोरली बहीण तर दुर्गा जसराज ही तिची चुलत बहीण, संगीतकार जतीन, ललित हे तिचे भावंडे. अशा प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत घरात तिचा जन्म झाला. हे घराणे मूळचे हिस्सार या हरियाणा राज्यातले गावचे.

घरी सर्वच एकापेक्षा सरस कलाकार असल्याने विजयेताला चित्रपटसृष्टीचे आकर्षण असणार होतेच. मुंबई येथे तिचे सर्व बालपण आणि शिक्षण झाले होते. तिला योग्य संधीची गरज होती, जी तिला वयाच्या 24 व्या वर्षी मिळाली. ज्युबिली स्टार राजेंद्रकुमार आपल्या लाडक्या राजकुमारासाठी एक टवटवीत चेहरा शोधत होते. त्यांच्या (Shapit Gandharva) नजरेस विजेता पडली आणि 1981 साली प्रदर्शित झालेल्या सुपरडुपर हिट लव्हस्टोरी या चित्रपटाने घवघवीत यश मिळवून तिच्या पदार्पणाची नांदी चित्रपटसृष्टीला देताच तमाम रसिकांसह निर्मात्या, दिग्दर्शकांना विजेताच्या लोभस रूपाने आणि उत्तम अभिनयाने प्रेमात पाडले. तिचे फोटो, मुलाखत विविध सिने माध्यमातून झळकू लागल्या.

यानंतर तिच्या यशाचा आलेख एकदम जोरात असेल असेच सर्वांना वाटत होते. मात्र, दैवाच्या मनात मात्र काही तरी दुसरेच होते, आणि तिथेच सारे बिघडले.

Today’s Horoscope 1 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

तिच्याकडे सर्व काही असूनही तिला पुन्हा तसे यश काही मिळाले नाही. असे का झाले याबद्दल आजही अनेक चर्चा घडतात, पण त्याने फायदा मात्र कसलाच होत नाही. नक्की काय झाले ते ठाम कोणीही सांगू शकत नसले तरी असे ऐकिवात येते की ती आपल्या पदार्पणातच यशस्वी ठरलेल्या रुपेरी पडद्यावरील पहिल्या चित्रपटाच्या नायकाच्या म्हणजेच कुमार गौरवच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. याची चर्चा असल्याने अनेक नवीन चित्रपटाची तिला ऑफरही मिळाली पण आपला वेळ जास्तीत जास्त कुमार गौरव सोबत जावा म्हणून तिने चित्रपटाच्या ऑफर्स नाकारून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. या खऱ्या की खोट्या प्रेमकहाणीचा अंत मात्र दुःखदच झाला.

एकमेकांवर असलेल्या निस्सीम प्रेमाचा त्याग यांना घरच्यांच्या विरोधामुळे करावा लागला. यामुळेच तिने करन मलकान या तिच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आपले भवितव्य पणाला (Shapit Gandharva) लावले. दुर्दैवाने ‘कार थिफ’ या चित्रपटाच्या अपयशासारखेच तिचे वैवाहिक आयुष्यही अपयशी ठरले. काहीच कालावधीनंतर या दोघांनाही आपल्या वाटा वेगवेगळ्या आहेत, याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी तो योग्य आहे यावर शिक्कामोर्तब करत घटस्फोट घेत आपल्या वचनांना तिलांजली दिली.

या धक्क्याने तिला पुढे खुपच नैराश्य देत तिची गाडी पटरीवर येवूच दिली नाही. तिला चित्रपट मिळाले नाही असे नाही, पण एक ‘मोहब्बत’ सोडला तर तिला दुय्यम किंवा मल्टीस्टार चित्रपटातच काम करावे लागले. जीते है शानसे, जलजला, दिवाना तेरे नाम का, प्यार का तुफान, कार थिफ असे कोणालाही न आठवणारी काही चित्रपट तिने केलीही पण तिला ना त्यात यश मिळाले ना तिच्या भूमिका लक्षात ठेवल्या गेल्या.

या अपयशाच्या गर्तेत असतानाच तिला तिच्या घरच्यांनी पुन्हा एकदा लग्नासाठी प्रवृत्त केले. आधीच्या दुःखामुळे तिला हा निर्णय घेणे जड जात होते. पण दैवाच्या मनात यावेळी मात्र तिला आंनद द्यावा अशीच इच्छा होती. गुणी संगीतकार आणि उत्तम माणूस असलेल्या आदेश श्रीवास्तव सोबत तिची ओळख झाली आणि या ओळखी रूपांतर मैत्रीत अन नंतर प्रेमात झाले. एकमेकांना समजून घेतल्यानंतर यांनी आपण आता विवाह करावा हा निर्णय घेतला आणि सर्वांच्या संमतीने हे दोघे सप्तपदी करत एकमेकांचे आजन्म राहू असे वचन देत रेशमी गाठीत बांधले गेले.

या नंतर तिच्या आयुष्यात बऱ्यापैकी स्थैर्य आले होते. बघताबघता दोनाचे चार आणि हम दो चे हमारे दोही झाले आणि विजेता तिच्या आयुष्यात आंनदी आहे असे वाटत होतेच की पुन्हा तिच्या आयुष्यात दुःखाने प्रवेश करून तिच्या आंनदी आयुष्याला दुःखी करुन टाकले. आदेश श्रीवास्तव यांना कर्करोग झाला आणि वयाच्या 51 व्या वर्षीच त्यांचे दुःखद निधन झाले. मात्र, या दरम्यान त्यांचे आर्थिक गणितही पार डबघाईला आले. आजारपण त्याचा खर्च यामुळे तिची बसलेली घडी पुन्हा विस्कळीत झाली. दैवाने घातलेला हा घाला इतका निष्ठुर होता, की तिला नवऱ्याच्या आजारपणात त्याच्यावर उपचार करण्यासाठी पैसाही नव्हता,

दुर्दैवाने मग तिला काही गाड्या, घाट विकावी लागली, एवढे करूनही दैवाला दया आली नाही ती नाहीच. तिच्या नवऱ्याला त्याने वयाच्या केवळ 51 व्या वर्षीच तिच्यापासून दूर करून आपला खेळ दाखवला. यातून सावरणे गरजेचे होते, गरजेचेच होते.  आदेशने जाण्याआधी तिच्या पदरात आपली दोन अपत्य टाकली होती. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी होती. दैव निष्ठुर झाले असले तरी एका आईला आपले कर्तव्य चुकणार नव्हते, ती पुन्हा उभी राहिली.

तिने पडद्यावर येण्याऐवजी पडद्यामागून पार्श्वगायन करायला सुरुवात केली. जो जिता वही सिकंदर, कभी हा कभी ना, साजिश, देव, चिंगारी आदी चित्रपटासाठी तिने पार्श्वगायन केले. पण तिला यातही फारसे यश मिळाले नाही. सुदैवाने तिची मुले आता बऱ्यापैकी मोठी झाली असून ते ही आपल्या नशिबाला आजमावत आहेत. आदेश श्रीवास्तव यांनी केलेल्या चित्रपटाच्या रॉयल्टी मधून तिचे आता भागत आहे.

मात्र तिची स्वतःची कारकीर्द मात्र यशस्वी होवू शकली नाही, ही खंत तिला आता कितीही नाही म्हटले तर छळत राहणार, हे नक्की.

परमेश्वराच्या मर्जीपुढे हम सब बेबस आहोत यात तिळमात्र देखील शंका नाही. त्याने केलेल्या तिच्या आयुष्याच्या खेळाला त्याने आता तरी बदलवून तिच्या आयुष्यात आनंद घ्यावा, इतकीच त्याच्या चरणी प्रार्थना.

– विवेक दिगंबरराव कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.