Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 51 – कर्म देते पण दैव नेते….फराज खान

एमपीसी न्यूज- साधारणपणे दैव देते पण कर्म नेते असे म्हटले जाते,याच्याबाबत मात्र (Shapit Gandharva) उलटेच घडले. त्याला कर्म (काम) मिळाले, पण देवाने मात्र त्याला ते मिळू दिले नाही. भारतीय सिनेसृष्टीतल्या एका सर्वात यशस्वी सिनेमा त्याला जवळजवळ मिळालाच होता, आता शूटिंग सुरू होणारच होते की त्याला दैवाने आपली ताकत दाखवली. अचानकपणे त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले आणि तो चित्रपट याच्या हातून गेला. तो सलमान खानच्याच नशिबात लिहला होता.”मैने प्यार किया” हा सुप्रसिद्ध राजश्री प्रॉडक्शनचा चित्रपट ज्याच्या नावावर होणार होता, पण झाला नाही तो म्हणजे एक देखणा, रुबाबदार आणि अभिनयसंपन्न पण तितकाच दुर्दैवी नट म्हणजेच फराज खान.
त्याच्याकडे चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्व काही होते, त्याचे वडील “अमर अकबर अँथनी”या चित्रपटात झिबिस्कोची यादगार भूमिका करणारे युसुफ खान हे इथल्या सिनेसृष्टीत बऱ्यापैकी नावलौकिक असलेले होते. त्याचे व्यक्तिमत्त्वही नायकाला साजेसेच होते. थोडक्यात काय त्याच्याकडे इथे यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्व काही होते एक सोडून, ते म्हणजे नशीब. म्हणूनच फराज खान हा खऱ्या अर्थाने दुर्दैवी ठरला,शापित ठरला.
27 मे 1970 साली त्याचा जन्म मुंबई येथे झाला.भारतीय सिनेसृष्टीतला महानायक अमिताभ बच्चन सोबत अनेक चित्रपटात काम करणारे युसुफ खान उर्फ झिबिस्को त्याचे वडील. मुक्कद्दर का सिकंदर,परवरीश,धर्मात्मा, हम किसीसे कम नही,नशीब,खुदार आदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. ते मुळ इजिप्तचे होते,पण नशिबाने ते भारतात आले आणि इथे आल्यावर सिनेसृष्टीत काम करता करता इथलेच झाले. त्यांना दोन मुले होती. एक फराज खान आणि दुसरा फहमान खान.
फराज खान हा त्यांचा जेष्ठ मुलगा. आयुष्यभर दुय्यय भूमिका केल्याने त्यांना आपल्या मुलाने तरी नायकाच्या भूमिका कराव्यात ही (Shapit Gandharva)त्यांची मनापासूनची इच्छा होती. यासाठी त्यांनी आपल्या मुलांना योग्य ते शिक्षणही दिले आणि त्याला योग्य ती संधी मिळावी याच दृष्टीने घडवलेही. कर्मधर्म संयोगाने त्यांच्या थोरल्या मुलाला म्हणजेच फराजला 1989 साली राजश्री प्रॉडक्शनने आपल्या “मैने प्यार किया” या सिनेमासाठी करारबद्ध सुद्धा केले. पुढील काही दिवसांतच शूटिंगला सुरुवात होणारही होती अन इथेच दैव आडवे आले. त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले. इतके की त्याला काम करणे सोडा जगणेही त्रासदायक झाले. दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नाही. हातात आलेली संधी दैवाने हिरावून नेली.
सूरज बडजात्याने अखेर त्याच्या जागी सलमान खानला घेतले आणि पुढील इतिहास ज्याला माहिती नसेल तो सिनेरसिक भारतात तरी नक्कीच नसेल. फराज खानसाठी हा सिनेमा अशा रितीने हातातून जाणे खूपच दुःखद होते. त्यातच त्याच्या आजाराने त्याला सर्वार्थाने त्रस्त केले. कसेबसे त्यातून तो थोडाफार सावरला. त्यानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर त्याला एक मुख्य नायक असलेला “फरेब” नावाचा एक चित्रपट मिळाला. यात त्याच्यासोबत होते मिलींद गुणाजी ,आणि सुमन रंगनाथन. या चित्रपटातले एक गाणे खूपच लोकप्रिय ठरले होते,”ये तेरी आखे झुकी झुकी’.हा चित्रपट बऱ्यापैकी लक्षवेधी ठरला होता.
त्यानंतर त्याने “पृथ्वी”,”मेहंदी”नावाचे चित्रपट केले. मेहंदी मध्ये त्याची नायिका होती राणी मुखर्जी पण त्याची भूमिका खलनायकी शेड असलेली होती. अर्थात त्याने ती फार सुंदररित्या निभावली होती. त्यानंतर,” दुल्हन बनू मै तेरी”,दिल ने फिर याद किया”अशा काही चित्रपटात त्याने काम केले.पण त्याला यातून विशेष काही फायदा झालाच नाही. त्याने काही दूरदर्शन मालिकेतही आपले नशीब आजमवले. जसे की ,”वन प्लस वन,अचानक, बीस साल बाद,नीली आंखे”लिपस्टिक वगैरे वगैरे, पण त्याला म्हणावे तसे यश काही मिळाले नाहीच.
दरम्यान त्याचा आजार जास्तच बळावत चालला होता. दुर्दैवाने त्याला आपल्या आजारावर योग्य तो उपचार करण्याइतकेही पैसे जमा करता आले नाही. बघताबघता (Shapit Gandharva) या आजाराने त्याला पूर्णपणे त्रस्त केले. त्याने 2008 साली आलेल्या “श्शुकोई है”या मालिकेत अखेरची भूमिका केली होती. त्यानंतर त्याला फारसे काम मिळाले नाही . अन याचदरम्यान त्याचा आजारही जास्तच बळावत गेला. त्यामुळे तो सिनेसृष्टीच्या पूर्णपणे बाहेर पडला. इथल्या दुनियेत फक्त दाम है तो सलाम है असे म्हटले जाते त्यात काहीही खोटे नाही, याची असली प्रचिती फराज खानला आली.
हातात काम नव्हते, खिशात पैसा नव्हता, अन सोबत होता वाढता आजार. ज्याने तो पुरता हतबल झाला. अखेर वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी तो बंगलोर येथे 4 नोव्हेंबर 2020 साली इहलोक सोडून अल्लाकडे निघून गेला, असे वाचण्यात येते या देखण्या नायकाच्या मृत्यूची सुद्धा कोणाला खबर नव्हती. प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्टने मीडियाला ट्विट करुन त्याच्या मृत्यूची बातमी दिली. तर ज्या सलमान खानला त्याच्या दुर्दैवाने “मैने प्यार किया” हा त्याला सुपरस्टार बनवणारा चित्रपट मिळाला ,त्याच सलमान खानने त्याच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी मोकळ्या हाताने मदत केली, पण याहीवेळी दैव त्याच्या सोबत नव्हते. मेंदूतला आजार वाढतच गेला अन एकेदिवशी फराज खान पैगंबरवासी झाला.
Pune : टायर फुटल्याने कार खडकवासला धरणात पडली; चौघे बचावले, मुलीचा मृत्यू
“जगाच्या पाठीवर” या कित्येक दशकेआधी आलेल्या लोकप्रिय चित्रपटातले अवीट गाणे मला हा लेख लिहताना खूपदा आठवले,”उद्धवा अजब तुझे सरकार”. फराज खानच्या बाबतीत मी जेंव्हा गूगलवर माहिती शोधली ,त्याच्याबाबत घडलेल्या अशा घडलेल्या अतर्क्य घटना वाचून मनाला खरेच पटते की” इथे फुलांना मरण जन्मतः ,दगडाला पण चिरंजीविता”.पण दुर्दैवाने सत्य हेच आहे की आपण सर्वजण त्या ‘परमेश्वरापुढे’ निव्वळ हतबल असतो. इथे फक्त तेच घडते जे त्याला घडावे वाटते. म्हणून अभिनयाची फारशी जाण नसलेली किती तरी ठोकळे यशस्वी होतात अन असा एखादा फराज खान जवळ सर्वकाही असूनही यशस्वी (Shapit Gandharva) होत नाही, होवूच शकत नाही.
फराज खानच्या आत्म्याला सदगती मिळो,हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
– विवेक कुलकर्णी