Shapith Gandharva : शापित गंधर्व – भाग 24 – कमनशीबी राजेंद्रकुमार कुमार गौरव

एमपीसी न्यूज : त्याचा जन्म कुठल्याही सामान्य घरात झालेला नव्हता. दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या तीन महानायकांचा जमाना असतानाही जो टिकला होता ; नुसताच टिकला नव्हता, तर ज्याने आपली स्वतःची ओळख बनवली होती, अशा ‘ज्युबिलीस्टार’ म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या राजेंद्रकुमारचा तो मुलगा होता. त्याचे व्यक्तिमत्त्व अतिशय लोभस होते. (Shapith Gandharva) गोरागोमटा, रोमँटिक हिरोसाठी लागणारे सर्व काही त्याच्याकडे होते, इतकेच नाही तर बापापेक्षा खूप जास्त पटीने त्याची अभिनय क्षमता होती. त्याच्या आलेल्या पदार्पणातल्या पहिल्याच चित्रपटाने यशाचे विक्रम नोंदवत त्याच्यासाठी अनेक संधींचे सुवर्णद्वार उघडून ठेवले होते.

त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण झाला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटातून त्याने अतिशय आत्मविश्वासाने पडद्यावर काम करताना रसिक प्रेक्षक ते समीक्षक सर्वानाच प्रभावित केले होते. एक नवीन रोमँटिक भूमिकेत रमणारा, अचूक  बसणारा सुपरस्टार सापडलाय, असे सर्वांचेच मत होते. मात्र दुर्दैवाने हे मत प्रत्यक्षात कधीही सत्य ठरले नाही. ‘लंबी रेस का घोडा’ वाटणाऱ्या ज्या भावी सुपरस्टारची कारकीर्द अतिशय अल्प अशीच राहिली, तो शापित गंधर्व म्हणजेच बंटी ऊर्फ कुमार गौरव. ‘राजेंद्रकुमार’ या सुप्रसिद्ध अभिनेत्त्याचा मुलगा, सुनील दत्त यांचा जावई आणि संजय दत्तचा मेहुणा- अशी भारदस्त ओळख असलेल्या या गुणी अभिनेत्याला सर्व काही जवळ असूनही यश का मिळाले नाही, याचे उत्तर मला कधीच उमगले नाही. खरे तर ही लेखमाला मला ज्यांच्यामुळे सुचली, त्यातला पहिला गंधर्व  म्हणजे कुमार गौरव आणि दुसरा विनोद कांबळी.

कुमार गौरवचे वडील सुप्रसिद्ध ज्युबिली स्टार राजेंद्रकुमार. त्यांच्या नशिबाचे 10 टक्के जरी त्यांच्या या गुणवान मुलाला दैवाने बहाल केले असते ना, तर याची गाडी इतकी सुसाट धावली असती की ज्याचे नाव ते. पण हीच तर दैवी रीत असते, जी खूप अनाकलनीय असते. ती भल्याभल्यांना उमगली नाही, तर मग ती माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय कळणार? पण मला एक नक्कीच कळते की दैवाने कुमार गौरवच्या बाबतीत नक्कीच खूप चुकीचे केले आहे.

राजेंद्र कुमार आणि शुक्ला कुमार या दांपत्याच्या पोटी 11 जुलै 1960 रोजी लखनऊ येथे जन्माला आलेल्या कुमार गौरवचे खरे नाव मनोज तुली होय. त्याचे वडील सिनेसृष्टीतले एक यशस्वी नाव. त्यांच्या चित्रपटाने यश मिळवले नाही तरच नवल, अशी आख्यायिका त्यांच्याबाबत होती. (Shapith Gandharva) म्हणूनच त्यांना ‘ज्युबिली स्टार’ असे म्हटले जात असे. कुमार गौरवचे आणखी एक टोपणनाव आहे. त्याला घरी ‘बंटी’ म्हणूनही संबोधले जाते. त्याचे व्यक्तिमत्त्व अतिशय गोंडस असे होते. घरातले वातावरण अतिशय मोकळे असल्याने आणि फिल्मी दुनियेशी निगडीत असल्याने त्याला चित्रपटसृष्टीचे आकर्षण असणे गैर नव्हतेच.

Lonavala News : पोलीस कर्मचार्‍यांला मारहाण केल्याप्रकरणी 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल

प्रख्यात सिने निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बहल आणि रमेश बहल हे त्याचे मामा आहेत, तर सिने अभिनेता रवी बहल(नरसिंहा मधला), अभिनेती गीता बहल, प्रख्यात निर्माता गोल्डी बहल हे त्याचे मामेभाऊ. साहजिकच त्याच्या घरी मोठमोठ्या लोकांचे येणे-जाणे होत असे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर तसेच अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होणारच, यात काही गैर नाही. इतकी वर्षं सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या राजेंद्रकुमार यांनाही आपला मुलगा याच क्षेत्रात यावा आणि त्याने नावलौकिक, आपल्यासारखेच यश मिळवावे, असे वाटले तर त्यात काहीच गैर नव्हते.

म्हणूनच त्यांनी आपल्या लाडक्या बंटीसाठी तो अठरा वर्षाचा होताच, त्या काळच्या लोकप्रिय ट्रेंडला अनुसरून ‘लव्ह स्टोरी’ नावाचा चित्रपट काढला. त्याची नायिका होती, विजयता पंडित. कोवळ्या वयातले प्रेम, घरच्यांचा विरोध, तो यांनी झुगारून पळून जावून लग्न करणे, त्यात येणारी अनेक संकटे आणि मग त्यावर मात करून होणारा गोड शेवट, सोबत अवीट गोडीची गाणी. ‘देखो मैंने देखा है ये एक सपना, कैसा तेरा प्यार, याद आ रही है’ अशी एकापेक्षा एक गोड गाणी, त्याला आर्. डी. बर्मनचे संगीत, सोबत अमजद खान, स्वतः राजेंद्रकुमार, डॅनी अशी तगडी स्टारकास्ट यामुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवले आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवा प्रतिभावंत आणि गुणवान रोमँटिक हिरो मिळाला, असे भाकित त्याकाळच्या सर्व सिनेसमीक्षक आणि मोठमोठ्या नियतकालिकांनी केले.

मात्र दुर्दैवाने हे भविष्य काही सत्यात उतरले नाही. त्यानंतर आलेल्या त्याच्या ‘तेरी कसम” या चित्रपटाने फारसे यश मिळवले नाही. पुढचा चित्रपट ‘स्टार’ ही जसा आला तसाच गेला. साहजिकच त्याचा अपेक्षाभंग झाला. यानंतर 1985 साली महेश भट्ट यांनी एक टेलिफिल्म काढली, जिचे नाव होते जनम. (Shapith Gandharva) यातल्या त्याच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा झाली. त्याकाळी अशी अफवा उठली होती, की त्याकाळचे पंतप्रधान राजीव गांधी आपल्या निवांत वेळात दूरदर्शनवर ही फिल्म बघत होते. तेव्हा दूरदर्शनचे अनेक थाट होते. बातम्यांची वेळ झाली की चित्रपट थांबवले जात. असे म्हणतात की राजीव गांधी यांनी थेट दूरदर्शन संचालकाला फोन करून सांगितले की आधी हा चित्रपट पूर्ण दाखवा आणि त्यानंतर बातम्या. यातली खरी बाब काय हे आपल्याला ठाम माहिती नाही.

 

पण त्याचा यातला अभिनय शब्दशः अविस्मरणीय होता. सर्व काही त्याचे प्लस पॉईंट्स असूनही त्याच्याबाबत एक गोष्ट कायम विरोधात होती, ती म्हणजे यश. फिल्मी दुनियेला तुम्ही नुसतेच प्रतिभावंत, गुणवान, देखणे असून चालत नाही. या बरोबरच एक मुख्य गोष्ट हवी असते ती म्हणजे यश. आणि नेमके तेच कुमार गौरवला मिळत नव्हते. यासाठी त्याच्या वडिलांनी पुन्हा एकदा कंबर कसली आणि आपल्या लाडक्या लेकासाठी महेश भट्टच्या दिग्दर्शनाखाली एक चित्रपट काढला ‘नाम’. सुदैवाने हा चित्रपट त्याच्या आयुष्यातला दुसरा सर्वात मोठा यशस्वी चित्रपट ठरला.

पण याचे सर्व श्रेय मिळाले ते त्याच्या मेहुण्याला म्हणजे संजय दत्तला. यात त्याची भूमिकाही दुय्यम होती. त्यातच संजय दत्त जबरदस्त भाव खाऊन गेला. त्याला या चित्रपटाच्या यशाने खूप स्थैर्य दिले. पण ज्याच्यासाठी हा चित्रपट काढला, त्या कुमार गौरवला मात्र काहीच फायदा झाला नाही. (Shapith Gandharva) बघता-बघता तो एका बाजूला पडत गेला. त्याला चित्रपट मिळेनासे झाले आणि उगवत्या सूर्यालाच नमस्कार करणाऱ्या फिल्मी दुनियेच्या लेखी त्याचे असणे जणू नसणेच झाले.

कोणी म्हणतं की पहिल्याच चित्रपटाच्या यशाची नशा त्याच्या डोक्यात गेली, कोणी म्हणतात त्याला नंतर अगदी तशाच भूमिकेच्या ऑफर्स येत गेल्या. चित्रपटसृष्टीत अशा पद्धतीच्या अफवा नेहमीच पसरलेल्या असतात, त्यामुळे यात सत्य किती आणि असत्य किती, याबद्दल बोलणे चुकीचे ठरेल. पण सत्य हेच की त्याची कारकीर्द फुलली नाही ती नाहीच. त्याच्याकडे सर्व काही असूनही त्याला पुन्हा तसे यश मिळाले नाहीच.

अखेर तो फिल्मी दुनियेतून गायब होत गेला आणि मग त्याचा विसर सर्वांनाच पडत गेला. त्याने ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांची कन्या नम्रता दत्त सोबत 1984 साली विवाह केला. त्याला दोन मुली आहेत. सिया कुमारी आणि साची कुमारी. त्याचे वैवाहिक आयुष्य यशस्वी आणि अतिशय आनंदी  असे आहे. चित्रपटसृष्टीत आलेल्या अपयशाने त्याने आपला मोर्चा पर्यटन व्यवसायाकडे वळवला, त्यात मात्र त्याला कमालीचे यश मिळाले. तसेच त्याचा मॉरिशस देशातही एक यशस्वी असा व्यवसाय आहे.

खरे तर कोणाचीही तुलना कोणासोबत होत नाही असे म्हटले जाते आणि तशी तुलना करूही नये असे सुद्धा म्हटले जाते. पण तरीही कुमार गौरवचे काही चित्रपट बघितले असता मनाला राहून राहून असे वाटते की ‘हाँ, इस बंदे मे दम तो बहोत था, पर किस्मत इसके साथ नहीं थी।’ आता ती का (Shapith Gandharva) नव्हती त्याच्या बरोबर, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही; कारण ती देणारा असतो तो वरचा. आणि त्याचा खेळ कोणाला कधीही समजला नाही, समजणारही नाही. वाईट याचेच वाटते की एक  दीर्घकाळ चालू शकणारी कारकीर्द केवळ नशिबाची साथ न मिळाल्याने फुलण्याआधीच खुंटली.

कुमार गौरवच्या उर्वरित आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

 

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.