Shapith Gandharva : शपित गंधर्व – भाग – 22 – एकाकी सारिका

एमपीसी न्यूज : तिच्या उमेदीच्या काळात ती एक अतिशय यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. तिने वयाच्या 6 व्या वर्षापासूनच कष्ट करायला सुरुवात केली होती. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नाणे खणखणीतरित्या वाजवले होते. ती मराठी मुलगी होती. (Shapith Gandharva) तिने पैसा, नाव, प्रतिष्ठा सर्व काही कमावले होते. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला महानायक कमल हसनसोबत रेशीमगाठ बांधून सात जन्म एकत्र चालण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र बालपणापासूनच तिच्या भाळी विधात्याने संघर्ष, दुःख आणि एकाकीपणच लिहिले असावे, असे तिचे चरित्र वाचताना, तिची कारकीर्द बघताना मनाला जाणवत राहतेती म्हणजे 80 च्या दशकातली एक लोकप्रिय, यशस्वी आणि सुंदर अभिनेत्री सारिका ठाकूर.

3 जून 1962 साली दिल्ली येथे जन्मलेल्या सारिकाच्या आईचे नाव कमल ठाकूर होते. तिचे बालपण अतिशय खडतर होते. तिचे वडील तिला आणि तिच्या आईला एकटे टाकून सोडून गेले होते. तिची आई अतिशय कर्मठ आणि कडक स्वभावाची होती. त्यामुळे सारिकाला बालपणापासूनच अर्थार्जन करावे लागले. या कठीण काळात एक गोष्ट अनुकूल होती, ती म्हणजे सारिका दिसायला सुंदर होती आणि तिला अभिनयाची उपजत जाणही होती. दैव अनुकूल असले की अशक्य कामे सहज होतात आणि प्रतिकूल असले की…..

सारिकाने वयाच्या अगदी सहाव्या वर्षीच ‘हमराज’ नावाच्या हिंदी चित्रपटातून रजतपडद्यावर पदार्पण केले. यात तिने ‘मास्टर सूरज’ नावाने छोटी भूमिका केली होती. या चित्रपटाला बऱ्यापैकी यश मिळाल्याने सारिकाला पुढे आणखी काम मिळत गेले. छोटी बहू, बडे दिलवाला, रजिया सुलताना- अशा काही चित्रपटांत तिने काम केल्याने तिला नावासोबत प्रसिद्धी आणि पैसाही मिळू लागला. मात्र ती सर्व पैसा स्वतःकडे न ठेवता आईकडे देत असे. तिच्या आईने का कुणास ठाऊक, मुलीच्या नावावर काहीही न ठेवता सगळीकडे आपलेच नाव लावले.(Shapith Gandharva) असेही म्हटले जाते की तिचा खूप धाक होता सारिकाला. याच दरम्यान सारिकाच्या यशाची गाडी अतिशय भरधाव वेगाने सुटली होती. तिची जोडी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार अभिनेता आणि आताचा प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकरसोबत खूप जमली होती.

दोघांची प्रेमकहाणीही वैयक्तिक आयुष्यात फुलत होती. या जोडीने एक,दोन ,तीन नाही, तर तब्बल 12 चित्रपटांत एकत्र काम करून त्या चर्चेला जणू खतपाणीच घातले. ‘गीत गाता चल’ या चित्रपटाने या जोडीला चांगलेच यश मिळवून दिले होते. त्याचसोबत ‘जान ए बहार, मधुमालती, रक्षाबंधन, जायें तो जायें कहाँ’ या चित्रपटांना बऱ्यापैकी यश मिळाल्याने हे दोघे वैयक्तिक आयुष्यातही फार जवळ आले होते. हे दोघेही आता लवकरच लग्न करणार, अशी चर्चा त्यावेळी खूप जोरात होती. पण असे म्हटले जाते की सारिकाच्या आईने लग्नानंतर मुलीच्या करियरला बाधा येईल, असे वाटल्याने किंवा तिचे लग्न झाल्यानंतर तिची कमाई आपल्या हातात येणार नाही, या धास्तीने हे लग्न होऊच दिले नाही.

सारिका आईचा विरोध मोडून काढू शकली नाही; पण ती आईच्या विरोधाने खूप निराश झाली. ती शुटिंगवरून आली की घरात न जाता गाडीत झोपत असे, असेही वाचण्यात येते. अखेर ती या सर्व मनस्तापाला वैतागून हिंदी चित्रपटसृष्टी सोडून दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. याच वेळी तिच्या आयुष्यात आला तो तिकडचा सुपरस्टार कमल हसन. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. (Shapith Gandharva) कमल हसनचे वाणी गणपती सोबत त्या आधी लग्न झालेले होते, पण प्रेमात अंध झालेल्या सारिकाने त्याच्यासोबत लिव्ह इन राहण्याची तयारी दाखवली आणि साऱ्या दुनियेच्या नाकावर टिच्चून हे दोघे एकमेकांसोबत राहू लागले. पुढे कमल हसनने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. पण त्या आधीच त्यांच्या आयुष्यात एक कन्या आली होती, जी आताची सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘श्रुती हसन’ म्हणून सर्वांना परिचित आहे. श्रुती 8 वर्षांची  झाल्यानंतर या जोडीने अखेर लग्न केले. तिला आणखी एक मुलगी आहे. तिचे नाव अक्षरा.

बालपणापासून कष्ट केलेल्या सारिकाच्या आयुष्य आता बऱ्यापैकी स्थैर्य आले, असे वाटायला लागले होते. देवाने तिला न्याय दिलाय, असे तिला वाटत असतानाचा 16 वर्षं एकत्र काढल्यानंतर ही जोडी विभक्त झाली अन् सारिका पुरती कोसळली. तिच्या दुःखात आणखी मोठी भर तेव्हा पडली, जेव्हा तिच्या दोन्ही मुलींनी आईसोबत न राहता वडिलांसोबत राहण्याचे ठरवले. सारिका पुन्हा एकटी पडली. आधीच परिस्थितीने आणि आंधळ्या विश्वासाने कफल्लक झालेली सारिका पुन्हा एकदा सर्वच बाजूंनी एकाकी पडली आणि निराशेच्या खोल गर्तेत गेली. हे कमी की काय म्हणून ज्या आईने तिचे सर्व हिरावून घेतले होते, तीही देवाघरी निघून गेली आणि जाण्याआधी तिने ती सर्व संपत्ती एका डॉक्टरच्या नावावर करून सारिकाला आणखी एक मोठा धक्का दिला.

मात्र संघर्ष तिच्या पाचवीलाच पूजला असल्याने तिने निराशा सोडून पुन्हा मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. पण आता वय वाढले होते. त्यातच ती चित्रपटसृष्टीपासून स्वतःहून दूर गेल्याने तिचा विसर इथल्या व्यवहारी जगाला पडला नसता तरच नवल. मात्र सारिकाने पडेल ते काम करत आपला संघर्ष चालूच ठेवला. मध्यंतरी ती खूप अडचणीत आली अशी चर्चा उठली होती; पण सारिकाने याबाबत स्वतःहून कोणालाही काहीही सांगितले नाही. सध्या ती कॉस्टयुम डिझायनर, साऊंड असिस्टंट म्हणून काम करत आहे. तिने काही वेबसिरीजमधून कामं करत आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

नुकताच तिने अन्नू कपूर सोबत मिस्टर कबड्डी नावाचा एक चित्रपटही केला आहे. आता तिला कमल हसनकडून पोटगीपोटी काही रक्कमही मिळायला सुरुवात झाली आहे.(Shapith Gandharva) मात्र ती आजही तिच्या वैयक्तिक आयुष्यात एकटीच आहे. एके काळी सुपरस्टार असलेली सारिका वैयक्तिक आयुष्यात मात्र योग्य ते संतुलन न राखू शकल्याने आजही एकाकीच आहे. जन्मदात्री आई तिची कधी झाली नव्हती आणि तिने ज्यांना जन्माला घातले त्यांनीही तिची साथ सोडली. असे विचित्र खेळ करून परमेश्वराने तिच्या नशिबात इतके दुःख का आणले, हे त्याचे त्यालाच माहीत.

आपण मात्र सारिकाच्या उर्वरित आयुष्यात आता तरी सर्वकाही आलबेल व्हावे, इतकीच प्रार्थना परमेश्वराकडे करू शकतो, बरोबर ना? सारिकाचे पुढील आयुष्य आनंदी आणि सुखा-समाधानाचे जावो, याच तिला मनापासून शुभेच्छा!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.