Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 30 – धूमकेतू कांचन बाबला

एमपीसी न्यूज : मला खूप चांगले आठवते. 1987 सालचा तो प्रसंग. माझा मोठा भाऊ सुरेश तोडेवाले हा आमच्या नव्या पिढीतला सर्वात आधी अन् तेही शासकीय नोकरीला लागला होता. तो आमच्या सर्व भावंडांत सर्वांचाच परमप्रिय आणि आदरणीय आहे. (Shapit Gandharva) तो तेव्हा मलकापूर येथे नोकरीला होता आणि तो सणावाराच्या सुट्टीत घरी येत असे. एक तर तो प्रचंड लाघवी, प्रेमळ आणि सर्वांना एकसंध ठेवणारा असल्याने त्याच्या त्या भेटी आमच्यासाठी निव्वळ एक अवर्णनीय सोहळा असायचा.

 

असेच एकदा तो आला असताना गप्पा टप्पा रंगल्या. पूर्वी दूरदर्शन असले तरी त्याची अजूनही इतकी क्रेझ निर्माण झाली नव्हती. रेडिओ,टेपरेकॉर्डरवर गाणे लावून विविध खेळ खेळण्यात खूप मज्जा यायची. असेच आम्ही काही तरी खेळत असताना आपापल्या  आवडीच्या विषयावर गप्पा सुरू झाल्या अन् गाण्याप्रति येवून थांबल्या. आपल्या आवडीच्या गाण्याची यादी करायची ठरले अन् त्याने सर्वप्रथम यादी करताना दोन गैरफिल्मी गाणी निवडून आम्हाला आश्चर्यचकित केले. मग ती गाणी ऐकायची तर कशी ऐकायची हा प्रश्न आला. तेव्हा आताच्या सारखी सहजसोपी जी हवीत ती गाणी मिळायची नाहीत. एक तर नवीन कॅसेट विकत घेणे किंवा दहा रुपये खर्च करून आपल्या जवळच्या जुन्या कॅसेटमध्ये गाणी भरून घेणे असे मार्ग असत.

 

त्यानुसार आम्ही सर्वांनी प्रत्येकी दोन दोन गाणी निवडली अन् ती भरून घ्यायची जबाबदारी आली माझ्या अनिल नावाच्या दुसऱ्या भावावर आणि माझ्यावर. एक-दोन दिवसांत ती गाणी भरून मिळाली अन् मग ती ऎकायलाही मिळाली. तेव्हा(आणि आजही) फक्त कानसेन असलेल्या मला ती गाणी (Shapit Gandharva) ऐकल्या-ऐकल्या इतकी आवडली की, ती माझीही लगेच आवडीची झाली. यातले पहिले गाणे होते ‘हम न जैबे ससुर घर में बाबा’ आणि दुसरे होते ‘कैसे बनी कैसी बनी, गुल्लारी बिना चटणी कैसे बनी’ आणि ही दोन्ही गाणी गायली होती कांचन माळी उर्फ कांचन बाबला.

 

 

Pune News : जलयुक्त शिवार अभियान 2.0; जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

त्यानंतर मात्र त्या गायिकेचा मी चाहता झालो. मी ही ‘शापित गंधर्व’ नावाची लेखमाला सुरू केली, तेव्हा या गायिकेच्या बाबतीत माहिती काढायची ठरवले, तेव्हा मला या गायिकेने फारच कमी चित्रपटगाणी  गायली असे समजले. बरं तिने कोणती गाणी गायली आहेत ते तुम्हाला सांगतो. वरील दोन सोडून तिच्या नावावर दोन अतिशय सुपरहिट गाणी आहेत. कुठली? ‘लैला ओ लैला’ हे अन् दुसरे ‘क्या खूब लगती हो’. तिच्या बाबतीत असे का झाले हे कळत नाही. ती कल्याणजी -आनंदजी यांची सख्खी भावजय होती, तरीही तिला चित्रपटातली गाणी फारशी गायला संधी मिळाली नाही. कदाचित हाच दैवी खेळ असावा.

कांचन दिनकर माळी उर्फ कांचन बाबला हे आजच्या शापित गंधर्वाचे नाव. तिच्या नवऱ्याचे नाव होते लक्ष्मीचंद वीरजी शाह उर्फ बाबला. तिचे लग्नाआधीचे नाव होते कांचन दिनकरराव माळी. म्हणजेच ही आपली मराठी मुलगी. तिला बालपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. (Shapit Gandharva) तिच्या सुदैवाने तिच्या वडिलांनीही तिची आवड लक्षात ठेवून तिला गायनासाठी सदैव प्रोत्साहनच दिले. याच आवडीतून तिला भेटला लक्ष्मीचंद शहा ऊर्फ बाबला. आधी ओळख , मग मैत्री, नंतर प्रेम आणि शेवटी लग्न असा तिच्या प्रेमकहाणीचा प्रवास आहे. त्यांची जोडी तिच्या अखेरपर्यंत अतूट राहिली. ती 2004 साली निधन पावली.

 

तिच्या नावावर धर्मात्मा, कुर्बानी, रफूचक्कर असे सुपरहिट चित्रपट असूनही तिला चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून बस्तान बसवता आले नाही. असे का झाले असावे याचे अनुमान काही लागत नाही. पण कल्याणजी-आनंदजीच्या घरातल्या अन् उत्तम आवाज असलेल्या गायिकेला दैवाने कायमच दुर्लक्षित राहशील, असाच काहीसा शाप दिला असावा, असे तिचे प्रोफाइल बघताना सतत जाणवते.

तिला चित्रपटसृष्टीने जरी फारशी संधी, नावलौकिक दिले नाही, पण तिने आपल्या जीवनसाथीच्या प्रोत्साहनामुळे  भोजपुरी लोकसंगीतात उत्तम गाणी गाऊन आपली छाप पाडली. तिने वीरजी बाबला सोबत अनेक स्टेज शो, ऑर्केस्ट्रा करत आपल्या नावाचा पंचम सर्वत्र गाजवला. तिने परदेशातही आपले चाहते निर्माण करून तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षाला एकप्रकारे सणसणीत उत्तरच दिले. तिने असंख्य शो केले असले तरी खास करून ती त्रिनिदाद, टोबॅगो, गयाना या वेस्ट इंडीजमधल्या काही खास देशात खूप लोकप्रिय होती. चटणी आणि चटणी सोका ही तिची भोजपुरी गाणी खूप लोकप्रिय होती अन् आजही आहेत.
तिला एक मुलगा वैभव आणि निशा नावाची एक कन्या आहे.

 

वैभव झी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘सारेगमप’च्या अनेक मालिकेत ड्रमर म्हणून आपल्याला बघायला मिळतो,तर तिचे पती बाबला शाह आजही विविध शो मध्ये स्वतःला व्यस्त ठेवून आहेत.(Shapit Gandharva) परमेश्वर कधी कधी इतके सुख देतो एखाद्याला की, त्या व्यक्तीला आपण जगातले सर्वात सुखी किंवा महान वाटावं इतपत. हे सुख चिरकाल ज्यांच्या आयुष्यात असते ते जगातले खरे ईश्वरी अंश. पण ज्यांना क्षणिक सुख अन् त्यानंतर विवंचनाच जास्त ते शापित गंधर्व, बरोबर का?

 

आपल्या आयुष्यात आपल्या जवळ सर्व काही असूनही यशाची ती परिमाणे न मिळवू शकलेल्या कांचन बाबलाच्या पावन आत्म्याला सद्गती मिळो ही प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हातात आहे तरी काय, नाही का?मी तरी तेच करतोय. तुम्हीही ते करावे अशी आशा बाळगतो. कांचनला भावपूर्ण आदरांजली.

 

विवेक दिगंबरराव कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.