Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 29 – मराठी चित्रपटसृष्टीतली पहिली महिला सुपरस्टार रंजना

एमपीसी न्यूज : 80 ते 90च्या दशकात तिने मराठी चित्रपटसृष्टीवर (Shapit Gandharva) जणू राज्यच केले होते. ती मराठी चित्रपटसृष्टीतली पहिली महिला सुपरस्टार होती. ती तिच्या डिमांडनुसार चित्रपट करत होती. खास तिला डोळ्यासमोर ठेवून चित्रपटाची कथा, पटकथा लिहल्या जात होत्या. तिचा नवा चित्रपट म्हणजे हमखास यश असे काहीसे समीकरण बनत चालले होते. सर्व काही सुंदर,दृष्ट लागण्यासारखेच होते, अन या सुंदर सत्याला खरोखरच नियतीची नजर लागली.

एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी बाहेरगावी जात असताना तिच्या गाडीचा भयंकर असा अपघात झाला. त्यातून ती वाचली खरी, पण त्याच अपघाताने तिला कायमचे अपंगत्व दिले. त्यातून ती सावरली असली तरी तिची झळाळती कारकीर्द मात्र पुढे कधीच सावरू शकली नाही. जिवंत होती तोवर, यशाच्या शिखरावर होती तोवर तिच्या अवतीभवती हांजी हांजी करणारे तिला अपंगत्व आल्यावर मात्र जगरहाटी पाळत गेले आणि कधीकाळची ही सुपरस्टार नायिका एकाकी पडत गेली.

यातच एकेदिवशी आपल्या राहत्या घरी कधी तरी तिचा प्राण तिचे फक्त म्हणायला जिवंत असणाऱ्या शरीराला सोडून गेला, कुण्या तरी शेजाऱ्याला तिच्या बंद घराच्या आत काहीतरी विपरीत घडले असल्याचा अंदाज आला, मग पुढील कारवाई झाली.

Pune : डेक्कन कॉलेजमध्ये शनिवारी मेहेरबाबा जीवन परिचय सत्राचे आयोजन

यशाच्या शिखरावर असतानाच अपयशाच्या खोल गर्तेत कोसळणे म्हणजे काय या (Shapit Gandharva) वाकप्रचाराचा अर्थ तेंव्हा अगदी सहजच कळतो; जेंव्हा आपण रंजना देशमुख उर्फ मराठी सिनेरसिकांची लाडकी रंजना हिचे चरित्र वाचतो.

तिचा जन्म 23 जुलै 1955 रोजी मुंबई येथे झाला. तिचे वडील गोवर्धन देशमुख हे गुजरात सिनेसृष्टीतले एक अतिशय वजनदार नाव होते. त्यांना गुजरातचे बालगंधर्व म्हणून ओळखले जायचे, तर तिची आई वत्सला देशमुखही सुद्धा एक अभिनेत्रीच होती. पिंजरा चित्रपटातली मुख्य नायिका संध्याची सख्खी बहिण असलेल्या वत्सला देशमुख यांनी पिंजरा चित्रपटातही एक छोटी पण महत्वपूर्ण भूमिका केली होती.

तिच्या आईवडिलांचा रंजना अगदी लहान असतानाच घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिच्या आईने तिला आणि धाकट्या मुलाला घेऊन मुंबई गाठली आणि प्रचंड कष्ट करुन या दोन्ही मुलांची जबाबदारी अतिशय योग्यरित्या पार पाडली. आपल्या संसारात आलेल्या कटू अनुभवामुळे वत्सलाबाईना रंजनाने फिल्मी दुनियेपासून दूर रहावे असेच वाटत होते.

रंजनानेही आपल्या आईचे कष्ट जवळून पाहील्यामुळे अभिनय प्रशिक्षण न घेता उच्च शिक्षण घेणेच पसंत केले.तिने आपले शालेय शिक्षण परेलच्या सुप्रसिद्ध पडले इंग्लीश मिडियममधून घेतले तर पदवीचे शिक्षण दादर इन्स्टिट्यूटमधून घेतले. याचसोबत तिने सेक्रेटरी, ब्युटीसियन,केटरिंग आदी कोर्सेसही केले होते.

रुईया महाविद्यालयातून तिने तत्वज्ञान व साहित्य या विषयाची पदवी प्राप्त केली होती. लवकरात लवकर एखादी चांगली नोकरी करुन आपल्या वृद्ध आईला आनंदी ठेवणे असेच तिच्या मनात होते, मात्र नियतीच्या मनात मात्र काही तरी वेगळेच होते. सुप्रसिद्ध सिनेनिर्माते स्वर्गीय व्ही.शांताराम यांचे चिरंजीव किरण शांताराम यांनी 1975 साली निर्माण केलेल्या “चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी”या चित्रपटात तिला एक भूमिका दिली, अन इथूनच तिच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली.

खरे तर वयाच्या अवघ्या 5 व्याच वर्षी तिने हरिश्चंद्र तारामती या पौराणिक चित्रपटात तर “लडकी सह्याद्री की’या आणखी एका हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून भूमिका केल्या होत्या,पण आईचा तीव्र विरोध बघून तिने स्वतःला चित्रपट दुनियेच्या मायावी नगरीपासून स्वतःला दुरच ठेवले होते. मात्र, किरण शांताराम यांच्या “चंदनाची चोळी अंग अंग जाळी” या चित्रपटातल्या जबरदस्त अभिनयामुळे त्यांनीच आपल्या पुढच्या “झुंज”या चित्रपटात तिला मुख्य भूमिका दिली.

ग्रामीण शाळेतील शिक्षिका तिने इतकी सुंदर निभावली की ज्याचे नाव ते.यानंतर तिला अनेक मोठमोठे चित्रपट मिळाले. असला नवरा नको ग बाई’, भालू, मुंबईचा फौजदार’, अरे संसार संसार आणि चानी. रंजना यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी जर कुठल्या चित्रपटाने मिळाली असेल तर तो चित्रपट म्हणजेच चानी. चि. त्र. खानोलकर यांच्या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट.

यातील चानीची व्यक्तिरेखा रंजना यांनी तंतोतंत साकारली. मराठी स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेली आणि म्हणुनच तात्कालीन समाजाकडून नाकारले गेलेले स्त्री रंजना यांनी हुबेहूब रंगवली. सुशिक्षित संवेदनशील शाळा शिक्षक ते खुनी स्त्री अशा दोन टोकांमधील प्रवास साकारणारी सुशीला या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली.

रंजना यांच्या अभिनयाचा खरा कस जर लागला असेल तर तो अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिका साकारताना. कुलदीप पवार या अभिनेत्याचा बरोबर त्यांची या चित्रपटातील भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होती. नववधू म्हणून नव्याने घरात आलेली, शेतकरी नवऱ्याबरोबर हालाखीचे जीवनही आनंदात व्यतीत करणारी गृहिणी, नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांसाठी हिमतीने उभी राहणारी आई, आणि वृद्ध झाल्यावर अगदी सुना आल्यावर सुद्धा घराचे अभंगत्व टिकविण्यासाठी धडपडणारी ससु असा वयपरत्वे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास एकाच चित्रपटातून उलगडून दाखवणाऱ्या रंजना यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

त्यांची विशेष भूमिका म्हणून आपल्याला मुंबईचा फौजदार या चित्रपटातील भूमिकेकडे पाहावे लागेल. ग्रामीण खेडवळ ते शहरी सुशिक्षित स्त्री यातील विरोधाभास रंजना यांनी अगदी समर्थपणे साकारला. या चित्रपटातून त्यांच्या दमदार अभिनयाची कल्पना येते.

रंजना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले पण त्यांची खरी जोडी जमली असेल तर ती अशोक सराफ यांच्या बरोबर. अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनय केलेले रंजना यांचे सुशीला, गोंधळात गोंधळ, गुपचुप गुपचुप, बहुरूपी, बिन कामाचा नवरा, खिचडी हे चित्रपट विशेष गाजले. या दोघाच्या रूपाने चित्रपट सृष्टीला अशोक- रंजना या नावाची एक नवी कलावंत जोडी लाभली होती. एक डाव भुताचा, बिन कामाचा नवरा, गोंधळात गोंधळ अशा अनेक चित्रपटात रंजनाची अशोक सराफ यांच्या सोबत ऑन स्क्रिन केमिस्ट्री खूप छान जमून आली होती.

त्यामुळेच अनेक सिनेमासिकात रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा रंगली होती. एवढेच नाही तर या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचाही बोलले जात होते या चर्चा शेवटपर्यंत चर्चा ठरल्या. त्याला निमित्त ठरला तो रंजना चा अपघात. सारं काही सुरळीत सुरु असताना 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोर ला जाताना एका अपघातात रंजनाला कायमचा अपंगत्व आलं आणि रंजनाच्या फिल्मी करिअरला कायमचा पूर्णविराम लागला. या अपघातातून रंजना शेवटपर्यंत सावरू शकली नाही.

अपघातानंतर अशोक सराफ हे रंजनाच्या आयुष्यातून कायमची निघून गेले. अशोक सराफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली जगासमोर कधीच दिली नाही पण अपघातानंतर च्या एका नाटकातून रंजना यांनी आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. हे नाटक रंजनाच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जातं.”फक्त एकदाच” या मराठी नाटकातून रंजना यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं.व्हील चेअर वर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे कथानक असलेले हे नाटक रंगभूमीवर आलं ज्या मध्ये त्यांनी अखेरची भूमिका केली होती.

याचदरम्यान अशोक सराफ यांनी निवेदिता यांच्यासोबत विवाह केला आणि या प्रकरणाला पूर्णविराम लागला. त्यानंतर रंजना यांनी शेवट पर्यंत लग्न केले नाही. मात्र त्या या सर्व प्रकाराने एकाकी पडल्या आणि नैराश्यात गेल्या. माणसाला एकाकीपणासारखा दुसरा कुठलाही शाप मोठा नाही, हाच शाप या बुद्धिमान, चतुरस्त्र अभिनेत्रीला होता, त्यानेच त्यांचा घात केला.अखेर 3 मार्च 2000 रोजी तिचा राहत्या फ्लॅटमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असे म्हटले जाते.

त्यावेळी तिचे वय फक्त 45 वर्षे एव्हढेच होते, मात्र दुःख हेच की त्याक्षणी तिच्याजवळ कोणीही नव्हते, हेच सत्य आहे.
खडतर बालपण, त्यातच अगदी नकळत्या वडिलांचा आधार सुटणे, आईच्या कडक शिस्तीत गेलेले, तारुण्य या सगळ्याची भरपाई परमेश्वराने तिला नंतर अफाट यश, किर्ती, मानसन्मान मिळवून काही प्रमाणात का होईना केलीय असे वाटत असतानाच तिच्या आयुष्यात तो तिला उध्वस्त करणारा अपघात झाला अन त्याने ती अक्षरशः सर्वस्व गमावून बसली.

असे का झाले या प्रश्नाला कधीच उत्तर नसते, आपण ते शोधूही नये. पण एका चांगल्या अभिनेत्रीचा अतिशय अकाली झाला हेच कटू सत्य आहे. तिच्या पावन आत्म्याला सदगती मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.