Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 51 – मनस्वी शेखर कपूर

एमपीसी न्यूज: भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत (Shapit Gandharva) एकदम हटके चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून त्याची ख्याती आहे. मूलत: हिंदी सिनेसृष्टी ज्या हॉलीवूडची प्रेरणा घेते त्या हॉलीवूडमध्ये त्याने उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे,इतकेच नाही तर त्याने त्यासाठी अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठा असलेला ऑस्कर पुरस्कारही मिळवला आहे. अफाट शब्दशः अफाट प्रतिभा असलेल्या या माणसाने बॉलिवूडला इतके काही दिले असले तरीही त्याला त्या बदल्यात मात्र फारसे काही मिळाले नाही, म्हणूनच अतिशय कृपावंत असलेल्या या महान दिग्दर्शकाला मला नाईलाजाने “शापित गंधर्व” म्हणावे वाटते.
केवळ भव्य दिव्य यश मिळाले नाही म्हणून शापित गंधर्व म्हणायचे का? अजिबात नाही. परमेश्वराने दिलेल्या नैसर्गिक गुणवत्तेला न्याय न मिळणे म्हणजेच शापित असे मला वाटते. अशीच काहीशी कामगिरी ज्याची आहे, तो हिंदी सिनेसृष्टीतल्या “मासुम” या अजरामर चित्रपटाचा, अनिल कपूरला एक जबरदस्त हिट चित्रपट देणाऱ्या, मोगॅम्बो खुश हुवा या अजरामर संवादाने अमर कीर्ती अमरीश पुरीला मिळवून देणाऱ्या, असे काही असते का हा प्रश्न विज्ञानाचा अभ्यास असणाऱ्या विचारवंतालाही करायला लावणाऱ्या “मिस्टर इंडिया’या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि माझाही अतिशय आवडता दिग्दर्शक असलेला म्हणजेच शेखर कपूर.
या माणसाला शापित म्हणावे की नाही या बऱ्याच दृष्टीने कठीण असलेल्या प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने आपापल्या परीने मिळवावीत, पण त्याआधी त्याची माहितीही एकदा बघूयात.
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 6 डिसेंबर 1945 रोजी पाकिस्तान येथील लाहोर येथे ब्रिटिश काळातले एक सुप्रसिद्ध डॉक्टर कुलभूषण कपूर यांच्या पोटी शेखर कपूरचा जन्म झाला. डॉक्टर वडिल असलेल्या शेखर कपूर यांचे कुटुंब साहजिकच उच्चविद्याविभूषित होते. सधनही होते.
त्याची आई शीलकांता कपूर ही एक गृहिणी होती. शेखर कपूरला तीन बहिणी होत्या निलू, अरुणा आणि सोहना कपूर. (Shapit Gandharva) फाळणीनंतर हे कुटुंब इतर अनेक हिंदू कुटुंबाप्रमाणेच भारतात स्थलांतरित झाले. त्यांनी दिल्ली येथे आपले बस्तान बसवले.
शेखर कपूर अभ्यासातही अतिशय कुशाग्र बुद्धीचे आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथील मॉडर्न स्कूलमधून आपले शालेय तर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सनदी लेखापाल(सी. ए.)हे अतिशय कठीण मानले जाणारे शिक्षण ही यशस्वीरित्या पुर्ण केले.
त्यांनी लंडन येथे सुद्धा काही काळ सी. ए. म्हणून नोकरी केली आहे. हे झाले खरेखुरे भारतीय कुटुंबप्रणाली प्रमाणाचे आदर्श वाटचाल असलेले प्रार्थमिक जीवन.पूर्वीच्या जीवनप्रणालीत आधी पोटापाण्याचे बघा असेच मोठ्यांकडून मनावर अनिवार्य पध्दतीने बिंबवले जायचे, किंबहुना तसेच करावे असे आग्रहपूर्वक सांगितले जायचे.
शेखर कपूरजींना ही असेच सांगितले गेले असेल, कदाचित. पण एका दृष्टीने हे आयुष्य अतिशय आदर्श होते. परिपूर्ण होते, पण यात त्यांचे मन रमत नव्हते.तुम्हाला माहिती असेलच भारतीय चित्रपटसृष्टीतले महान अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि एक अतिशय देखणा नायक म्हणून चित्रपटसृष्टी गाजवलेले देवआनंदजी शेखर कपुर यांचे अतिशय जवळचे नातेवाईक होते.
आपल्या अनेक चित्रपटाच्या कामाच्या निमित्ताने देवआनंदजी यांचे लंडनला सारखे जाणे येणे असायचे, त्या दरम्यान त्यांच्या सारख्या शेखर कपूर समवेत गाठी भेटी होत असत, चित्रपट म्हणजेच जीवन मानणाऱ्या देव आंनदजी यांनी त्यांना तू हे सर्व सोडून चित्रपटसृष्टीत यावे असेच सुचवले.
कदाचित तिच “देववाणी” होती, शेखर कपूरजी यांनाही वेगळ्या वाटेने जायचेच होते.1975 साली प्रदर्शित झालेल्या “जान हाजीर है’या चित्रपटात त्यांनी अभिनय करून आपले सिनेसृष्टीत पदार्पण केले. आणि योगायोग म्हणजे त्यांची दखल सिनेसृष्टीनेही घेतली.पण अभिनय त्यांची पहिली आवड,पहिले प्रेम कधीच नव्हते. त्यांना दिग्दर्शन करायचे होते.
अनेक वर्षं या ध्यासाने पछाडलेले शेखर कपूर यांचे स्वप्नं साकार झाले 1983 साली प्रदर्शित झालेल्या “मासूम” या अजरामर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आणि त्याने मिळवलेल्या घवघवीत यशाने. नसिरुद्दीन शाह, शबाना अजमी आणि मास्टर जुगल आणि बेबी उर्मिला (म्हणजेच पुढे जावून सुप्रसिद्ध झालेले जुगल हंसराज आणि उर्मिला मातोंडकर)यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाच्या यशाने शेखर कपूर हे नाव आणि त्याच्यातला अफाट दिग्दर्शक सिनेसृष्टीला आणि रसिकांनाही ठाव झाले.त्यानंतर आलेल्या (बऱ्याच काळानंतर)मिस्टर इंडिया या चित्रपटाने तर शेखर कपूर हे दिग्दर्शक (Shapit Gandharva) म्हणून काय भन्नाट माणूस आहे हेच सिद्ध केले.
या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले. त्यांचे एक खास असे वैशिष्ट्य होते, ते एक चित्रपट बनवल्यानंतर बराच काळ दुसरा चित्रपट बनवत नसत. त्यामागे काय लॉजिक असावे,ते त्यांनाच माहिती, पण हे सत्य होते हे मात्र खरे.मिस्टर इंडीयानंतर त्यांनी चंबळच्या खोऱ्यातली सुप्रसिद्ध दस्युसुंदरी फुलनदेवी यांच्यावर असलेल्या “बँडिंटक्वीन” हा चित्रपटही सात वर्षाच्या अंतराने बनवला.हा चित्रपटही खुप लक्षवेधी ठरला आणि यशस्वी सुद्धा.त्यानंतर त्यांचे नाव पुन्हा एकदा मोठ्या कालावधीनंतर चर्चेत आले,जेंव्हा त्यांनी हॉलिवूडमधे बनवलेला “एलिझाबेथ “हा चित्रपट प्रदर्शित झाला.
त्यांच्या प्रतिभेबद्दल कोणाच्याही मनात कधीही कसलीही शंका नव्हती, पण तरीही काही शंकेखोर विरोधक सुद्धा या चित्रपटानंतर त्यांचे समर्थक बनले.या चित्रपटाने त्यांना “ऑस्कर” हा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कारही मिळवून दिला.यानंतर त्यांनी 2007 साली या चित्रपटाचा सिक्वेल बनवला आणि आणखी काही हॉलीवूड चित्रपटेही बनवले.जसे ‘द फोर फेदर्स’,”व्हाट्स लव गॉट टू डू विद इट”,”न्यूयॉर्क, आय लव यू”आदी चित्रपटेही बनवली.
त्यांचा अतिशय महत्वाकांक्षी चित्रपट होता “पाणी”या नावाचा,ज्यासाठी त्यांनी स्व. सुशांतसिंग राजपूतला या चित्रपटासाठी करारबद्ध केले होते, दुर्दैवाने हा चित्रपट अजूनही पूर्ण झालाच नाही.त्यांच्याबद्दल आणखी एक अपसमज ,आरोप की सत्यवचन असे पसरले जात असे की ते चित्रपट बनवता बनवता मधेच सोडून जात, यात तथ्य किती ते मला जराही माहिती नाही, पण एक नक्की की ते चित्रपट बनवताना खुप वेळ घेत असत.
कदाचित यामुळे निर्मात्याला याचा त्रास होत असेल,कदाचित हा.नक्की नाही. याआधीही त्यांनी “टाईम मशीन “नावाचा एक असाच महत्त्वाकांक्षी चित्रपट बनवायचे ठरवले होते,ज्यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेता अमिर खानला करारबद्ध केले होते.याचसोबत रविना टंडन,नसिरुद्दीन शाह,रेखा अशी सुपरस्टार कलाकार ही या चित्रपटात त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणार होती ,मात्र हा चित्रपटही बनलाच नाही.मध्यंतरी ते “यशराज”या हॉलीवूड मधील एका मोठ्या बॅनर सोबत काम करणार आहेत अशीही चर्चा झाली होती, पण अजून तरी तसे झालेले नाही.
लौकिकदृष्ट्या बघितले गेले तर त्यांचे आयुष्य नितांतसुंदर आहे,आदर्श आहे,कोणालाही हेवा वाटावा असेच आहे, पण त्यांची (Shapit Gandharva) अफाट प्रतिभा बघता त्यांच्या गुणवत्तेचे आणखीन चीज व्हायला हवे होते, नव्हे व्हायलाच हवे होते,असे मला तरी मनापासून वाटते, ज्याने हॉलीवूडमधे आपल्या प्रतिभेचा आविष्कार साकारत प्रतिष्ठेचा ऑस्कर मिळवला, त्याच्या नावावर इतक्या प्रदीर्घ कालावधीत फक्त गीने चूने चित्रपटच दिसावेत, हे एक सिनेरसिक म्हणून मनाला नक्कीच डाचत राहते, नाही का?
शेखरजी यांचे वैयक्तिक आयुष्यही तसे चढउतार असलेले आहे, त्यांचा पहिला विवाह सुप्रसिद्ध भजनसम्राट अनुप जलोटा यांची पूर्व पत्नी मेधा जलोटा(जी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आय के गुजराल यांची कन्याही होती) सोबत झाला होता,मात्र हा विवाह फारकाळ टिकला नाही, दुर्दैवाने मेधा यांचे अमेरिकेत निधन झाले,त्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांच्या सोबत दुसरा विवाह केला.
हे नाते मात्र त्यांना चांगलेच आंनदी बनवून गेले,या दोघांचा संसार यशस्वी झाला असे वाटत असतानाच त्यांच्या सुखाला पुन्हा एकदा दृष्ट लागली आणि त्यांचा हा संसारही मोडला, पण असे असले तरीही त्यांच्या संसारवेलीवर एक कावेरी नावाचे गोडगोजिरे फुल मात्र नक्कीच फुलले आहे.
एकंदरीतच शेखर कपूरजी यांचे आयुष्य म्हणजे थोडे यश थोडे जास्त अपयश असेच दिसते.खरे तर जगात सर्वसुखी किंवा कायम यशस्वी कोणीही कधीही नसतेच,पण तरीही अशी काही व्यक्तिमत्त्वे परमेश्वर बनवतो की त्यांना बघून आपल्या सारख्यांना वाटते की याने असेच यश हमेशा मिळवावे, हे योग्य की अयोग्य यावर चर्चा करणे या लेखमालेचा विषयच नाही. मला इतकेच वाटते की परमेश्वराने असे गंधर्व जन्माला घालावेतच,पण ते शापित नसावेत.
यांना अपयश मिळावेही, पण ते इतकेच की त्यातून पेटून उठून त्यांनी प्रेरणा घेत जबरदस्त यश मिळवून त्या अपयशाची सव्याज भरपाई करावी. आपल्या अफाट प्रतिभेच्या जोरावर हॉलीवूडचा सर्वोच्च पुरस्कार मिळवून तमाम भारतीय रसिकांना अवर्णनीय आनंद देणाऱ्या या महान कलाकाराला उर्वरित आयुष्यात जे जे मिळायचे राहिले होते ते ते सर्व लवकरच मिळो आणि त्यांचे उर्वरित आयुष्य आनंददायी जावो ,इतकीच परमेश्वराकडे मनःपूर्वक प्रार्थना.
– विवेक कुलकर्णी