रविवार, जानेवारी 29, 2023

Shapith Gandharva – शापित गंधर्व – भाग 23 – वैफल्यग्रस्त परवीन बाबी

एमपीसी न्यूज : ती एक अतिशय यशस्वी सिनेतारका होती. तिच्या उमेदीच्या काळात तिने अनेक मोठमोठ्या नायकांसोबत यशस्वी चित्रपट दिले. महानायक अमिताभसोबत तिने 8 चित्रपट तेही यशस्वी वा सुपर-डुपर हिट दिले. शशी कपूर, फिरोज खान, धर्मेंद्र अशा (Shapith Gandharva) त्या काळच्या सर्वच यशस्वी हिरोंसोबत तिने यशस्वी चित्रपट दिले. ती दिसायला अतिशय आकर्षक, मादक होती. त्यामुळेच तिला भारतीय सिनेसृष्टीतली एक सुंदर अभिनेत्री म्हणूनही ओळखले जायचे. ती अभिनयातही चांगलीच तरबेज होती. एक यशस्वी,आनंदी आयुष्य होण्यासाठी आणि ते तसे जगण्यासाठी जे जे लागते, ते सर्व काही तिच्याकडे होते.

मात्र तरीही ती वैयक्तिक आयुष्यात अतिशय दुःखी होती, एकटी होती. तिने आपले सर्वस्व अर्पण करूनही तिला ‘त्यांनी’ आपले केले नाही, या दुःखाने तिला आणखी दुःखी केले, एकाकी पाडले. म्हणूनच वयाच्या अवघ्या 51 व्या वर्षी ती आपल्या राहत्या घरात आपला देह सोडून गेली; पण तिची विटंबना त्यानंतरही संपली नाही. अंतिम समयी तिच्याजवळ कोणीही नसल्याने तिचा मृत्यू झालाय, हे सुद्धा कोणाला कळले नाही.

तिच्या घरातून दुर्गंधी बाहेर येऊ लागली; म्हणून तिच्या घराचा दरवाजा तोडून पोलीस घरात घुसले, तेव्हा त्यांना तिचा तीन- चार दिवसांपासून मृतावस्थेत पडलेला देह दिसला; ज्यावर कायद्यानुसार सर्व कारवाई करून झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. होय! 1970 – 80 च्या दशकात रूपेरी पडद्यावर अधिराज्य करणारी यशस्वी अभिनेत्री; पण एक शापित सुंदरी म्हणून ओळखली जाणारी ‘परवीन बाबी’ हिची एकंदरित कारकीर्द बघता मनाला असे वाटल्याशिवाय राहत नाही.

4 एप्रिल 1954 रोजी जुनागढ, गुजरात इथे तिचा जन्म झाला. तिथल्या नवाबाचे एक विश्वासू आणि व्यवस्थापक म्हणून असणाऱ्या वली मोहंमद बाबी यांची परवीन ही एकुलती एक संतान, जी त्यांना लग्नाच्या 14 वर्षांनंतर झाली होती. नवाबी संस्थानाशी संबंध असल्याने तिचे बालपण चांगले गेले. दुर्दैवाने ती फक्त 10 वर्षाची असतानाच तिचे अब्बू तिला सोडून अल्लाकडे निघून गेले. मात्र तिच्या शिक्षणात काहीही अडचण येणार नाही, अशी तजवीज त्यांनी करून ठेवली होती. तिने अहमदाबादच्या सेंट माऊंट कार्मेलमधून शालेय, तर सेंट झेवीयर्समधून इंग्लिश साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

तिला आपल्यातल्या सौंदर्याची जाणीव असल्याने तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मात्र तिला पहिल्यापासूनच फिल्मी दुनियेत करियर करण्याची इच्छा होती. नशीबही तिच्याच बाजूने होते. 1973 साली तिने प्रसिद्ध क्रिकेटर सलीम दुराणीसोबत ‘चरित्र’ नावाच्या चित्रपटातून मायावी नगरीत पदार्पण केले. दुर्दैवाने हा चित्रपट काही चालला नाही; पण तिची दखल सर्वांनी घ्यावी इतका फायदा मात्र तिला नक्कीच झाला. त्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली ती 1974 साली आलेल्या ‘मजबूर’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने आणि या चित्रपटाला मिळालेल्या यशाने. यात तिच्या समोर नायक होता अमिताभ बच्चन.

या चित्रपटाच्या यशाने तिला बऱ्यापैकी नावलौकिक मिळाला आणि तिचे करियरही मार्गी लागले.1976 साली ती अनेक प्रसिद्ध सिनेमासिकांच्या मुखपृष्ठावर झळकली. असा मान मिळवणारी ती हिंदी सिनेसृष्टीतली पहिली नायिका होती. मात्र ती अभिनयापेक्षाही जास्त मदमस्त, मादक म्हणूनच चर्चेत असे. यानंतर तिच्या करियरची वाटचाल अतिशय यशस्वीरित्या आणि जोरात सुरू झाली. तिने अनेक मोठमोठ्या नायकांसोबत यशस्वी चित्रपट देत आपल्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरवली.

याच दरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्यात त्याकाळचा प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल कबीर बेदी आला. परवीन त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. ती त्याच्यासोबत आपल्या वैवाहिक आयुष्याची मंगल स्वप्ने पाहत होती. मात्र दुर्दैवाने हे नाते पुढे फार काळ टिकले नाही. त्यामुळे ती खूप निराश झाली. त्याच दरम्यान तिच्या आयुष्यात आला तो प्रसिद्ध अभिनेता डॅनी. प्रेमभंग झाल्याने आपल्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी डॅनी भरून  काढेल असे तिला वाटल्याने तिने त्याच्यावरही खूप विश्वास ठेवला आणि खूप प्रेमही केले.

आता तरी तिच्या आयुष्यात स्थैर्य येईल असे वाटत असतानाच ही  प्रेमकहाणी पण अयशस्वीच ठरली. ज्याचा तिच्या मनावर खूपच वाईट परिणाम झाला. ती नैराश्यावस्थेत गेली.(Shapith Gandharva) ज्यामुळे व्यसन, निद्रानाश असे विकारही तिला जडले. त्यातच तिसऱ्यांदा ती पुन्हा एकदा प्रेमात पडली. यावेळेस तिचा प्रियकर होता सिनेनिर्माता आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट. दोघेही एकमेकांना आपले मानत होते.

महेश भट्ट विवाहित होता, तरीही परवीन त्याला आपला समजत होती. तर तिच्यासाठी महेश भट्टनेही आपल्या संसारावर बेलपत्र ठेवले होते. दोघेही जगाची तमा न बाळगता  एकमेकांसोबत राहत होते. सर्वत्र तेव्हा यांचीच चर्चा असे. याच दरम्यान परवीनचा मानसिक आजार  चांगलाच बळावला. असे म्हणतात की यामुळे एकदा महेश भट्ट अचानक तिला बेडरूममध्ये एकटीच सोडून चिडून बाहेर पडला, तर त्याच्यामागे त्याला विनवण्यासाठी परवीन बाबी अर्धनग्न अवस्थेत पळत आली होती.

अफवा अशीही होती की त्या तशा नाजूक अवस्थेत असताना परवीनने हातात सुरी घेत महेशला काहीतरी नाजूक वा अडचणीत आणणारा प्रश्न केला होता. ती सर्व परिस्थिती आणि तिच्या डोळ्यातली ती वेडसर झाक पाहून महेश भट्ट खूप भेदरला होता. तरीही त्याने तिला नंतर लगेचच सोडले नाही.

त्याने तिला उपचारासाठी मोठमोठ्या डॉक्टरकडे नेले. तेव्हा तिला ‘स्क्रिझोफेनिया’ नावाचा आजार आहे असे निदान झाले. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी त्याने म्हणे कबीर बेदी, डॅनी या तिच्या प्रियकरांच्या सुद्धा भेटी घेतल्या. यात सत्य किती अन् असत्य किती देव जाणे; पण तिचा आजार काही बरा झाला नाही. दुर्दैवाने अशा नकारात्मक बाबी जगात फार लवकर पसरतात. फिल्मी दुनियेत तर भिंतीलाही कान असतात असे म्हणतात ते उगाच नाही. ही गोष्ट लगेचच वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि त्या धास्तीने कुठल्याही निर्मात्याने तिला आपल्या चित्रपटात घ्यायचे धाडस वा वेडे साहस केले नाही.

साहाजिकच ती एकटी पडत गेली आणि तिचा आजारही बळावत गेला. बघता- बघता ती चित्रपटसृष्टीतून बाहेर फेकली गेली आणि जवळपास विस्मरणातही गेली. तिची कोणाला काहीच खबरबात नव्हती. अन् एके दिवशी ती पुन्हा एकदा सनसनाटी बातमीने जगाच्या समोर आली.(Shapith Gandharva) तिने चक्क अमिताभ बच्चनवरच खुनाच्या प्रयत्नाचा आरोप करून एकच खळबळ माजवली. तिने त्याला कोर्टातही ओढले; पण त्यात तिलाच मानसिक आजार आहे हे सिद्ध झाले आणि ती पुन्हा एकटी पडली. यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना, तारुण्याची नशा, यशाची नशा, पैशाची नशा माणसाला बेफाम करते. त्यातच हुजरे, आपला स्वार्थ साधणारी मंडळी अशा प्रसंगी आपली चांदी करून घेण्यासाठी लोकांच्या या अवस्थेचा उत्तम फायदा करुन घेतात.

‘जी मेमसाब, येस मॅम’ची सवय असलेल्या परवीन बाबीला मात्र एकटे पडल्यावर असे चित्र चुकूनही दिसेना. यामुळे ती अधिकच सैरभैर झाली. आणि यातच एके दिवशी तिचे कुणाच्याही नकळत निधन झाले. 22 फेब्रुवारी 2005 साली जेव्हा तिच्या घराच्या बाहेर दुधाची पाकिटे, वर्तमानपत्रे पडलेली दिसली, तेव्हा शेजारच्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावर ताबडतोब ऍक्शन घेत त्यांनी तिच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ती मृतावस्थेत सापडली.

तिच्या पोटात मागील काही दिवसात अन्न गेले नव्हते, केवळ काही गोळ्याच गेल्या होत्या. नंतर तिचे शवविच्छेदन वगैरे सर्व सोपस्कार पार पडले आणि त्यात असे कळले की एकाकी अवस्था असह्य झाल्याने कधी तरी झोपेतच ती कधीही परत न येण्यासाठी निघून गेली. (Shapith Gandharva) तिच्या त्या एकाकी अवस्थेत तिच्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी तिच्या अंतिम यात्रेत मात्र धाय मोकलून रडत, तिचे कारनामे सादर करत मगरीचे अश्रू गाळले. पण त्याने का तिच्या आत्म्याला समाधान मिळाले असेल? नवल म्हणजे जिवंतपणी तिची दखलही न घेणारे तिचे नातेवाईक तिच्या मृत्युपश्चात तिच्या संपत्तीवर अधिकार सांगण्यासाठी मात्र त्वरेने पुढे आले.

एक गूढ कहाणी बनून राहिलेल्या या शापित सुंदरीला परमेश्वराने यश दिले, पण त्याचसोबत त्याने दिले अपयश, एकाकीपण. तिने यश पचवलेही, पण तिला अपयश आणि त्यातून आलेले एकाकीपण मात्र काही केल्या पचवता आले नाही. ‘असे का’, हे विचारण्यासाठीच कदाचित ती वयाच्या 51 व्या वर्षीच अल्लातालाकडे निघून गेली असेल का? याचेही उत्तर कोणाकडेच नसेल. या शापित सुंदरीच्या पावन आत्म्याला सद्गती लाभो, हीच त्या परवरदिगारकडे प्रार्थना. आमीन!

-विवेक कुलकर्णी

Latest news
Related news