Shapit Gandharva : शापित गंधर्व भाग 25 – बलदंड महेश आनंद

एमपीसी न्यूज : कसल्याही आणि कितीही धाडसी व्यक्तीला (Shapit Gandharva) त्याच्याकडे बघितले, की एका क्षणासाठी का होईना पण मनात धडकी भरावी अशी त्याची धिप्पाड आणि रूबाबदार देहयष्टी होती. सव्वासहा फूट उंच, काहीसे पिंगट आणि काळजात खळबळ माजवणारे पिंगट डोळे, जबरदस्त तब्येत, चेहऱ्यावर एक प्रकारची खलनायकांकडे असलेली मग्रुरी, यामुळे त्याला रूपेरी पडद्यावर बघताच ‘आला दुष्ट माणूस, हैवान’ असे मनाला हमखास वाटणारच वाटणार.

या शतकातला महानायक अमिताभपासून असंख्य मोठमोठ्या नायकांसोबत त्याने हिंदी चित्रपटात छोट्या छोट्याच भूमिका केल्या; पण त्या आवर्जून लक्षात राहिल्या; कारण तो होताच तसा. हिंदी सिनेसृष्टीचे एक बरे असते. जोवर तुम्ही काम करत असता, तोवर तुम्हाला बऱ्यापैकी पैसा मिळतो आणि हा पैसा मिळत राहावा म्हणून काम करतच रहावे लागते.

त्याने भरमसाठ चित्रपटांत काम केले; पण त्यामुळे त्याला भरमसाठ पैसा काही मिळाला नाही आणि त्यामुळेच तो काम करत राहिला. असाच एकदा एका चित्रपटात एका स्टंटच्या प्रसंगाचे चित्रीकरण करत असताना त्याला अपघात झाला. तो इतका खतरनाक होता, की त्यातून सावरण्यासाठी एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वर्षांचा कालावधी सरून गेला.

यातच त्याच्याजवळ असलेली पुंजीही उपचारासाठी उडून गेली. अपघाताने शरीरावर घाव केले होतेच; नंतर मनावरही झाले आणि यातून तो सावरूच शकला नाही. अखेर यामुळे आलेले नैराश्य आणि एकाकीपण यामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला आणि एके दिवशी आपल्या राहत्या घरी कधीतरी झोपेतच त्याचे प्राणपाखरू उडून गेले.

यात अतिशय दुःखाची बाब हीच की त्याचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस उलटले, तरीही कोणाला काही कळाले नाही. अखेर त्याच्यासाठी रोज डबा आणणाऱ्या डबेवाल्याला शंका आल्याने त्याने पोलिसांना बोलावले. त्याच्या घराचे दार उघडून त्यांनी जेव्हा (Shapit Gandharva) आत प्रवेश केला, तेव्हा एवढ्या मोठया धिप्पाड शरीरयष्टीचा मालक आपल्या बेडवर निपचित पडलेला दिसला.

Pune : कलापिनीचा कै. रजनी धोपावकर स्मृतीपुष्प युवा एकांकिका महोत्सव संपन्न

दुर्दैव, दुःख वा शाप यापेक्षा वेगळा काय असतो हो? हिंदी सिनेसृष्टीतला एक अतिशय देखणा, रूबाबदार, पाच लग्ने करूनही एकटा असणारा, असंख्य चित्रपटांत काम करूनही प्रसिद्धीपासून दूर असणारा, महानायक अमिताभचा शेजारी असूनही एकटा असणारा हा शापित गंधर्व म्हणजेच महेश आनंद.

अनेकांना रंकाचा रावच नाही तर सम्राट करणारी ही कचकड्याची दुनिया म्हणजेच फ़िल्म इंडस्ट्री हे कोणालाही न उमगलेले अवघड असे कोडे आहे. इथे किती आले, किती गेले याची गणतीच नाही. आपल्या डोळ्यातली अशक्य स्वप्ने सोबत घेऊन किती तरी वेडे साहसी इथे आले. त्यातल्या काहींचे नशीब फळफळले. त्यांनी इतिहास रचला. पण असे अनेक अगणित आहेत, ज्यांची स्वप्ने डोळ्यासमोर भंग झाली, उद्ध्वस्त झाली.

ज्यांना ते दुःख सहन झाले नाही, त्यांचे पुढे काय झाले (Shapit Gandharva) यावर न बोलणेच योग्य. म्हणूनच नेहमी असे म्हटले जाते की ही फिल्मी दुनिया अतिशय निष्ठुर आहे. याच निष्ठुरपणाचा आणि कटू सत्याचा बळी ठरला महेश आनंद.

13 ऑगस्ट 1961 साली मुंबईच्या वर्सोवा येथे महेश आनंदचा जन्म झाला. त्याचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. त्याची आवड बालपणापासूनच चित्रपटांत काम करावे हीच होती. त्याने नृत्याचे आणि कराटेचे प्रशिक्षण घेतले होते आणि चित्रपटांत येण्याआधी तो भारतातील एक टॉप मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाला होता.

साहजिकच त्याला चित्रपटात काम करण्याच्या ऑफर्स यायला लागल्या; पण दुर्दैवाने त्याला छोटे-मोठया दुय्यम भूमिकाच मिळू लागल्या. 1982 साली त्याने ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हिंदी सिनेमात पदार्पण केले. यातल्या शीर्षक गीतात त्याने सहाय्यक डान्सर म्हणून काम केले होते.

त्यानंतर त्याने करिष्मा, भवानी जंक्शन अशा चित्रपटातही छोटे- मोठे रोल केले. यानंतर त्याच्या आयुष्यात आला 1986 साली आलेला ‘सस्ती दुल्हन महेंगा दुल्हा’ हा त्याला मुख्य भूमिका मिळवून दिलेला पहिला चित्रपट. यात त्याने शंकर नावाचे मुख्य नायक असलेले पात्र रंगवले होते. हाच त्याचा एकमेव चित्रपट ज्यात त्याला मुख्य आणि मोठा रोल मिळाला होता.

दुर्दैवाने हा चित्रपट काही फारसा चालला नाही; पण यातल्या भूमिकेने त्याला पुढील आयुष्यात किमान रोल तरी मिळतील, अशी संधी निर्माण करून दिली होती. यानंतर त्याला चक्क महानायक अमिताभ बच्चनसोबत गंगा जमुना सरस्वती, शहेनशहा या चित्रपटांत काम करायला मिळाले. रोल छोटे असले तरी, अमिताभ समोर असला, तरी महेश आनंदने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आपला रोल सार्थ निभावला आणि हा उंचा-पुरा, देखणा पण खलनायक रोल करणारा अभिनेता सगळ्यांना कोण आहे ते कळाले.

ओळख निर्माण झाली. पैसाही यायला लागला. पण तो फारच अल्प प्रमाणात होता. त्यातच नशीबही सोबत नव्हते. त्यामुळे जे मिळेल ते काम तो करत होता. दुर्दैवाने त्याला भूमिकाही हिरोच्या हातून बेदम मार खायच्याच मिळत होत्या आणि अशाच एका चित्रपटातल्या भूमिकेचे शूटिंग चालू असताना त्याचा अपघात झाला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला.

यातून त्याला सावरायला खूपच वेळ लागला. तो सावरेपर्यंत त्याचे अपरिमित नुकसान झाले होते; ज्यामुळे तो प्रचंड नैराश्यात गेला आणि त्याचपायी त्याला व्यसनही जडले. अखेर एके दिवशी तो राहत्या घरी एकटाच असताना झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कालवश झाला.

दुर्दैवाने त्याचे वैयक्तिक आयुष्यही खूप अपयशी होते. असे कळते की त्याने पाच वेळा लग्न केले; पण त्याचे एकही लग्न टिकले नाही. सर्वप्रथम त्याने त्याची मैत्रीण आणि प्रख्यात सिने अभिनेत्री रीना रॉयची बहीण बरखा रॉयसोबत लग्न केले. पण दोनेक वर्षातच हे लग्न मोडले.

यानंतर त्याने मिस इंडिया असलेल्या (Shapit Gandharva) इरिक मारिया डिसुझासोबत लग्न केले. यातून त्याला त्रिशुल नावाचा एक मुलगाही झाला. पण दुर्दैवाने हेही लग्न जास्त काळ टिकले नाही. नवऱ्याला सोडून मुलासहित इरिक अमेरिकेला निघून गेली आणि तिने मुलाचे तोंडही नवऱ्याला मरेपर्यंत बघूच दिले नाही. असे म्हणतात की तिने मुलाचे नाव सुद्धा बदलले आहे.

यानंतर तो जास्तच निराश झाला. त्यानंतर त्याने कोण्या मधु मल्होत्रासोबत आठ वर्षे संसार केला. पण तोही आठ वर्षांनंतर मोडलाच. त्यानंतर त्याने पुन्हा 2000 मध्ये उषा बच्चानीसोबत लग्नगाठ बांधली, जी दोन वर्षातच सुटली. यामुळेच त्याची मनःशांती जी बिघडली ती पुन्हा कधीच सुधारली नाही.

त्यातच त्याला कामही मिळत नव्हते. याच दरम्यान कधी तरी लासा नावाच्या एका रशियन मॉडेलसोबत त्याने काही काळ एकत्र घालवला; पण हेही फार काळ चालले नाही. याच्या लहरीपणाला आणि व्यसनाला कंटाळून तिनेही याची साथ सोडली आणि महेशचा आनंद पूर्णपणे नाहीसा झाला.

‘एकाकीपणावर औषध दारू’ हा शोध कोणी लावलाय ते माहिती नाही; पण महेश आनंदने याचाच सहारा घेतला आणि त्या व्यसनाने त्याला पूर्णपणे गिळंकृत केले. तो आणखी एकाकी आणि दिवाळखोर होत गेला. अखेर शेजारच्यांच्या तक्रारीची दखल घेत 9 फेब्रुवारी 2019 रोजी पोलिसांनी त्याच्या घरात जेव्हा प्रवेश केला, तेव्हा तो आपल्या सोफ्यावर निष्प्राण निपचित पडलेला होता. पाच वेळा लग्न करूनही एकटा असणाऱ्या महेशला अखेरच्या काळात आनंद देणारी दारूची बाटली मात्र त्याच्या डोक्याजवळ एकनिष्ठ मैत्रिणीसारखी बसून(पडून) होती.

तो नक्की कधी गेला, कशाने गेला- यावर बऱ्याच चर्चा झाल्या; पण नंतर तो हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानेच गेला हे सिद्ध झाले आणि एक देखणा, राजबिंडा पण आयुष्यभर फुटकळ रोल करणारा खलनायक आपल्या शापातून मुक्त होऊन निजधामाला निघून गेला. आजन्म कष्ट आणि नैराश्यावस्थेत असलेल्या महेशला तिथे तरी आनंद मिळावा आणि त्याच्या आत्म्याला सद्गती मिळावी, हीच (Shapit Gandharva) परमेश्वराकडे प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.