Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 14 – धूमकेतू नरेंद्र हिरवाणी

एमपीसी न्यूज : जगातल्या कुठल्याही आणि कितीही महान खेळाडूंना हेवा वाटावा असे त्याचे अविस्मरणीय पदार्पण झाले होते. बरं, तो नुसताच पदार्पण करून बसला नाही, त्याने पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम करत आपले नाव क्रिकेट इतिहासात अजरामर केले होते. (Shapit Gandharva) त्याने शब्दशः भीमपराक्रम केला होता; तो ही जगातल्या सर्वात खतरनाक संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विंडीज संघाविरुद्ध; ते ही किंग रिचर्डस, रिचर्डसन, हुपर असल्या खतरनाक फलंदाजासमोर. त्यातही विशेष बाब म्हणजे त्याने विवीयन रिचर्डसला दोन्हीही डावात बाद करून आपली कमाल दाखवली होती. त्याने रिचर्डसह तब्बल 16 फलंदाजांना गारद करून पदार्पणातच अशी विक्रमी कामगिरी करून एक इतिहास रचला होता, जो आजही कायम आहे. 

मात्र त्यानंतर त्याला पुन्हा तशी कामगिरी कधीही करता आली नाही. आणि जितक्या लवकर तो सर्वांच्या ओठावर चर्चिला गेला, तितक्याच वेगाने तो विस्मरणातही गेला. होय! नमनाला घडाभर तेल ज्याच्यावर खर्च केलेलं आहे, मी त्याच पाचव्या शापित गंधर्वाबाबत आज बोलणार आहे. ‘नरेंद्र दीपचंद हिरवाणी’ या भारतीय संघाच्या माजी जादुई लेगस्पिनर बद्दल, त्याच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दलचा हा पाचवा लेख आहे.

आतापर्यंत सलग चार लेख चित्रपट कलाकारांवर आल्याने ही लेखमाला फक्त त्यांच्यावरच आहे का, असे प्रश्न मला अनेकांनी केले. नक्कीच ही लेखमाला कुठल्याही एकाच प्रकारच्या व्यक्तित्वावर नसणार आहे. हळूहळू तिचे रंग-रूप तुमच्यासमोर उलगडत जातील मायबापहो! (Shapit Gandharva) जसे एखाद्या फलंदाजासाठी पदार्पणातल्या सामन्यात केलेल्या शतकी खेळीचे मोल अवर्णनीय असते, तशीच महती पदार्पणातल्या सामन्यात घेतलेल्या एका डावातल्या पाच बळींना असते. हिरवाणीने तर आपल्या पदार्पणातल्या चेन्नई कसोटीतल्या दोन्हीही डावात 8 आठ गडी गारद करून पदार्पणातच दोन्ही डावात मिळून सोळा गडी बाद करत विश्वविक्रम केला होता, जो आजही तसाच अबाधित आहे.

विवीयन रिचर्डसच्या नेतृत्वाखाली खतरनाक विंडीज संघ 1988 साली भारतीय दौऱ्यावर आला होता. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता दिलीप वेंगसरकर. पहिल्याच कसोटीत भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतरचे दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिले. शेवटचा कसोटी सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम (आताचे चेपोक) मैदानावर खेळवण्यात येणार होता आणि दुर्दैवाने सामन्याच्या फक्त एकच दिवस अगोदर कर्णधार दिलीप वेंगसरकर आजारी पडला. रवी शास्त्रीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी आली. कर्णधार म्हणून शास्त्रीची सुद्धा ही पहिलीच कसोटी होती.

चेन्नईचे उष्ण आणि दमट हवामान नेहमीच कुठल्याही खेळाडूसाठी फारच कठीण आणि आव्हानात्मक असते. इथे परदेशी खेळाडूंची बऱ्यापैकी दमछाक होते, (Shapit Gandharva) हे ओळखून रवी शास्त्रीने या मालिकेतल्या शेवटच्या कसोटी सामन्यात नरेंद्र हिरवाणीला अंतिम 11 मध्ये स्थान दिले आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत हिरवाणीने पहिल्या डावात 18.3 षटकात 61 धावा देत 8 गडी बाद करत आपल्या आगमनाची जबरदस्त नांदी दिली. या कसोटीत त्याच्याबरोबरच अजय शर्मा आणि वुर्केरी वामन रमण यांनीही कसोटी पदार्पण केले होते.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना  382 धावांची मोठी मजल मारली होती. उत्तरादाखल खेळताना विंडीज संघ फक्त 184 धावाच करू शकला होता, तर दुसऱ्या डावात भारताने आपला डाव 217 वर घोषित करून विंडीजपुढे 415 धावांचे मोठे अन् अशक्यप्राय लक्ष्य विजयासाठी ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना विंडीज संघ फक्त 160 धावातच गारद झाला आणि भारतीय संघाने 255 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकून मजबूत विंडीज संघाविरुध्दची कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात मोठे यश मिळवले होते. यश यासाठी की त्या विंडीज संघात रिचर्डस, ग्रीनीज, हेन्स, लोगी,पॅटर्सन,मार्शल असे एकापेक्षा एक मोठे खतरनाक खेळाडू होते. हिरवाणीने दुसऱ्या डावातही  75 धावा देत आणखी 8 गडी बाद करून बॉब मेस्सीच्या विक्रमाला मागे टाकत आपले नाव क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात सोनेरी अक्षराने गोंदवले. तो विक्रम अद्यापही अबाधित आहे.

साहजिकच या ऐतिहासिक आणि विक्रमी कामगिरीमुळे नरेंद्र हिरवाणी एका रात्रीत जगप्रसिद्ध  झाला. मोठमोठ्या क्रीडा मासिकात त्याची नोंद घेतली जावू लागली. आजच्या इतका मीडिया तेव्हा सुपरफास्ट नसला, तरीही मी ज्या खेडेगावात राहत असे, तिथेही नरेंद्र हिरवाणीचे पेपरमध्ये आलेले फोटो कात्रीने व्यवस्थित कापून ठिकठिकाणी चिटकवून त्याचे अमाप कौतुक केलेले  मला आजही आठवते, तेव्हा मी 15 वर्षाचा होतो. (Shapit Gandharva) त्याने पदार्पणातच केलेल्या या विक्रमी कामगिरीसारखेच  सातत्य पुढील तीन सामन्यातही  दाखवले, ज्यामुळे पहिल्या चार सामन्यात त्याच्या नावावर 36 कसोटी बळी झाले होते. त्यामुळे साहजिकच त्याच्या नावाचा पंचम सर्वत्र जोरात होता आणि कदाचित त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षाही जास्त होत्या. मुळातच लेगस्पिन गोलंदाजी ही फार अवघड अशी कला आहे. फार म्हणजे फारच कमी लेगस्पिनर चिरकाल यशस्वी ठरू शकले, हाच खरा इतिहास आहे. त्यामुळे यात आले किती आणि गेले किती- हाच मोठा संशोधनाचा विषय आहे.

त्यानंतर त्याला पुढील सामने भारतीय उपखंडाबाहेर आणि विदेशातही खेळावे लागले, जिथे त्याची जादू त्याला दाखवता आली नाही ती नाहीच. त्यामुळे अवघे 16 कसोटी आणि 18 एकदिवसीय सामने खेळल्यानंतर हिरवाणीला आपले संघातले स्थान गमवावे लागले.16 कसोटीत त्याने एकूण 66 बळी घेतले होते. त्यातले 36 पहिल्या चार सामन्यात आले होते. त्यानंतरच्या बारा कसोटी सामन्यात त्याला फक्त 30 च गडी बाद करण्यात यश आल्याने, त्याचे संघातले स्थान अस्थिर होऊन त्याला संघाबाहेर पडावे लागले. तर 18 एकदिवसीय सामन्यांतही त्याला फ़क्त 23 गडीच बाद करता आले. याच दरम्यान भारतीय संघात जादुई लेगस्पिन करणारा आणि पुढे अनेक विश्वविक्रम करणारा अनिल कुंबळेही  आला होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने हिरवाणीची कोणाला आठवणही येत नव्हती. हळूहळू तो प्रसिद्धीपासून दूर होत गेला. नंतर कधीतरी त्याने निवृत्ती जाहीर केल्याचे वृत्तही कुठल्या तरी वर्तमानपत्रात वाचायला मिळाले.अन् मग पुन्हा त्याची ती ऐतिहासिक कामगिरी चर्चेत आली.

अशा रितीने जितक्या लवकर तो जगाला माहिती झाला, तितक्याच वेगाने तो लोकांच्या स्मृतीतून आणि भारतीय संघातूनही नाहीसा होत गेला. जणू धूमकेतूच तो. 18 ऑक्टोबर 1968 साली गोरखपूर येथे जन्माला आलेल्या हिरवाणीने क्रिकेटच्या प्रेमाखातर इंदूर येथे स्थलांतर केले. (Shapit Gandharva) तिथे ज्येष्ठ रणजीपटू संजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवित आपल्या नावाचा दबदबा अल्पावधीतच निर्माण केला आणि वयाच्या 21 व्या वर्षीच राष्ट्रीय संघात स्थान मिळवून मोठी मजल मारली. त्यावर आणखी मोलाची कामगिरी करत त्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात ऐतिहासिक विक्रमी कामगिरी करून आपले नाव जगभर अजरामर केले. पण त्याची कामगिरी फारच अल्प अशी राहिली. अखेर 1996 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळल्यानंतर तो संघाच्या बाहेर गेला; तो पुन्हा कधीही संघात आला नाही तो नाहीच.

तो आता इंदोर येथे क्रीडा अकादमी चालवतो आहे. मूळचा काहीसा अबोल, प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या या महान खेळाडूला कधीही कोणालाही आपल्यावर अन्याय झाला असे म्हणावे लागले नाही, ना त्याने कोणासमोर येऊन रडून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला. जे मिळाले त्यात तो तेव्हाही समाधानी होता आणि आजही  आहे. त्याला एक 28 वर्षाचा मुलगा असून त्याचे नाव मिहीर आहे. त्याने मध्यप्रदेश रणजी संघातून आतापर्यंत बरेचसे रणजी सामने खेळलेले आहेत. अद्याप तरी त्याचे नाव मी कुठल्याही आयपीएल संघात ऐकलेले नाही. नरेंद्र हिरवाणी यांच्या इंदोर येथील क्रीडा अकादमीमधून राष्ट्रीय संघाचे चिरकाल प्रतिनिधित्व करणारे असंख्य क्रीडापटू निर्माण होवोत आणि त्याचे पुढील आयुष्यही आनंदी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.