Shapith Gandharva Part 5 : शापित गंधर्व – भाग पाचवा – राजीव गांधी

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : मला हिंदी, मराठी, प्रादेशिक चित्रपट (Shapith Gandharva Part 5) आवडतात. मला संगीत, नाटके, खेळ, भरपूर फिरणे, मित्र बनवणे खूप आवडते. मला फारसे आवडत नाही, तर ते राजकारण. साहजिकच राजकारणी लोकही मी फारसे फॉलो करत नाही. सर्वच राजकारणी लबाडच असतात, असे नाही. सर्वच जण भ्रष्टाचारी असतात, असेही मी कदापि म्हणणार नाही. होते/आहेत की काही चांगले लोक या क्षेत्रातही.

मला व्यक्तिशः अटलबिहारी वाजपेयी, मनोहरजी पर्रिकर, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरदजी पवार, प्रमोद महाजन, देवेंद्र फडणवीस, अजित दादा ही राजकीय नेते मंडळी खूप आवडतात. त्यांच्या पक्षाशी मला काही घेणे- देणे नाही. पण, ही मंडळी मला खूप आवडतात. पण, या सर्वांच्या आधी मला आवडायचे ते आपल्या देशाचे सर्वाधिक तरुण पंतप्रधान म्हणून इतिहासात अमर असलेले, अतिशय लोभस व्यक्तिमत्व असलेले, एक निरागस राजकारणी असलेले आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे (Shapith Gandharva Part 5) राजीवजी गांधी.

त्यांचे व्यक्तिमत्त्व कमालीचे लोभस होते, आकर्षक होते. सफरचंदी वा कश्मीरी लोकांसम त्यांची कांती होती. त्यातच त्या चेहऱ्यावर सदैव असणारे लोभस हास्य कमाल होते. गालावर पडणारी खळी, खांद्यावर तिरकी घेतलेली शाल, उंच-पुरे राजीवजी म्हणजे एक अतिशय चैतन्यदायी व्यक्तिमत्त्व होते. ‘हमें देखना है’ अशी त्यांची प्रत्येक भाषणात देशाला, समाजाला प्रबोधन करताना वाक्यरचना असे. अतिशय तरुणपणी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि त्याच तरुणपणात अपघाती हल्ल्यात ते देवाघरी निघूनही गेले. त्यांच्याबद्दल कोणी काहीही म्हणो; पण ते एक चांगले व्यक्ती नक्कीच होते. केवळ जबरदस्तीच्या राजकारणात या उमद्या माणसाचा बळी गेला, असे मला नेहमीच वाटते.

भारताच्या कर्तृत्ववान पंतप्रधान म्हणून ओळखल्या (Shapith Gandharva Part 5) जाणाऱ्या इंदिरा गांधींचे ज्येष्ठ अपत्य म्हणजे राजीव गांधी. भारताचे लाडके पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे आजोबा, तर खासदार स्व. फिरोज गांधी हे त्यांचे वडील. 20 ऑगस्ट 1944 साली राजीव यांचा जन्म मुंबई येथे झाला. इंग्रज शासनाची जुल्मी राजवट आता लवकरच उलथवून पडणार असा तो काळ होता. स्वातंत्र्य मिळण्याच्या तीन वर्षं अगोदर त्यांचा जन्म एका शाही घराण्यात झाला. त्यांना संजय गांधी म्हणून आणखी एक भाऊही होते. राजीव यांचे शिक्षण आधी डेहराडून येथे व नंतर हिमाचल प्रदेशमधल्या ‘डून’ या उच्चभ्रू शाळेत झाले होते. त्यानंतर त्यांनी mechanical इंजिनिअरिंगसाठी जगप्रसिद्ध केम्ब्रिज विद्यापीठ गाठले. तिथून त्यांनी जगप्रसिद्ध अशा लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊन आपले इच्छित शिक्षण प्राप्त केले.

Shapith Gandharva Part 4 : शापित गंधर्व – भाग चौथा – प्रमोद महाजन

प्रचंड मोठ्या घरातले असूनही राजीव गांधी त्यांच्या शैक्षणिक काळात खूप साधेपणाने राहत असत. कुणालाही हे पटणार नाही की शिक्षण घेत असताना ते स्वतः ‘कमवा आणि शिका’ या कर्मवीर भाऊ पाटील यांच्या प्रणालीला अनुसरून लंडन येथे असताना पार्टटाईम काम करत होते. याच काळात त्यांची भेट इटलीच्या एंटानियो मारियो सोबत झाली. भेटीतून मैत्री फुलली, जिचे रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात झाले.1968 च्या दरम्यान त्यांनी लग्न केले. त्यानंतर त्यांनी एक व्यावसायिक वैमानिक म्हणून काम करायला सुरुवातही केली. याच दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्यासोबत त्यांचे दुसरे पुत्र संजय गांधी सक्रीय राजकारण करत होते. दुसरीकडे राजीव गांधी आपल्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्यापैकी आनंदी होते. मात्र, 1978 च्या आसपास अचानक संजय गांधी यांचे अपघातात निधन झाल्याने एकाकी पडलेल्या आपल्या आईला साथ देण्यासाठी ते भारतात परत आले.

साहजिकच काँग्रेसच्या परंपरेनुसार संजय गांधीच्या अकाली मृत्यूनंतर त्यांना मनाविरुद्ध लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली अन् ते अमेठी मतदारसंघातून थेट लोकसभेत प्रवेश करते झाले. त्यांना राजकारणाचा पुरता अनुभव येण्याआधीच देशावर 31 ऑक्टोबर 1984 रोजी एक मोठे संकट कोसळले. आपल्याच अंगरक्षकांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी शहीद झाल्या. या आणीबाणीच्या प्रसंगी कोवळ्या, अननुभवी राजीवजींच्या खांद्यावर देशाच्या पंतप्रधानपदाची मोठीच जबाबदारी आली. त्यावेळी ते फक्त 39 वर्षाचे होते. त्यांनी देशाचे सर्वाधिक तरुण आणि सहावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यानंतर लगेचच लोकसभेची पुढील निवडणूकही झाली,ज्यात काँग्रेस पक्षाने मोठ्या फरकाने इतर सर्वच पक्षांना पिछाडीवर टाकत बहुमताने सत्ता आणली आणि राजीव गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.

साहजिकच युवा आणि उच्चशिक्षित असलेल्या राजीव गांधींच्या युवा मनात आधुनिक भारतीय देशाच्या प्रगतीसाठी असंख्य भव्य-दिव्य आराखडे होते. तंत्रज्ञान, विज्ञान आणि राष्ट्राभिमान या त्रिसूत्रीनुसार त्यांनी देशाला आणखी सशक्त आणि स्वयंभू बनविण्याचा संकल्प केला. राजीवजींना राजकारणाचा फारसा अनुभव नव्हता; पण उपजत हुशारी आणि इंदिराजींच्या मुलांकडे जे असायला हवे होते, ते सर्वकाही नक्कीच होते. पण तरीही ते एक निरागस राजकारणी होते. त्यांच्या जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना मदत केलीही; पण राजीवजी परिपक्व राजकारण करण्यात तितके तरबेज नक्कीच नव्हते. तरीही त्यांनीच भारतात संगणक प्रणाली आणली. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताला तंत्रज्ञानाचे प्रोजेक्ट्स आलेले दिसले. मात्र, याच काळात देशभर खळबळ उडवणारा बोफोर्स घोटाळा चर्चेत आला. ज्याचा मुख्य आरोप थेट त्यांच्यावर झाला. यामुळेच त्यांना सत्ताही गमवावी लागली आणि याचमुळे त्यांची प्रतिमाही गढूळ झाली. मात्र, हा आरोप खोटा होता, असे पुढे 25 वर्षानंतर सिद्ध झाले, ज्यावर प्रसिद्ध वर्तमानपत्र ‘द हिंदू’ने विस्तृत बातमीही दिली होती. मात्र, या आरोपाने त्यांची प्रतिमा डागाळण्यात आणि सत्ताच्युत करण्यात फार मोठा वाटा उचलला होता, हे मान्य करावेच लागेल.

आपल्या लोकशाहीने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. त्या लोकशाहीचा संपूर्ण आदर करूनही म्हणावेसे वाटते की, आरोप उगाचच करायचे म्हणून न करता किमान आधी थोड्याफार प्रमाणात सत्यता पडताळून पाहिलीच पाहिजे. मी आधीच लिहिले आहे, की मी कुठल्याही एका पक्षाचा समर्थक नाही; पण या आरोपांनी राजीवजींची कारकीर्द नक्कीच धुळीला मिळवली होती, हे स्वीकारावेच लागेल. मात्र, पुढील काही वर्षात त्यांनी पुन्हा सत्तेत परत येण्यासाठी कंबर कसली. अशातच 1991 सालची लोकसभा निवडणूक आली. त्यांनी प्रचाराच्या निमित्ताने भारतभ्रमण करण्यास सुरुवात केली. लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसादही लक्षणीय होता.

आणि तो काळ दिवस उगवला! 26 मे 1991 रोजी श्रीपेरूम्बुदूर (तामिळनाडू) येथे एका प्रचारसभेत ते थेट जनतेत घुसून लोकांच्या प्रेमाचा, अभिवादनाचा स्वीकार करत असतानाच एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि अवघ्या 47 वर्षांचे राजीवजी या स्फोटात जागीच ठार झाले. एका उत्तम आणि उच्चशिक्षित नेत्याचा अकाली अंत झाला. देश एका उमद्या, काळाची पावले ओळखू शकणाऱ्या नेत्याला मुकला.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने देश न सोडता (Shapith Gandharva Part 5) आपल्या नवऱ्याच्या आणि सासूच्या सर्वात जुन्या पक्षाला नवसंजीवनी देत पुन्हा एकदा सत्ता मिळवून दिली आणि त्याहूनही मोठी बाब म्हणजे स्वतः सत्तेबाहेर राहून एक मोठा त्याग करून जगापुढे चिरकाल संस्मरणात राहील, असे आगळे-वेगळे उदाहरण देत एक वेगळाच दाखला ठेवला.

प्रत्येकाला आपले वाटणाऱ्या, अतिशय लोभस आणि निरागस; पण चुकून राजकारणात आलेल्या आणि जबरदस्तीच्या राजकारणाचा बळी ठरलेल्या अन् अकालीच संपलेल्या देशाच्या या स्वर्गीय पंतप्रधानाला भावपूर्ण श्रद्धांजली!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.