Shapit Gandharva : शापित गंधर्व- भाग 50 – नम्रता शिरोडकर – धडाकेबाज सुरूवातीनंतरही पदरी अपयशच!

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) – तिचा जन्म एका नामांकित घराण्यात झाला होता. आचार्य अत्रे यांच्या अजरामर ‘ब्रह्मचारी’ या प्रसिद्ध चित्रपटातली सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘मीनाक्षी’ तिची आजी. तिची धाकटी बहीण शिल्पा ही सुद्धा एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. या देदिप्यमान पार्श्वभूमीसोबतच ती स्वतःही उत्तम अभिनेत्री होती. तिने 1993 मध्ये “मिस फेमिना” ही स्पर्धा जिंकली होती. याच वर्षी तिने “फेमिना इंडिया पॅसिफिक” ही स्पर्धा सुद्धा जिंकली होती,तर मिस युनिव्हर्स या प्रसिद्ध स्पर्धेतही ती सहभागी होती. आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच तिने सलमान खान, संजय दत्त, अजय देवगण सारख्या सुपरस्टार सोबत तिने काम करुन धडाकेबाज सुरुवातही केली होती. तिची घोडदौड पाहून वाटत होते की ही मराठी मुलगी (Shapit Gandharva) हिंदी रुपेरी पडदा नक्कीच गाजवेल, मात्र पुढे तसे काही झाले नाही.

22 जानेवारी 1972 साली मुंबईनगरीत जन्मलेल्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांची नात,शिल्पा शिरोडकरची थोरली बहीण,”वास्तव, जब प्यार किसींसे होता है,कच्चे धागे” सारख्या चित्रपटाची नायिका म्हणजेच नम्रता शिरोडकर (Shapit Gandharva). हिचे फिल्मी करियर म्हणजे तसे असफलच आहे.

तिचे शालेय शिक्षण मुंबई येथेच झाले, तर सुप्रसिद्ध मिठीबाई कला महाविद्यालयात तिने आपले पदवीचे शिक्षण प्राप्त केले.तिच्या घरचे वातावरण एकदम मोकळे-चाकळे आणि उदारमतवादी होते.तिच्या आईवडीलांनी आपल्या मुलीच्या आवडीलाच आपली आवड मानले. नम्रताला घरात लाडाने ‘चिनू’ म्हणून संबोधले जायचे.आपल्या आजीला बघत नम्रता आणि शिल्पा मोठ्या झाल्या. तिने कॉलेज मध्ये असतानाच मॉडेलिंग  करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान तिने ‘फेमिना मिस इंडिया’ मध्ये भाग घेतला आणि त्यात ती विजयी सुद्धा झाली. यामुळेच तिचे नाव प्रसिद्ध झाले. तसेही ती एका नामांकित घराण्यातली असल्याने तिला आज ना उद्या चित्रपटसृष्टीतून ऑफर येणार होत्याच. त्या या निमित्ताने यायला सुरुवात झाली एवढेच.

खरे तर 1977 साली प्रदर्शित झालेल्या आणि अतिशय यशस्वी ठरलेल्या “शिर्डी के साईबाबा” या चित्रपटात तिने बालकलाकार (Shapit Gandharva) म्हणून चेहऱ्यावर मेकअप पहिल्यांदा नटी म्हणून केला होताच,तो तिचा पहिला ब्रेक. यानंतर तिला अक्षयकुमार आणि सुनील शेट्टी सोबत ‘पूरब की लैला,पश्चिम का छैल्ला’ हा चित्रपट पहिला ब्रेक म्हणून मिळाला होता. याला नदीम श्रवणचे संगीत होते, मात्र हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.

यानंतर सलमान सोबत ‘जब प्यार किसींसे होता है’ या चित्रपटात ती झळकली. तिचा रोल छोटा असला तरीही तिने आपल्या अभिनयाने रसिकांना आणि समीक्षकांनाही आपली दखल घ्यायला भाग पाडले, अन यानंतर तिला मिळाला महेश मांजरेकर दिग्दर्शीत आणि संजय दत्त अभिनित “वात्सव” हा सुपरहिट चित्रपट. यात तिने मुंबईच्या कोठ्यावरची वेश्या ते गँगस्टर रघू शिवलकरची बायको ‘सोनू’ हा रोल अप्रतिमरित्या निभावला आणि आपल्यातल्या उत्तम अभिनेत्रीचे सुखद दर्शन सर्वांनाच घडवले.यानंतर अजय देवगण आणि सैफ अली खान सोबतच्या “कच्चे धागे” या चित्रपटानेही चांगले यश मिळवले आणि नम्रता शिरोडकर (Shapit Gandharva) नाव वलयांकित झाले.

नम्रता नि:संशय हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणार असे वाटायला लागले होते,मात्र का कुणास ठाऊक तिच्याकडे सर्व काही असूनही तिला यानंतर फारसे आणि मोठ्या बॅनर्सचे चित्रपट मिळालेच नाहीत.नेपोटीजम हा हिंदी चित्रपटसृष्टीतला फार पूर्वीपासूनचाच आजार म्हणा वा शाप पणा पण आहे. त्यांच्या गटात न बसणारे कितीतरी प्रतिभावंत याला बळी पडले आहेत. नम्रताही कदाचित याचाच बळी झाली असेल.

हिंदी चित्रपट सृष्टीत हवे तसे काम न मिळाल्याने तिने (Shapit Gandharva) आपला मोर्चा प्रादेशिक चित्रपटाकडे वळवला. इथेच “वामसी” या चित्रपटातच्या शूटिंगच्या दरम्यान ती तिकडचा मेगास्टार “महेश बाबू”ला भेटली आणि पहिल्याच भेटीत आपण दोघेही एकमेकांसाठीच आहोत, अशी अनुभूती त्यांना आली. तसेही तिला इथल्या राजकारणाचा उबग आलाच होता. तिने मग आपल्या “आतला” आवाज ऐकला आणि महेशबाबू सोबत सप्तपदी चालण्याचा निर्णय घेत रेशमगाठ बांधली.

PCET-Nutan Group: पीसीईटी-नूतन ग्रुपच्या तीन विद्यार्थ्यांना मंदीच्या काळातही 15.78 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज

आज या जोडीच्या लग्नाला जवळजवळ 23 वर्षे झाली असून यांचा संसार अतिशय छान असा सुरळीतपणे फुलला आहे.यांच्या संसारवेलीवर एक मुलगा आणि एक मुलगी- अशी दोन लोभस फुले फुलली आहेत. एकंदरीतच तिचे वैवाहिक आयुष्य अतिशय छान चालले आहेच,पण या सर्वांमुळे तिच्यातली उत्तम अभिनेत्री रुपेरी पडद्याआड गेली आहे- हेच खरे.

 

कदाचित राजकारण, कदाचित गटबाजी, कदाचित प्रारब्ध, यातले कुणी तरी एक याला कारणीभूत आहे हे नक्की. अन त्यामुळेच एक उत्तम अभिनेत्रीला अस्सल रसिक मूकले (Shapit Gandharva) आहेत हे खेदाने म्हणावे लागते.काहीही असो असे का? असे- जेंव्हा जेंव्हा आपल्यालाच आपण विचारतो तेंव्हा त्याचे अंती एकच उत्तर येते-‘त्याची मर्जी’. जिसके आगे किसीकी नही चलती, हेच खरे. नाही का?

परमेश्वराने तिला उत्तम आयुष्य दिलेले आहेच,पण त्याचसोबत त्याने तिला तिची आणखी खास आणि सशक्त अभिनेत्री अशी कधीही न पुसणारी ओळख निर्माण होईल अशी संधी यापुढे तरी द्यावी..इतकीच त्याच्याचरणी प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.