Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 27 – प्रतीलता शाप की वरदान?

एमपीसी न्यूज : त्यांच्याकडे अतिशय मधुर आणि दैवी देण असलेला जादुई आवाज होता. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यांनी एकच नाही तर अनेक सुमधुर हिट गाणी दिली. त्यांच्याकडे ते सर्व काही होते, जे यशस्वी होण्यासाठी आणि यशस्वी म्हणून मिरवण्यासाठी लागते. (Shapith Gandharva) नव्हते ते केवळ नशीब. म्हणूनच अनेक वर्षे त्यांनी पार्श्वगायिका म्हणून काम केल्यावरही त्यांची ओळख ‘प्रति लता मंगेशकर’ हीच राहिली. सुमधुर आवाजाची मल्लिका असूनही ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपुर यांचा आजवरचा एकूणच प्रवास बघता परमेश्वराने त्यांना सर्व काही देऊनही काहीच दिले नाही, असे मनाला वाटल्यास त्यात काहीही गैर नाही.

शापित गंधर्व या लेखमालिकेचा हेतूच हा आहे की यशस्वी होण्यासाठी सर्व काही उपजत दैवी देणगी घेऊन जन्माला आलेल्या , यश मिळवले पण  त्यात नेहमीच काही न काही खंत आहे, असे वाटणाऱ्या आजच्या काळातल्या त्या शापित पण खऱ्याखुऱ्या गंधर्वाना या निमित्ताने पुन्हा एकदा नमन करणे. आजच्या भागात आपण सुमन कल्याणपुर या ज्येष्ठ हिंदी, मराठी पार्श्वगायन करणाऱ्या एकेकाळच्या महान कलाकाराचा इतिहास बघणार आहोत.

28 जानेवारी 1937 साली ढाका(बांगलादेश)येथे जन्माला आलेल्या एका मध्यमवर्गीय घरातल्या सुमनताई यांचे खरे नाव सुमन शंकरराव हेमाडी असे होते. हेमाड़ी हे कर्नाटकी गौड ब्राम्हण होते. त्यांची नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या हुद्द्याची होती. (Shapit Gandharva) नोकरीच्या निमित्ताने ते ढाका येथे खूप वर्षे वास्तव्यास होते. येथेच त्यांच्या पोटी सुमनताई जन्माला आल्या. त्यांच्या आईचे नाव सीता होते. पाच बहिणी आणि एक भाऊ असा सुमनताईचा मोठा परिवार होता. सुमनताई पाच वर्षाच्या झाल्यानंतर त्यांचे वडील मुंबईच्या बँकेत बदली झाल्याने मुंबईस वास्तव्यास आले.

सुमन कल्याणपुर यांना बालपणापासूनच संगीत आणि चित्रकला विषयात विशेष रुची होती. त्यांनी मुंबईच्या सेंट कोलंबिया शाळेत शालेय शिक्षण घेतल्यानंतर जे जे आर्टस् या सुप्रसिद्ध कला महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि याच दरम्यान त्यांनी त्यांच्या वडिलांचे मित्र ज्येष्ठ गायक केशवराव  भोळे यांच्याकडे गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे उस्ताद खान अब्दुल रहेमान खान आणि गुरुजी नवरंग मास्टर यांच्याकडे गायनाचे उच्च शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुमनताईच्या आवाजात जादू होतीच. त्या जादुई आवाजाला उत्तम गुरू लाभल्याने त्यात आणखीनच गोडी आणि प्रगल्भता आली.

 

Chinchwad Bye-Election : शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढणार – एकनाथ शिंदे

1958 साली म्हणजेच वयाच्या 21व्या वर्षी त्यांचा विवाह रामानंद कल्याणपुर या व्यावसायिकासोबत झाला आणि त्या ‘सुमन हेमाडी’च्या ‘सुमन कल्याणपुर’ झाल्या. त्यांच्या घरात कला, संगीत याचे वावडे नसले, तरी ते सार्वजनिकपणे करण्यास मनाई होती. लग्नाच्या आधी म्हणजे 1952 साली त्यांनी प्रथम ऑल इंडिया रेडिओवर गाणी गायली. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 1953 साली मराठी चित्रपट ‘शुक्राची चांदणी’ या बोलपटातून त्यांचे पार्श्वगायिका म्हणून पदार्पण झाले. याच दरम्यान त्या काळचे प्रसिद्ध दिग्दर्शक शेख मुख्तार हे ‘मंगू’ नावाचा हिंदी चित्रपट बनवत होते.

संगीतकार होते शेख मेहबूब. त्यांनी सुमनताईचा आवाज ऐकल्यावर ते खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी मंगूची तीन गाणी सुमनताईच्या आवाजात रेकॉर्ड केली. (Shapit Gandharva) मात्र दुर्दैवाने यातले फक्त एकच गाणे प्रसारित झाले. ते होते ‘कोई पुकारे तुझको धीरे से’. अशा प्रकारे सुमनताईचे हिंदी चित्रपटातूनही पार्श्वगायिका म्हणून पदार्पण झाले. यानंतर त्यांनी ओ. पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘आरपार’ या चित्रपटात मोहम्मद रफीसोबत ‘मोहब्बत कर लो जी भर लो, अजी किसने रोका है’ हे त्या काळातले सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरलेले गाणे गायले आणि त्या एकाच रात्रीतून प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

दुर्दैवाने या गाण्यानंतर त्यांनी ओ. पी. नय्यर यांच्यासोबत पुन्हा गाणे गायले नाही. मात्र यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मोहम्मद रफी, तलत, मेहमूद, मुकेश, मन्ना डे, हेमंतकुमार अशा त्या काळच्या मोठमोठ्या आणि महान गायकांसोबत त्यांनी  असंख्य लोकप्रिय गाणी गायली. त्यांनी सुमारे 740 हून अधिक हिंदी फिल्मी आणि गैरफिल्मी गाणी गायली.

लक्ष्मिकांत- प्यारेलाल, नौशाद, एस. एन. त्रिपाठी, कल्याणजी-आनंदजी, चित्रगुप्त अशा सर्व महान संगीतकारांच्या सोबत त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली. नूरजहाँ, पाकीज़ा, दिल एक मंदिर, दिल ही तो है, शगुन, साथी अशा अनेक चित्रपटांतली त्यांची गाणी प्रचंड गाजली. त्याच दरम्यान त्यांनी अन्नपूर्णा,पसंत आहे मुलगी,एकटी, मानिनी या मराठी चित्रपटांतूनही अनेक गाणी गायली. त्यांची बहुतेक गाणी लोकप्रियच ठरली. त्यांची भावगीते, भक्तिगीतेही खूप लोकप्रिय ठरली.

त्यांची ‘साथी मेरे साथी’ (वीराना),
‘ना तुम हमें जानो’ (बात एक रात की),
‘छोडो, छोडो मोरी बाहें’ (मियाँ बीवी राज़ी),
‘दिल ग़म से जल रहा’ (शमाँ ),
‘यूं ही दिल ने कहा’ (दिल ही तो है),
‘बुझा दिया है’ (शगुन),
‘मेरे संग गा’ (जानवर),
‘मेरे महबूब ना जा’ (नूर महल),
‘तुम अगर आ सको तो और ज़िंदगी’,  ‘दो दिल डर के तूफ़ानों में’ (एक साल पहले),
‘जिंदगी इम्तेहान लेती है’ (नसीब),
‘जो हम पे गुजराती है’ (मोहब्बत इसको कहते हैं),
‘शराबी शराबी ये सावन का मौसम’ (नूरजहाँ)
ही  काही उल्लेखनीय गाणी आहेत.

‘बहना ने भाई की कलाई में’ (रेशम की डोरी) या गाण्यासाठी त्यांना 1975 साली फिल्मफेयर सर्वोत्कृष्ट स्त्री पार्श्वगायिका पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. मात्र इतकी उत्कृष्ट कामगिरी असूनही त्यांची दखल जितकी घ्यायला हवी होती, तितकी घेतली गेली नाही. त्यांना नेहमीच ‘प्रति लता मंगेशकर’ म्हणूनच संबोधले गेले. त्यांचा आवाज लता मंगेशकर यांच्या आवाजाशी मिळताजुळता होता अन् हाच त्यांना जणू शाप ठरला. ज्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत काही न काही कारणाने गायचे नव्हते, अशा अनेक संगीतकारांनी तो आनंद सुमन कल्याणपुर यांच्यासोबत गाणी करून मिळवला. पण त्यांना श्रेय देण्यास नेहमीच हात आखडता घेतला.

एकदा तर दूरदर्शनवरील ‘छायागीत’ या लोकप्रिय कार्यक्रमात 80 च्या दशकातले लोकप्रिय गाणे ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’ प्रसारित केले गेले. त्या वेळी निवेदकाने ठामपणे हे गाणे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायले आहे, असे सांगितले. (Shapit Gandharva) कार्यक्रम संपल्यावर सुमनताईची मुलगी चारुल हिने दूरदर्शनच्या संचालकांना फोन करून सांगितले की हे गाणे रफी साहेबांसोबत लताबाई नाही, तर माझी आई सुमन कल्याणपुर यांनी गायले आहे. मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही, अशीही कथा त्या काळी चर्चिली गेली होती. म्हणजे काय तर इतके साम्य त्या दोघीत होते. हेच वरदान सुमनताईसाठी शाप ठरले.

मात्र त्यांनी कोणालाही कधीही दोष दिला नाही. जे मिळाले त्यात त्यांनी आनंद मानला आणि आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि सार्थपणे पार पाडली. त्याबद्दल श्रेय न मिळाल्याने त्यांनी कसलीही नाराजी व्यक्त केली नाही किंवा कुठे भडक वक्तव्य करून सवंग प्रसिद्धीही मिळविली नाही. हळूहळू त्या फिल्मी दुनियेच्या स्पर्धेतून बाहेर पडू लागल्या. याच दरम्यान असंख्य नवनवीन गायिका येत गेल्या.

1981 साली आलेला मल्टीस्टारकास्ट असलेल्या नसीब चित्रपटातले त्यांचे ‘रंग जमा के जायेंगे’ हे गाणे अखेरचे ठरले. त्यानंतर त्यांना ना पुन्हा गाणे मिळाले ना त्यांनी कोणाकडे यासाठी याचना केली.त्यांना 1961 साली नाशिकच्या रसरंग संस्थेने दादासाहेब फाळके या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले, तर मियाँ तानसेन पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्या आता जवळपास 85 वर्षांच्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झालेअसून त्या आता मुंबईच्या खार येथील आपल्या घरी आपल्या मुलीसोबत (चारुल)राहत आहेत आणि त्या आजही आनंदी आणि समाधानी आहेत.

परमेश्वराने त्यांना स्वर्गीय आवाज दिला; पण दुर्दैवाने तो महान गायिका अन गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या आवाजाशी मिळता-जुळता होता. हे वरदान दुर्दैवाने त्यांच्यासाठी वरदान न ठरता जणू अभिशापच ठरले आणि 750 हून अधिक लोकप्रिय गाणी गायलेल्या या महान गायिकेच्या नशिबात (Shapit Gandharva) तो मान- सन्मान कधीच आला नाही, हे दुर्दैवाने सत्यच आहे. यावर तुम्ही-आम्ही मर्त्य माणसे काय बोलणार सांगा? सुमनताईचे उर्वरित आयुष्य आनंदी,उत्तम,आरोग्यमय आणि सुखाचे जावो, हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना!

विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.